Tuesday, 18 June 2024

DIO BULDANA NEWS 18.06.2024

 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 18 : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 च्या पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्य, तसेच जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

पिक स्पर्धेत जिल्ह्याकरिता खरीप हंगामासाठी मुग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ज्वारी, भूईमूग व सुर्यफुल पिके स्पर्धेसाठी समाविष्ट केली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर शेतजमीन असणे व ती जमिन स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिक स्पर्धांमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिक स्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील, ते सर्व शेतकरी पिक स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. स्पर्धेकरीता सर्वसाधारण गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रूपये प्रवेश शुल्क राहणार आहे.

मुग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2024, सोयाबीन, तूर व मका पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 31 ऑगस्ट 2024, आहे. पिक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा व आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.

पिक स्पर्धामध्ये राज्य ते तालुकास्तरावरील विजेत्या स्पर्धकास ज्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे, त्यास्तरावरील त्या क्रमांकाच्या खालचास्तर व क्रमांकाकरीता स्पर्धकास त्याच पिकासाठी पुढील पाच वर्षे स्पर्धक म्हणून बक्षिसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. तथापि विजेतास्तरावरील त्या क्रमांकाच्या वरील स्तर व क्रमांकाकरीता स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षिसासाठी पात्र राहणार आहे.

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप हे सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम ही तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार रूपये, दुसरे बक्षीस तीन हजार  रुपये, तिसरे बक्षीस 2 हजार रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रूपये, तिसरे बक्षीस 5 हजार रूपये, तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार  रुपये व तिसरे बक्षीस 30 हजार रुपये याप्रमाणे आहे.

पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. मुग आणि उडीद पिकासाठी दि. 31 जुलै 2024 आणि सोयाबीन, तूर, मका ज्वारी, बाजरी, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी दि. 31 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज सादर करून पिकस्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

000000

खामगाव, मलकापूर येथे करिअर शिबीर

बुलडाणा, दि‍. 18 : खामगाव आणि मलकापूर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर गुरूवार, दि. 20 जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगावच्या वतीने खामगव येथील कोल्हटकर स्मारक मंदिर, केला हिन्दी शाळेच्या मागे येथे सकाळी ११ वाजता शिबिर घेण्यात येणार आहे. आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होईल. या शिबीरास जिल्हा, तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी केले आहे.

नांदुरा आणि मलकापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरूवार, दि. 20 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजेश एकडे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. करीअर मार्गदर्शक सचिन वारूळकार मार्गदर्शन करतील. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

लोणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया

बुलडाणा, दि‍. 18 : लोणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावर्षीची प्रवेश प्रक्रिया ३ जूनपासून ऑनलाईन स्वरुपात सुरु झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक संचालनालयाचे संकेतस्तळ admission.dvet.gov.in जाहीर केले आहे. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्राची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. ही सर्व कामे आयटीआयमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना माफक दरात करून मिळतील.

यावर्षी प्रवेशासाठी लोणार आयटीआयमध्ये ५ व्यवसाय उपलब्ध आहेत. यात ड्रेस मेकिंग, कोपा, वायरमन, फिटर, वूड वर्क टेकनिशियन हे व्यवसाय प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यावर्षी लोणार आयटीआय मध्ये ऐकून १०८ जागांसाठी प्रवेश होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करून आपला प्रवेश निश्चित करावा. अर्ज भरल्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहून अर्ज निश्चित करता येणार आहे. त्या विद्यार्थ्याचा प्रवेश संदर्भातील पाठपुरावा त्या आयटीआयची यंत्रणा करणार आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्याना नोंदविलेला दूरध्वनी क्रमांक आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना केंद्राच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करताना हा मोबाईल क्रमांक लॉगीन असणार आहे. त्यामुळे हॉल तिकीट, परीक्षा विषयक माहिती, तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे. यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरु ठेवणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरु ठेवणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे अर्जावर काळजी पूर्वक मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. प्रशिक्षणार्थ्याना उत्पनाच्या आधारे दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे. प्रवेशासंदर्भातील माहितीसाठी ९७६६७६२८९८, ९७६५०२७३७६, ९८२३३१४८७२, ७८७५०८९०११, ७४४७४५२९५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000



