मिशन ग्रीन बुलडाणाचा शुभारंभ
बुलडाणा शहराला गतवैभव प्राप्त करून देणार
-आमदार संजय गायकवाड
बुलडाणा, दि. 26 : थंड हवेचे ठिकाण म्हणून बुलडाणा शहर प्रसिद्ध होते. मात्र गेल्या काळात इतरत्र जाणवणारा उन्हाळा शहरातही जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियानात शहरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात येत आहे. यासाठी मिशन ग्रीन बुलडाणा राबविण्यात येत आहे. या मिशनच्या माध्यमातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली.
मिशन ग्रीन बुलडाणाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. पेंटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे आदी उपस्थित होते.
श्री. गायकवाड म्हणाले, देशात चंदीगड, इंदौर यासारखी प्रगत शहरे आहेत. याठिकाणी नियोजनबद्ध विकास करताना झाडेही लावण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. बुलडाणा शहराचा विकास करताना शहर अतिक्रमण मुक्त करावे. त्यासोबतच विकासात्मक कामे करताना शहरातील हिरवळ वाढविण्यासाठी झाडांचे संवर्धन करावे. शहरातील 65 भूखंडांवर विविध प्रजातींची झाडे लागवण्यात येणार आहे. ही झाडे जगविण्यासाठी दोन वर्षे पाणी आणि संरक्षणाची काळजी घेतली जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, शहरातील झाडे लावण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. इतर ठिकाणी शहरात झाडे लागवड करण्यात येतात, त्याचप्रमाणे शहरात झाडांची लागवड व्हावी. शहरातील हिरवळ टिकून राहण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एक झाड लावून ते दत्तक घ्यावे. यावर्षी प्रशासनामार्फत पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आमदार श्री. गायकवाड यांनी झाडांविषयी माहिती दिली. तसेच वृक्ष लागवडीचे नियोजन सांगितले.
00000
जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन
बुलडाणा, दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, तहसिलदार संजिवनी मुपडे, माया माने, नायब तहसिलदार प्रमोद करे, नाझर गजानन मोतेकर उपस्थित होते.
00000
नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणारे आणि अद्याप मतदार नोंदणी केलेली नसलेल्या युवाना मतदार नोंदणीची संधी प्राप्त होणार आहे. यासाठी मतदारयादीत नसलेल्या नागरिकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, नायब तहसिलदार संजय बंगाळे आदी उपस्थित होते.
नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात voters.eci.gov.in आणि वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करून सादर करावा. ऑफलाईन स्वरूपात संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. यासाठी अर्ज आणि लिंक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे अथवा टोल फ्री क्रमांक 1950 वर मतदारांनी मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
तसेच नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या महिला, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. दि. 25 जून 2024 ते दि. 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बीएलओ घरी येणार असून याआधी अनावधनाने मतदारयादीतून नावाची वगळणी झाली असल्यास बीएलओ यांच्याकडे किंवा ऑनलाईन स्वरूपात नमुना 6 भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार मंगळवार, दि. 25 जून ते बुधवार, दि. 24 जुलै 2024 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदारयादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराकडून योग्य छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे, तसेच विभाग, भाग यांची नव्याने रचना, मतदानकेंद्राच्या सीमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमात गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे, गुरूवार, दि. 25 जुलै 2024 ते शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2024 दरम्यान दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहणार आहे. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार रोजी विशेष मोहिमांचा कालावधी राहणार आहे. सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 25 जुलै 2024 रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त दावे आणि हरकती स्विकारून निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदार यादीत नाव तपासावे व नाव नसल्यास तात्काळ त्या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांच्या सोबत संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
अनुसूचित जातीच्या मुला- मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
बुलडाणा, दि. 26 : अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2023-24 या वर्षीसाठीही राबविण्यात येणार आहे. यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 12 जुलै 2024 आहे. पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षि शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती सुरु केली आहे. यात प्रतिवर्षी 75 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. तसेच अन्य सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यासाठीही शासनाच्या विविध विभागांकडून परदेश शिष्यवृत्ती योजना राबविली जाते.
या योजनेबाबत maharashtra.gov.in संकेतस्थळावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
00000
शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
बुलडाणा, दि. 26 : गेल्या वर्षी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना ‘राईट टू गीव्ह अप’चा टॅप उपलब्ध करून देण्यात आला होता. शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांकडून हा टॅब दाबल्या गेला. परिणामी विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागले. अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज रिव्हर्ट बॅक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत सन 2023-24 या वर्षाकरीता महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे सुरु आहे. अर्ज स्वीकृती मॉड्युलमध्ये महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये ‘राईट टू गीव्ह अप’चा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला होता. शिष्यवृत्तीचा लाभ कायमस्वरुपी थांबविण्याची किंवा सोडून देण्याची तुमची इच्छा असली तरच ‘राईट टू गिव्ह अप’ हे बटन दाबावे, असा त्यावर उल्लेख आहे. सदर सुविधा प्रणालीवर नव्याने प्रथमत:च उपलब्ध करुन दिलेली असल्याने सदर टॅब अनेक विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञेतून किंवा नजर चुकुन क्लिक झाला होता. पर्यायाने असे विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्कापासून वंचित राहत होते.
याबाबत झालेल्या एकत्रित मागणीचा विचार करून माहिती व तंत्रज्ञान विभागाने राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अनावधानाने किंवा नजरचुकीने ‘राईट टू गीव्ह अप’चा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्द झालेले असतील, अशा विद्यार्थ्यांना त्याचा अर्ज रिव्हर्ट बॅक करण्याची सुविधा रिव्हर्ट राईट टू गिव्ह अप सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दि. 30 जून 2024 पर्यंत याबाबत अंतिम कार्यवाही करावी लागणार आहे.
याबाबत विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीनमधून आपले अर्ज रिव्हर्ट बॅक करुन घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित मुदतीत विद्यार्थ्याच्या लॉगीनमधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी उपरोक्त पर्यायाचा अवलंब करुन त्यांचे शिष्यवृत्ती अर्ज विहित मुदतीत रिव्हर्ट बॅक करुन घ्यावे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करावे. याबाबत अडचण असल्यास समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज घेण्यास सुरवात
बुलडाणा, दि. 26 : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य व तेलताड योजनेमध्ये फ्लेक्सी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच घटकासाठी अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2024-25 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके व गळीतधान्यांतर्गत फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच या बाबींसाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांचाकडून तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात आले आहेत. गोदाम बांधकाम व बीज प्रक्रिया संचाचा लाभ नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ असणाऱ्यांना आहे. त्यासाठी दि. 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. जिल्ह्यात गोदाम बांधकामासाठी चार आणि बीज प्रक्रिया संचासाठी एक लक्षांक प्राप्त आहे. सदर लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याची सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
गोदाम बांधकामासाठी जिल्ह्यांमध्ये या योजनेंतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० लाख रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्यानुसार अनुदान देण्यात येणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहील. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर व बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान देण्यात येणार आहे.
बीज प्रक्रिया संचासाठी योजनेंतर्गत उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रक्रिया संच उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रूपये यापैकी कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदाराने बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर आणि बीज प्रक्रिया संच उभारणी पूर्ण झाल्यावर अनुदान देण्यात येणार आहे.
00000
No comments:
Post a Comment