विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
मतदारांनी मतदान यादीत नाव असल्याची खात्री करावी
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याचे घोषित केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 25 जुलै 2024 रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त दावे आणि हरकती स्विकारून निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार मंगळवार, दि. 25 जून ते बुधवार, दि. 24 जुलै 2024 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदारयादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराकडून योग्य छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे, तसेच विभाग, भाग यांची नव्याने रचना, मतदानकेंद्राच्या सीमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमात गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे, गुरूवार, दि. 25 जुलै 2024 ते शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2024 दरम्यान दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहणार आहे. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार रोजी विशेष मोहिमांचा कालावधी राहणार आहे. सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणारे आणि अद्याप मतदार नोंदणी केलेली नसलेल्या युवाना मतदार नोदणीची संधी प्राप्त होणार आहे. त्यानुसार नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात voters.eci.gov.in आणि वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करून सादर करू शकतात. ऑफलाईन स्वरूपात संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. सदर अर्ज आणि लिंक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
दि. २३ जानेवारी २०२४ आणि दि. 4 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर electoralsearch.eci.gov.in जाऊन यादीतील आपले नाव तपासावे. सर्व तपशील योग्य असल्याची खात्री करावी. आपल्या मतदारयादीतील तपशिलामध्ये दुरूस्ती असल्यास कार्यक्रमानुसार नमुद कालावधीत संपूर्ण कार्यवाही करावी.
तसेच नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या महिला, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. दि. 25 जून 2024 ते दि. 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बीएलओ घरी येणार असून याआधी अनावधनाने मतदारयादीतून नावाची वगळणी झाली असल्यास बीएलओ यांच्याकडे किंवा ऑनलाईन स्वरूपात नमुना 6 भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.
नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. उपरोक्त कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांच्या सोबत संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त चर्चासत्र
बुलडाणा, दि. 24 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा विविध एकविध खेळ संघटनेतर्फे रविवारी, दि. 23 जून 2024 रोजी बुलडाणा तालुका क्रीडा संकुलात सायंकाळी 5 वाजता ऑलिम्पिक दिनानिमित्त चर्चासत्र पार पडले. यावेळी प्रा. डॉ. मनोज व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत इलग उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी जागतिक ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून 23 जून रोजी ‘ऑलिम्पिक डे’ साजरा करण्यात येतो. त्यानुसार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सन 1952पासून ‘ऑलिम्पिक डे’ आणि ऑलिम्पिक सप्ताह साजरा करीत असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. व्यवहारे यांनी, जगभरातील खेळाडूना सर्वोत्कृष्ट बनविण्याच्या हेतूने प्रोत्साहन देणे आणि प्रवृत्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात येतो. ऑलिम्पिक खेळाविषयी जनजागृती करण्याचे आणि क्रीडा प्रचार व प्रसार करुन, तळागाळातील विद्यार्थी व खेळाडूंना ऑलिम्पिक खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे सुध्दा आवाहन त्यांनी केले. श्री. इलग यांनी, खेळाडूंना खेळाविषयी आवड निर्माण होईल व आपला जिल्हा, राज्य, देश खेळामध्ये निश्चित अव्वल स्थानावर राहील आणि अनेक शाळांमधून स्व. खाशाबा जाधव यांच्या सारखे ऑलिम्पिक पदक विजेते महाराष्ट्रातून घडण्यास प्रोत्साहन मिळेल असे सांगितले.
जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून श्री. महानकर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरात 27 आंबा व इतर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी डिगांबर पाटील, डॉ. सतीश मुंढे, प्रदीप शिंगणे, यमुना गडदे, नितीन आघाव, विनोद गायकवाड उपस्थित होते.
00000
आरसेटीमध्ये योग दिवस साजरा
बुलडाणा, दि. 24 : सेंट्रल बँक सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार, दि. 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
योग दिनानिमित्त आरोग्याचे महत्व आणि काळजी कशी ठेवावी याबाबत संस्थेचे संचालक श्री. पोटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आरसेटी येथे सुरु असलेल्या ब्युटीपार्लर प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.