जिल्हा स्त्री रूग्णालयात 11 जणांवर दंडात्मक कारवाई

बुलडाणा, दि‍. 18 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्त्री रूग्णालयात 11 जणांवर कारवाई करण्यात आली. यात त्यांच्यावर एक हजार 600 रूपयांचा दंड आकारण्यात आला.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्त्री रुग्णालय आणि परिसरात तंबाखू, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ खाताना आढळल्यास त्यांच्यावर कोटपाच्या कलम चार नुसार 11 जणांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यात 1 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला. यासाठी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली.

00000

खामगाव आयटीआयमध्ये महिला रोजगार मेळावा

बुलडाणा, दि‍. 18 : खामगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 28 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत मॉडेल करियर सेंटर बुलडाणा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन खामगाव आयटीआयमध्ये करण्यात आले आहे.

सदर ‍महिला रोजगार मेळाव्यात हिंदुस्थान युनीलीव्हर लिमिटेड, खामगाव या उद्योजकांनी त्यांच्याकडील आयटीआय इलेक्ट्रिशियन, इंस्ट्रुमेंटेशन, ‍फिटर या पदांसाठी फक्त महिलांसाठी 15पेक्षा अधिक पदे अधिसुचित केली आहेत. तसेच एलआयसी इंडियाच्या विमा अभिकर्ता पदासाठी देखील 20 पदे  अधिसूचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे गरजू व रोजगार इच्छुक ‍महिला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुद्धा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली असलेल्या अथवा नसलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर महिला उमेदवारांनी दि. 28 जून 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जलंब रोड, खामगाव, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे आणि रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करुन घ्यावी.

पात्र, गरजू व नौकरी इच्छुक महिला उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीताही अर्ज करु शकतात. तरी इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. याचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा 07262-242342 दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

00000

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजना

*12 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम पोटजातीतील नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी दि. 12 जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित बुलडाणा मार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, म्हणून समाजातील गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे, ज्या व्यवसायाचे प्रशिक्षण हवे, त्या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्याकरीता 400 प्रशिक्षण योजनेचे उद्द‍िष्ट प्राप्त झाले आहे. यासाठी इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा जिल्हा कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

अर्जासोबत अर्जदाराने जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा, अर्जदाराचा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न मर्यादा ३ लाखापर्यंत तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा, नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो, रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, मतदान कार्ड, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, प्रशिक्षणार्थी मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा, प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ५० वर्षे असावे, प्रशिक्षणार्थिंनी यापूर्वी शासन, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल, प्रशिक्षणार्थींना आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा लागणार आहे.

00000

पिक विम्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत

बुलडाणा, दि. 18 : प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. शासनाच्या निर्णयानुसार ही योजना लागू करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगाम 2024 साठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घेऊन पिक विमा भरावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना तीन वर्ष म्हणजेच सन 2023-24, 2024-25 व 2025-26च्या खरीप आणि रब्बी हंगामातील अधिसूचित पिकांकरीता लागू राहणार आहे. या योजनेत खरीप हंगाम सन 2024-25 अंतर्गत मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन, मका, कापूस आणि तूर या पिकांकरिता पीक विमा भरण्याची अंतिम मुदत दि. 15 जुलै 2024 असून यासाठी केवळ 26 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रूपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता सर्वसमावेशक पीक विमा योजना सन 2023-24 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. खरीप हंगाम सन 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करिता शासनाने मान्यता दिली आहे. खरीप हंगाम सन 2024-25 अंतर्गत सदर योजनेत सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे.

जिल्ह्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एक रूपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment