माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 लाख अर्जाचा टप्पा पार
बुलडाणा, दि. 19 : राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कर्ज करण्यात सुरवात झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 10 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहे. यात 70 हजार ऑफलाईन, तर 40 हजार अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आजपर्यंत 1 लाख 10 हजार 779 महिलांनी अर्ज दाखल केले आहे. यात 70 हजार 10 महिलांनी ऑफलाईन, तर 40 हजार 769 महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. जिल्ह्यात 4 लाख 97 हजार 651 संभाव्य पात्र महिला आहेत.
बुलडाणा तालुक्यात 11 हजार 264 अर्जामध्ये ऑफलाईन 9 हजार 299, ऑनलाइन 1 हजार 965, चिखली तालुक्यात 10 हजार 513 अर्जामध्ये ऑफलाईन 7 हजार 708, ऑनलाइन 2 हजार 805, देऊळगाव राजा तालुक्यात 11 हजार 130 अर्जामध्ये ऑफलाईन 8 हजार 426, ऑनलाइन 2 हजार 704, सिंदखेड राजा तालुक्यात 6 हजार 39 अर्जामध्ये ऑफलाईन 3 हजार 396, ऑनलाइन 2 हजार 643, लोणार तालुक्यात 9 हजार 658 अर्जामध्ये ऑफलाईन 4 हजार 862, ऑनलाइन 4 हजार 796, मेहकर तालुक्यात 17 हजार 170 अर्जामध्ये ऑफलाईन 10 हजार 756, ऑनलाइन 6 हजार 414, मोताळा तालुक्यात 6 हजार 684 अर्जामध्ये ऑफलाईन 2 हजार 723, ऑनलाइन 3 हजार 961, मलकापूर तालुक्यात 6 हजार 403 अर्जामध्ये ऑफलाईन 4 हजार 703, ऑनलाइन 1 हजार 700, नांदुरा तालुक्यात 6 हजार 231 अर्जामध्ये ऑफलाईन 3 हजार 909, ऑनलाइन 2 हजार 322, शेगाव तालुक्यात 3 हजार 889 अर्जामध्ये ऑफलाईन 2 हजार 95, ऑनलाइन 1 हजार 764, खामगाव तालुक्यात 7 हजार 932 अर्जामध्ये ऑफलाईन 5 हजार 246, ऑनलाइन 2 हजार 686, जळगाव जामोद तालुक्यात 5 हजार 950 अर्जामध्ये ऑफलाईन 2 हजार 721, ऑनलाइन 3 हजार 229, संग्रामपूर तालुक्यात 7 हजार 916 अर्जामध्ये ऑफलाईन 4 हजार 166, ऑनलाइन 3 हजार 750 अर्ज दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदार महिला स्वत: मोबाईल ॲपवरून अर्ज सादर करू शकतील. तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालयात ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिला अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करू शकतील. तसेच सेतू, सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रमध्येही विनामुल्य अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. महिलांनी या सेवांचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत.
महिलांच्या थेट बँक खात्यात 1 हजार 500 रूपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अर्जामध्ये बँकेचा तपशिल अचूक भरावा. तसेच अर्ज करण्याची सुविधा विनामुल्य असल्याने सुविधा केंद्रचालकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम महिलांकडून घेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
सोमवारी खामगाव आयटीआयमध्ये रोजगार मेळावा
बुलडाणा, दि. 19 : उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार, दि. २२ जुलै २०२४ रोजी खामगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विशेष रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हंसलपूर येथील सुझुकी मोटर्स गुजरात प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या आस्थापनेसाठी जोडारी, कातारी, संधाता, विजतंत्री, टूल ॲण्ड डायमेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, यंत्रकारागीर, पेंटर, तारतंत्री, पत्रे कारागीर, डिझल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ओटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायातून उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.
00000
जुन्या दस्तावेजासाठी भूमि अभिलेख आधुनिक कार्यक्रम
बुलडाणा, दि. 19 : डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत शेतकरी आणि नागरिकांसाठी ई रेकॉर्डस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई रेकॉर्डस - संग्रहित दस्तावेज प्रणालीमध्ये शेती संबंधित जुने दस्तावेज यात जुने सातबारा, फेरफार, पेरेपत्रक, हक्कनोंदी उतारा पाहणे आणि शोधण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या लिंकवर जाऊन युजर आयडी व पासवर्ड टाकून जिल्हा, तालुका, गाव व गट क्र. निवडून आपल्याशी संबंधित जुने दस्तावेज पाहता येतील. अधिक माहितीसाठी संबधित तहसीलदार कार्यालय, मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयाशी संपर्क करता येईल.