00000
खादी ग्रामोद्योगच्या नॉर्मल, सीबीसी योजनेत दंड व्याज माफी
बुलडाणा, दि. 24 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नॉर्मल व सीबीसी योजनेंतर्गत दंडव्याज माफी देण्यात आली आहे.
मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोर्टीयम बँक फायनान्स या दोन्ही योजनांसाठी मंडळाने दंडव्याज माफी जाहिर केली आहे. या योजनेतील थकीत कर्जदार आहेत, त्यांनी एकरकमी भरणा केल्यास दंड व्याज माफी संबंधितांना लागू होणार आहे. या दंडव्याज माफी योजनेचा कर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
0000
आदिवासी मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
बुलडाणा, दि. 24 : आदिवासी विकास विभागाच्या बुलडाणा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकरावी व पुढील शिक्षणाकरिता प्रथम वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थिंनींना ऑनलाईन अर्ज swayam.mahaonline.gov.in
प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता जातीचे वैधता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, बुलडाणा शहरातील प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, फिटनेस मेडिकल सर्टीफीकेट, सन 2023-24चा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेचे आधारसंलग्न बँक खाते पासबुक किंवा पोस्ट बँक पासबुकची झेरॉक्स. रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी अचूकपणे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
विद्यार्थिनींनी अर्जामध्ये स्वतःचा किंवा पालकांचा मोबाईल नंबर नोंद करावा. हा मोबाईल नंबर बँक खात्यासोबत, तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वतःचे नाव नोंदणी करताना ते आधार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झाला नसल्याची खात्री करावी. विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्जामध्ये बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर बँक खाते सुरू असल्याची प्रत्यक्ष बँकेत जाऊन खात्री करण्यात यावी.
वसतिगृह प्रवेशाकरीता अधिक माहितीसाठी वसतिगृह कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
000000
जिल्हा रूग्णालयात जागतिक रक्तदान दिवस साजरा
बुलडाणा, दि. 24 : जिल्हा रूग्णालयातील रक्त केंद्र येथे जागतिक रक्तदान दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने स्वच्छेने रक्तदान करणाऱ्यांविषयी कृतज्ञता आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
या वर्षीच्या जागतिक आरोग्य संस्थेचे घोषवाक्य ‘२० वर्षे दानाचा उत्सव साजरा करत आहोत, धन्यवाद रक्तदात्यानो’ हे आहे. जागतिक रक्तदान दिन साजरा करण्याचा उद्देश राष्ट्रीय रक्त कार्यक्रमाची उपलब्धी, राष्ट्रीय रक्त कार्यक्रमात असणारी आव्हाने याची नागरिकांना माहिती व्हावी, स्वैच्छिक नि:शुल्क आणि निरंतर असणारी रक्ताची गरज पूर्ण करून सार्वत्रिक सुरक्षित रक्त संक्रमण उपलब्ध करणे, सर्वसामान्य जनता आणि तरुणांनी निरंतर रक्तदान करावे यासाठी पोषक वातावरण निर्मितीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येते.
रक्तदान दिनानिमित्त शहरातून शासकीय नर्सिग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून रक्तदानाविषयी माहिती दिली. तसेच रक्तदात्यांची नोंदणी करून रक्त संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच रक्त संबंधित प्रतिज्ञा वाचन करण्यात आली. रक्त संकलन, रक्त संक्रमण आणि रक्त विघटन याविषयी माहिती प्राप्त व्हावी आणि रक्ताच्या उपलब्धतेची माहिती व्हावी, यासाठी डिजिटल उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्राची तायडे यांच्या हस्ते रक्त केंद्राच्या यूट्यूब चॅनलचे अनावरण करण्यात येणार आहे. महिनाभरातील उपक्रमाद्वारे रक्तगट तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे.
सदर उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. उपक्रमांसाठी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्राची तायडे, टेक्निकल सुपरवायझर विनोद झगरे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी गौरव कुलकर्णी, विष्णू मुंढे, रक्तपेढी तंत्रज्ज्ञ आकाश जाधव, पूजा बनकर, अनिल घोडेस्वार हे पुढाकार घेत आहेत.
जागतिक रक्तदाता दिवसानिमित संपूर्ण जून महिनाभ विविध कार्यक्रम राबवले जात आहेत, यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. प्राची तायडे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment