Thursday, 27 June 2024

DIO BULDANA NEWS 27.06.2024

 उत्पादकता वाढ, मूल्यसाखळी विकास योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : महाडीबीटी पोर्टलवर राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येणार आहे.

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन. नैनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. यासाठी दि. १२ ते ३० जून २०२४ पर्यंत अर्ज करावे लागणार आहे. मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी दि. १२ ते २३ जून २०२४ पर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १२ जून २०२४ पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर farmer login मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

00000

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त

जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम

बुलडाणा, दि. 27 : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम दि. २६ जून  ते दि. २ जुलै २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील २०२४-२५ मधील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दि. २६ जून ते २ जुलै २०२४ या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेचे ई-मेल आले आहेत, त्यांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटीची पुर्तता करुन योग्यरित्या जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे.

जिल्ह्यातील अकरावी आणि बारावी विज्ञान शाखा, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील सन २०२४-२५ मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

खामगाव येथील युवा शक्ती करिअर उत्साहात

बुलडाणा, दि. 27 : खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर कोल्हटकर स्मारक मंदिरात उत्साहात पार पडले.

 आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य एस. डी. गंगावणे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य पी. के. खुळे, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. धनंजय तळवळकर, प्राचार्य नंदा उदापूरकर, अशोक गायकी, श्री. बेलसरे यांच्या उपस्थित होते. शिल्पनिदेशक व्ही. टी. अंजनकर यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पनिदेशक एस. एच. बेलसरे यांनी आभार मानले.

00000

समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिन साजरा

बुलडाणा, दि. 27 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद, समाज कल्याण येथून रॅली, तसेच समता दिंडी काढण्यात आली. तसेच नशामुक्तीबाबत चित्र प्रदर्शन स्टॉल उभारण्यात आले. सदर रॅली आणि समता दिडींला समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी हिरवी झेंडी दाखविली. दिंडीची सुरुवात जिल्हा परिषद कार्यालयातून करण्यात आली. तसेच राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येंडोले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शाहू महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलनाने करण्यात आले. सुरुवातीला व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. डॉ. राठोड यांनी प्रस्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अस्मिता ठोंबरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व शेती कार्याचा उल्लेख केला. समाजाला तारण्यासाठी शाहू महाराज यांच्या विचारांची गरज समाजाला आहे. छत्रपती शाहू महाराजाचे शासन म्हणजे लोककल्याणकारी प्रशासक होते. त्याचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या घटनेच्या माध्यमातून समाजामध्ये रोवला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने जीवनाची दिशा ठरवावी, असे सांगितले.

शाहीर डी. आर. इंगळे आणि शाहीर गणेश कदम यांच्या कलासंचाने छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याच्या थोरवीची गीते सादर केली. यावेळी समाज कल्याण विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 तालुका समन्वयक सतिश बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी, नर्सिग महाविद्यालयाचे विद्यार्थी, समाज कार्य महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय निवासी शाळा आणि  शासकीय वसतिगृह गृहपाल व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

00000

No comments:

Post a Comment