तसेच शेतकरी आणि नागरिक, तसेच आपले सरकार केंद्र, बँक प्रतिनिधींकरिता ई-हक्क प्रणालीमध्ये शेतीजमीन बाबतीत ऑनलाईन फेरफार अर्ज दाखल करण्यासाठी pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin लिंकवर जाऊन आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून विहित माहिती भरावी लागणार आहे. यात एकूण 11 प्रकारच्या ऑनलाईन फेरफारकरिता अर्ज ई-हक्क प्रणालीवर करता येतील. यात ई-करार, बोजा चढविणे, गहाणखत, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, एकुमें नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव बदलणे, खातेदाराची माहिती भरणे, हस्तलिखित व संगणीकृत सातबारामधील तफावत दुरुस्ती करणे, मयत कुळाची वारस नोंद या सेवा असणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी तहसीलदार कार्यालय, मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन महसूल विभाग केले आहे.
00000
पिक विमा नुकसान भरपाईमध्ये पारदर्शकता ठेवावी
-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
बुलडाणा, दि. १९ : खरीप हंगामात पावसामुळे शेतपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना पिक विमा हा आधार असल्याने नुकसानीचे पंचनामे पारदर्शक पद्धतीने करावेत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार संजय रायमूलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन आदी उपस्थित होते.
श्री. जाधव म्हणाले, खरीप हंगामात दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यात 29 परिमंडळातील पिकांचे नुकसान झाले आहे. पुन्हा पेरणी किंवा इतर कामासाठी पिकविमा शेतकऱ्यांना आधार असल्यामुळे कृषी विभागाने पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करावे. हे पंचनामे करीत असताना पारदर्शकता ठेवावी. शेतकरी मोठ्या संख्येने पिक विमा काढतात. मात्र त्याप्रमाणात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पंचनामे काळजीपूर्वक करावेत.
बियाणे किंवा खताबाबत तक्रारी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होईल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांनी दावा दाखल केल्यानंतर तातडीने प्रस्तावावर कारवाई करावी. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊन दिलासा देण्यात यावा. तसेच नॅनो खतांचा चांगला फायदा होत असल्याने याबाबत जनजागृती करावी.
शेतकऱ्यांना पीक कर्ज हा आधार असल्याने बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी सकारात्मक असावे. आतापर्यंत केवळ 35 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले आहे. 31 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल, यासाठी बँकांनी प्रयत्न करावे. कर्जाची कागदपत्रे बँकेत सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोकन देण्यात यावे आणि प्रथम येणाऱ्या प्रथम कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
राज्य शासनाची माझी लाडकी बहिण यासाठी सर्व यंत्रणांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. सुविधा . केंद्रांना आता प्रति अर्जामागे 50 रुपयांचा लाभ मिळणारा असल्याने त्यांच्याकडून प्राधान्याने अर्ज भरून घेण्यात यावे. तसेच युवकांसाठी युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने उद्योग आणि युवकांची सांगड घालून योजना यशस्वी करावी.
महावितरणतर्फे कुसुम आणि पीएम सुर्यघर योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होणार असल्याने या योजनेचे लाभ तातडीने देण्याची व्यवस्था करावी. यासोबतच श्री. जाधव यांनी आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, सार्वजनिक बांधकाम भारत संचार निगम लिमिटेड आणि आरोग्य विभागाचा आढावा घेतला. येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा पाठपुरावा करून ही कामे तातडीने पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
000000
जिल्हा सहकारी बँकेचा सहकार कार्यकर्ता मेळावा उत्साहात
*बँकेच्या १२५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अवयवदान संकल्प
बुलडाणा, दि. १९ : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा सहकार कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात बँकेच्या १२५ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अवयवदानाचा संकल्प केला.
जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार धीरज लिंगाडे, आमदार संजय रायमुलकर, रेखाताई खेडेकर, तोताराम कायंदे आदी उपस्थित होते. बँकेचे प्राधिकृत अधिकारी व्ही. के. लहाने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी श्री. जाधव यांचा सत्कार केला.
यावेळी श्री. जाधव यांनी राजकीय जीवनाची सुरुवात सहकारापासून केली असल्याचे सांगितले. विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम केले. तसेच मेहकर अर्बन बँकेची स्थिती सुधारण्यासाठी मोलाचे कार्य केले असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा बँकेमध्ये ठेवी ठेवण्याचे आवाहन केले.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बँकेच्या प्रवासाला उजाळा दिला. बँकेला मिळालेले 300 कोटी रुपयाचे सॉफ्ट लोन आणि यातून जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेमध्ये ठेवी ठेवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत पदाधिकारी आणि वैयक्तीक ठेवीदारांनी तात्काळ ३ कोटी रुपये ठेवी देत असल्याचे जाहीर केले.
सुरुवातीला जिल्हा बँकेच्या १२५ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी यांनी अवयवदान करण्याचा संकल्प करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्याकडे अवयवदानाचे फॉर्म सुपूर्द केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी प्रास्ताविक केले. बँकेचे मुख्य व्यवस्थापक एस. आर. इथापे यांनी सूत्रसंचालन केले. बँकेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण चव्हाण यांनी आभार मानले.
०००००
No comments:
Post a Comment