Wednesday, 3 July 2024

DIO BULDANA NEWS 03.07.2024

 महिलांसाठी खामगाव आयटीआयमध्ये गुरूवारी रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 03 : हिंदुस्थान युनिलिव्हर लिमीटेडतर्फे खामगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थोत विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यता आला आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांकरिता खामगाव येथील आस्थापनेवर विशेष रोजगार भारती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याकरिता इन्फॉरमेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटन्स आणि कम्प्युटर ऑपरेट ॲण्ड प्रोग्रामींग ॲसिस्टंट या व्यवसायातून आयटीआय उत्तीर्ण आणि किमान १२ महिने औद्योगिक संस्थेत कामाचा अनुभव असलेल्या महिला उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, खामगाव यांनी केले आहे.

00000

आरसेटीमध्ये सेल फोन रिपेअर प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 03 : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत 30 दिवसीय मोफत सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत भोजन, निवास, चहा, नास्ता, प्रशिक्षण साहित्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थ्यांना यात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जांभरुण रोड, बुलडाणा येथे संपर्क क्रमांक ९०९६१३४५०० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000



जिल्ह्यात 11 ऑगस्टपर्यंत अतिसार नियंत्रण कार्यक्रम

बुलडाणा, दि. 03 : जिल्ह्यात दि. 1 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत अतिसिार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा सुकाणू समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या सभेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कृष्ठरोग सहायक संचालक डॉ. हरीष पवार, जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मिलींद जाधव, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, महिला बालकल्याण अधिकारी श्री. येंडोले आदी उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल राम गीते यांनी, पाच वर्षाखालील जिल्ह्यातील बालकांना अतिसार, जुलाब आजारापासून सुरक्षित करण्यासाठी ओआरएस पावडरचे पाकिट आणि अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना झींगच्या गोळ्याचे वाटप आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत वर्षाखालील बालकांना घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजन, ओआरएस पावडर पाकिट, तसेच झिंक गोळ्यांच्या साठ्याची उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ आणि कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजनाची माहिती दिली.

00000

माझी लाडकी बहिण योजनेसाठी

पोस्टात बचत खाते काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 03 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील लाभ थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांनी टपाल कार्यालयास भेट देऊन आधार लिंक बचतखाते काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. यामध्ये महिलांच्या आधार लिंक केलेल्या सक्षम खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे रक्कम जमा करण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थी महिलांना आधार लिंक बचत खाते काढणे आवश्यक आहे. आधार लिंक बचत खाते काढताना आधार संलग्न - संमती पत्र खातेधाराकाने भरून देणे गरजेचे आहे. तसेच सर्व विद्यमान बचत खातेधारकांनी आपले बचत खाते आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे. आधार लिंकमुळे इतर योजनांचेही थेट लाभ हस्तांतरण रक्कम डाकघर बचत खात्यात जमा होईल.

महिला लाभार्थीच्या बचत खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे दरमहा रक्कम जमा होण्यासाठी लाभार्थी महिला खातेदारांनी टपाल कार्यालयास भेट देऊन आधार लिंक डाकघर बचत खाते काढावे, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

00000

देगलुर येथील अपंग संस्थेत विनामूल्य प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 03 : दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या मान्यताप्राप्त नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शासकीय तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रात विनामूल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या संस्थेमध्ये 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद मुलांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यात शिवण व कर्तन कला, कम्प्युटर अकाऊंटींग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रिकेटर या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशितांच्या निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींना किंवापालकांनी दि. 25 जुलै 2024 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर, जि. नांदेड येथे किंवा ९९६०९००३६९ व 7378641136, 9403207100, 9420846887 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

निर्लेखित केलेल्या शासकीय वाहनाचा जाहीर लिलाव

बुलडाणा, दि. 03 : राज्यकर उपआयुक्त (प्रशासन), वस्तू व सेवाकर कार्यालय, खामगाव येथे निर्लेखित केलेल्या शासकीय वाहनाचा लिलाव जसे आहे तसे तत्वावर जाहिर लिलाव करण्यात येणार आहे.

सदर वाहनाचा क्रमांक एमएच 01 बीए 9919 असून खरेदी वर्ष 2004 आहे. वाहनाचा प्रकार हा अॅम्बेसेडर कार, इंधन प्रकार हा पेट्रोल असून राज्यकर उपायुक्त (प्रशासन), वस्तू व सेवा कर कार्यालय, खामगाव या कार्यालयाच्या नावावर आहे. यासाठी सिलबंद पाकीटातील निविदा दि. 19 जुलै 2024 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. सदर वाहनाचा जाहिर लिलाव दि. 25 जुलै 2024 रोजी राज्यकर उपआयुक्त (प्रशासन), वस्तू व सेवा कर कार्यालय, जयस्तंभ चौक, नांदुरा रोड, खामगाव येथे दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. लिलावाच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000 

दोन तलावाच्या मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 03 : शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहिर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाकडून नव्याने हस्तांरित झालेला घारोडा आणि पाटबंधारे विभागाचा तांदुळवाडी बंधारा पाच वर्षासाठी मासेमारी ठेक्याने देण्यात येणार आहे.

घारोडा हे 20.13 हेक्टर आणि तांदुळवाडी 10 हेक्टर हे दोन तलाव सन 2024-25 ते 2028-29 या पाच वर्षाच्या कालावधीकरिता ई-टेंडर प्रक्रियेद्वारे मासेमारी ठेक्याने देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबतचा सविस्तर तपशील mahatenders.gov.in या संकतेस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. इच्छुक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, मत्स्य कास्तकार, मत्स्य संवर्धक, खासगी ठेकेदार, व्यक्तींनी दि. 16 जुलै 2024 रोजी दुपारी 5.30 वाजेपर्यंत निविदा सादर करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, प्रशासकीय इमारत, बस स्टँडसमोर, धाड रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त सु. ग. गावडे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment