लोकसभा निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी
बुलडाणा, दि. 2 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला. त्यानुसार 5 बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. 4 जून 2024 रोजी करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरवात करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. 4 जून 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गणेश नगर, मलकापूर रोड, बुलढाणा येथे सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या बाबतची नोंद सर्व निवडणूक लढविणारे उमेदवार, प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
बुलडाणा, दि. 2 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिवस साजरा करण्यात आला. उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्ये उपस्थित होते. पोलिस उपअधिक्षक मेहबूब खान, अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्री. वसावे, जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोगंटे, दंत शल्य चिकित्सक डॉ. वैष्णव, जिल्हा सल्लागार तथा समुपदेशक लक्ष्मण सरकटे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक श्री. उपाध्ये यांनी, कुठलेही व्यसन हे वाईट असून माणसाने चांगल्या गोष्टीचं व्यसन करावे. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि मेहनतीने ध्येय गाठावे. उपजिल्हाधिकारी श्री. शेलार यांनी, कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून या गोष्टीचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आणून द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सिग्नेचर कॅम्पियनने करण्यात आले. त्यानंतर नर्सिंग कॉलेजच्या मुलींची चित्र प्रदर्शनी दाखवण्यात आली. तसेच महिनाभरात आयोजित उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. गव्हरर्मेंट नर्सिंग कॉलेजच्या मुलींनी तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण यावर आधारित रांगोळी रेखाटली व पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाला विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख यांनी प्रास्ताविक केले. पुनम क्षीरसागर यांनी आभार मानले.
000000
शेतकऱ्यांनी पीक कर्ज नुतनीकरण करावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 2 : खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पिक कर्जाचे अत्यल्प वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज मिळविण्यासाठी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. यात यावर्षी पीक कर्ज वाटपाची गती नगण्य असून 1 हजार 500 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. मात्र अद्यापपर्यंत 244 कोटी वितरीत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून केंद्र आणि राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा. 30 जून पूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याज लागते. तसेच 10 टक्के वाढीव कर्ज मिळत असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा. पीक कर्ज नुतनीकरणामुळे खरीप पिकासाठी लागणाऱ्या खर्चास मदत होते. पीक कर्जाच्या नुतनीकरणासाठी प्रत्येक बँक शाखेमध्ये विशेष खिडकी उघडण्यात आली आहे. नुतनीकरणासाठी सात बारा, आठ अ, आधार कार्ड, रेव्हेन्यू स्टॅम्प आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.
पीक कर्जाचे नूतनीकरण शेतकऱ्यांना फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज नूतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment