Thursday, 20 June 2024

DIO BULDANA NEWS 20.06.2024

 कापसाला 59 हजार रुपये विमा संरक्षण

बुलडाणा, दि. 20 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील सर्वसमावेशक पीक विमा योजनेत खरीप हंगाम सन 2024-25 साठी एक रूपयांत विमा काढण्यात येत आहे. अतिवृष्टी, वादळ, पूर, पावसातील खंड, काढणी पश्चात नुकसान या संकटापासून पिकांना केवळ एक रूपयात विम संरक्षण प्राप्त होणार आहे. यात कापूस पिकाला सर्वाधिक 59 हजार 983 रूपये प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सर्वसमावेशक पीक विमा योजनेतून खरीप हंगाम सन २०२४-२५ साठी मुग पिकाला २५ हजार ८१७ रूपये, उडीद पिकाला २६ हजार २५, ज्वारी पिकाला ३२ हजार १२५, सोयाबीन पिकाला 55 हजार 500, मका पिकाला ३५ हजार ५९८, कापूस पिकाला ५९ हजार ९८३, तर तूर पिकाला ३६ हजार ८०२ रूपये पिकविमा केवळ एक रूपयात प्राप्त होणार आहे.

पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई लिमीटेड नियुक्त करण्यात आली आहे. यासाठी सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, पीक पेरा, स्वयं घोषणापत्र ही कागदपत्र आवश्यक आहेत. हा विमा जन सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र याठिकाणी भरता येणार आहे. विम्याबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

00000

एनडीआरएफ पथकाकडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 20 : पुणे येथील एनडीआरएफचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक जिल्ह्यात आपत्ती  व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बुलडाणा आणि पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ ते ३० जून २०२४ पर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मंगळवार, दि. 18 जून 2024 रोजी जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, दि. 19 जून रोजी नियोजन भवनात जिल्हा शोध आणि बचाव पथकातील कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरीता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाकरिता सामान्य प्रशासनच्या तहसीलदार संजीवनी मुपडे आणि तहसीलदार माया माने उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महसूल सहाय्यक के. एस. जाधव, सांडू भगत, ऑपरेटर विष्णू बारस्कर यांनी सहकार्य केले.

उपविभागीय स्तरावरील दि. 24 ते 28 जून 2024 पर्यंत तालुक्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात पूर, वीज, आग, रस्ते अपघात, सर्पदंश याविषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक, एनडीआरएफ टीमचे पुणे येथील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जालिंदर फुंदे आणि सर्व एनडीआरएफ टीमचे सदस्य प्रशिक्षण देणार आहेत. सदर प्रशिक्षणाला तालुक्यातील आपत्तीप्रवण गावातील सरपंच, पोलिस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य सेवक, सेविका आणि विविध विभागाचे कर्मचारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी, तसेच तालुकास्तरीय शोध व बचाव पथकातील सदस्यांना प्रशिक्षण देणार आहे.

00000

विजा चमकत असताना सावधगिरी बाळगा

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 20 : मान्सून कालावधीत सोसाट्याच्या वारा, तसेच विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यस्थिती पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे सुरु असून शेतकरी, शेतमजूर, तसेच नागरिकांनी याबाबत विशेष सतर्कता बाळगावी. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता आहे. यासाठी  नागरिकांनी जिवीतहानी, प्राणहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

वज्राघातामध्ये अति वेगाने वारे, अति पर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावत, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना होते. याबाबत वस्तुस्थिती ही वीज सामान्यपणे उंच वस्तूवर पडते, कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही. परंतू काही स्थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत, मोठी बांधकामे, छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्ती वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. वज्राघात बाधीत, जखमी व्यक्तीस तुम्ही मदत करू शकता, त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्या व्यक्तीस तात्काळ, त्वरित मदत करावी.

आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाज व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करावे. स्वतःसाठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भ, तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणाशी संपर्कात रहावे. वैद्यकीय व स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन सेवांचे संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत, गडगडाटी वादळ, अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा अंदाज असल्यास घराबाहेर, घराबाहेरील क्रिया पुढे ढकलाव्यात. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकुलीत यंत्रे बंद ठेवावीत. आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किवा फांद्या काढून टाकाव्यात.

परिसरात वादळी वारे, गडगडाटी वारे, विजा चमकत असल्यास घरात राहावे. घरात असल्यास घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावेत, घराभोवतालची उंच झाडे, कुंपण यापासून दूर रहावे, मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाण, मजबूत इमारतीकडे प्रस्थान करावे, शेतीची अवजारे, मोटारसायकल आणि इतर वाहने यांच्यापासून दूर रहावे, गाडी चालवत असल्यास, सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करावा. गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठी झाडे, तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावावीत, उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहावे. जंगलामध्ये दाट, लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर असल्यास दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावे. परंतू अचानक येणाऱ्या पुरापासून सावध राहावे.

वीज पडल्यास, वज्राघात झाल्यास त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवावी, वज्राघातबाधीत व्यक्तीस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. त्याला हात लावण्यास धोका नाही, ओल्या व थंड परिस्थितीतीत बाधीत व्यक्ती व जमिनीमध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमियाचा म्हणजेच शरीराचे अति कमी तापमानाचा धोका कमी होईल. अशावेळी इजा झालेल्या व्यक्तीस हाताळताना श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान श्वास प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रूग्णाची हृदय गती सीपीआरचा वापर करून सुरु ठेवावा.

गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागेवर, टेकडीवर, मोकळ्या जागेवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टावर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्याचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाईल व इतर इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकल उपकरणे, विद्युत जोडणीस लावू नये. अशा आपत्कालीनवेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा. परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे. गडगडीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये, या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्ये करू नये, प्रवाहकीय पृष्ठभागाशी संपर्क टाळावा. धातूची तारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग आणि प्लम्बिंग नळ यांच्याशी संपर्क टाळावा

घराबाहेर असल्यास मेघगर्जनेवेळी विजा चमकताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये, वाहनाच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागात संपर्क टाळावा, अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या केबल पासून लांब राहावे, विजा चमकताना शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवावे. घराबाहेर असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाजवळ उभे राहू नये. सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

00000

पोलिस भरतीसाठी महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल

बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यातील पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी धावण्यासाठी बुलडाणा ते संभाजीनगर महामार्गावरील कोलवड येथील वाहतूक वळविण्यात आली आहे.

जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रिया दि. 19 जून ते दि. 3 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. 1600 व 800 मीटर धावण्यासाठी कोलवड येथील जाधव पेट्रोलपंपाजवळील रस्ता निश्चित करण्यात आला आहे. सदर मार्गावर वाहतूक सुरू राहिल्यास भरतीप्रक्रिया राबविण्यास अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी ठिकाणावरून वळविण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी परवानगी दिली आहे.

00000


No comments:

Post a Comment