Thursday, 18 July 2024

DIO BULDANA NEWS 15.07.2024










 नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटू नये 

-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
बुलडाणा, दि. 15 : खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या.
श्री. जाधव यांनी आज कोलोरी, पिंपरी गवळी येथे नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे आदी उपस्थित होते.
श्री. जाधव म्हणाले, खामगाव तालुक्यातील 11 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी झाली नसलेल्या पारखेड मंडळातील ज्या भागात जास्त पाऊस झालेला आहे, तेथीलही पंचनामे करण्यात यावे. स्थानिक पातळीवर पंचनामे करताना शेतजमीन काढून जाणे आणि शेतामध्ये पाणी साचणे, पिकांचे नुकसान याचे वेगवेगळे पंचनामे करण्यात यावे. तालुक्यात 838 हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन केलेल्या पंचनाम्याचे अहवाल ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे आणि हे अहवाल चावडीवाचन करून नागरिकांना सांगावे.
शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यावरच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानाची मदत मिळत असल्याने खरीप पिक आणि फळबागा यांचे व्यवस्थित पंचनामे करावे. साधारणतः 242 कुटुंबे पुराच्या पावसामुळे बाधित झाले आहे. त्यामुळे त्यांचाही अहवाल शासनाकडे सादर करावा. गतीने पंचनामे होण्यासाठी इतर भागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी याची पंचनाम्याकरिता नियुक्ती करण्यात यावी. नुकसान झालेल्या घरांसाठी दहा हजार रुपयाची मदत मिळत असल्याने यासाठीही शासकीय यंत्रणेने व्यवस्थितरित्या पंचनामे करावेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकाच्या पंचनाम्यासाठी स्थायी आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही आदेशाची गरज नाही. तलाठी आणि मंडळ अधिकारी स्वतः नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करून शासनाकडे सादर करू शकतात. तालुक्यात पर्जन्यमान मापन यंत्रे सुव्यवस्थेत असल्याची खात्री करावी. पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर नुकसान भरपाई मिळते. पिंपरी गवळीमध्ये 200 , तर कोलोरी येथे शंभर हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे याचे तातडीने पंचनामे करण्यात यावे. स्थानिक नागरिकांनी पंचनाम्यासाठी सहकार्य करावे. तसेच नुकसान झालेल्या एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
00000

आदिवासी उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 15 : आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प यांच्यातर्फे स्पर्धा परिक्षेचे विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
सदर प्रशिक्षण कालावधी दि. 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत साडेतीन महिन्याचा राहणार आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 1 हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक आदिवासी उमेदवारांनी दि. 31 जुलै रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
 प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दि. 30 जुलै 2024 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प, परतवाडा जि. अमरावती कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार आहे. याच ठिकाणी उमेदवारांच्या निवडीसाठी बुधवार, दि. 31 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. याच दिवशी निवड यादी सायंकाळी 5 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, उमेदवार किमान वय १८ ते ३० दरम्यान असावे, उमेदवार किमान एसएससी परीक्षा उत्तीर्ण असावा, उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी 07223-221205, मोबाईल 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment