राखून ठेवलेले बियाणे विक्रीस उपलब्ध
बुलडाणा, दि. 06 : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करूनच पेरणी करणे आवश्यक नाही. परंतु सोयाबीन या पिकांमध्ये स्वपराग सिंचन होत असल्याने कोणतेही संकरित वाण उपलब्ध नाही. त्यामुळे सरळ वाणांचे बियाणे एकदा विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे बियाणे आपण पुढे दोन वर्ष बियाणे म्हणून वापरता येते. त्यामुळे अनावश्यकपणे बाजारामधून दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात राखून ठेवलेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. सोयाबीन वाणाचे नाव आणि शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले बियाणे पुढीलप्रमाणे उपलब्ध आहेत. यात जे. एस ३३५ -१,५०,१०६ क्विंटल, फुले संगम – १,३५,४१५, फुले किमया – ६४,५५६, एम.ए.यु.एस ६१२ -४,०८२, ए.एस.९३०५ – २९,१३५, एम.ए.यू.एस ७१ – १०,५१२, एम.ए.यु.एस १६२ – ९,२२३, ग्रिनगोल्ड - ८,९२७, रुची १००१ – १३,०८३, एम.ए.यु.एस १५८ – ४,६३०, के.डी.एम.चंद्रा – ३,२८१, फुले द्रुवा – २,१०१, अंकुर - १,५३८, रवी – १,१४०, पिडीकेव्ही-अंबा - ८८९, फुले द्रुवा के.डी.एम ९९२ – १,२२८, जे.एस ९५६० - ७९२, ३३४४ - ७२५, एम.ए.यु.एस ११८८ - ४२८, बुस्टर - ४०५, इतर वाण – ३,३१३ असे एकूण ४ लाख ७५ हजार ५०९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत.
00000
सूक्ष्म सिंचन योजनेच्या लेखापरीक्षणासाठी
सनदी लेखापाल यांच्याकडून प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. 06 : कृषि विभागाच्या विविध योजनांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. यासाठी सनदी लेखापाल यांच्याकडून दरपत्रक मागविण्यात आले आहे. इच्छुकांनी यासाठी दरपत्रक सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, प्रती थेंब अधिक पिक योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आणि अटल भूजल योजनेचा सन २०१९-२० ते २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त निधी आणि त्यानुसार खर्चाबाबतचे लेखापरीक्षण आणि लेखांकनासाठी दोन स्वतंत्र सनदी लेखापाल यांची निवड करावयाची आहे.
जिल्हास्तरावर लेखापरीक्षण व लेखांकनाचे काम पूर्ण करावयाचे आहे. यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलडाणा यांच्यातर्फे दि. १३ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद लिफाफ्यामध्ये दरपत्रक सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
आरसेटीमध्ये पर्यावरण दिन साजरा
बुलडाणा, दि. 06 : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी रोहित गाडे अध्यक्षस्थानी होते, तर आरसेटी संचालक संदीप पोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. गाडे यांनी, निसर्ग हा पोषक, प्रेमळ आणि आलिंगन देणारा आहे. हे आपल्याला जगण्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने प्रदान करतो. शारीरिक आणि मानसिक निरोगीपणासाठी, निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम मदत करण्यासाठी परिपूर्ण असल्याचे सांगितले. आरसेटी संचालक श्री. पोटे यांनी, मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास केल्यामुळे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरले आहे. आता आपण निसर्गाकडे वळावे आणि त्याचे जतन करण्यास सुरवात करावी, असे आवाहन केले. यावेळी आरसेटीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
000000
बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
*कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 06 : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून देयकासह खरेदी करावे. बिलावर बियाण्याचा संपूर्ण तपशील यात पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत व आपण स्वत: बिलावर सही, अंगठा देवून विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची बिले व त्यातील थोडे ओंजळभर बियाणे पिकाची कापणी होईपर्यत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीटे, बॅग सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची बॅगवरील अंतिम मुदत पाहून घ्यावी.
कमी वजनाच्या निविष्ठा, तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कृषि अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, कृषि विकास अधिकारी बुलडाणा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
सन्मान निधीच्या लाभासाठी ईकेवायसी करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 06 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ जुलै २०२४च्या शेवटी वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रलंबित ईकेवायसी तात्काळ करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ४ हजार ७८९ शेतकऱ्यांची ईकेवायसी आणि ४ हजार ८४१ शेतकऱ्यांचे आधार सीडींग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ईकेवायसी आणि आधार सीडींग व बँक खात्याला डीबीटी जोडणी करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डीबीटी जोडणी करण्याचे काम तात्काळ पूर्ण करावे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ईकेवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे. ईकेवायसी आणि आधार सीडींग अभावी शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक, गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
सैनिकी वसतिगृहातील उपहारगृहासाठी प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. 06 : चिखली रस्त्यावरील सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील भोजन कक्ष उपहार गृहासाठी भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.
चिखली रोडवरील लक्ष्मी माता मंदिराजवळ सैनिकी मुलांचे वसतिगृह आहे. याठिकाणी माजी सैनिकांच्या उपचाराकरीता इसीएचएस कार्यान्वित आहे. इसीएचएसमध्ये दररोज सुमारे 150 माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांचे अवलंबित उपचार व योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात. सैनिकी मुलांच्या वसतिगृहाजवळ 1 किलोमीटर अंतराच्या आत अल्पोपहाराकरीता कोणतेही उपहारगृह उपलब्ध नाही. त्यामुळे वसतिगृहातील भोजनकक्ष भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक महिला बचतगट, माजी सैनिक विधवा आणि इतर नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भोजनकक्ष भाडेतत्वावर देण्यासाठी माजी सैनिक महिला बचत गट, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, इतर नागरीक असा प्राधान्यक्रम राहणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे दि. 20 जून 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
00000
अतिसार नियंत्रण पंधरवाड्याची पाडळीत सुरवात
बुलडाणा, दि. 06 : जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रम दि. ६ ते २१ जून राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळी येथे आज करण्यात आला.
यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव यांनी ५ वर्षापर्यंतच्या बालकांना अतिसार, जुलाब आजारापासून सुरक्षित करण्यायासाठी ओआरएस पावडर आणि अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना झिंक गोळ्यांचे वाटप आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी वाटप करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ओआरएस पावडर तसेच झिंक गोळ्यांच्या साठ्याची उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रसिद्धी विस्तार व माध्यम अधिकारी यांनी आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य शिक्षण प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन कले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील जबरे, डॉ. नितीन कदम, अर्चना ईंगळे, आर. के. जाधव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल आदी उपस्थित होते.
00000
जिल्हा परिषद सरळसेवा भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध
बुलडाणा, दि. 06 : ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील गट-क मधील विविध संवर्गातील राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदभरतीची प्रवेशपत्रे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सदर सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 करीता आरोग्य सेवक (पुरुष) या संवर्गाची परिक्षा दि. 10 जून 2024 ते 12 जून 2024 या कालावधीत होणार आहे. या संवर्गातील परिक्षेकरीता प्रवेशपत्रासाठी जिल्हा परिषदेच्या zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असल्याचे नोडल अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment