Wednesday, 19 June 2024

DIO BULDANA NEWS 19.06.2024

 



आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात

नागरिकांनी सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 19 : दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार, दि. 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, डॉ. जयश्री ठाकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, जगभरात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस दि. 21 जून 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने ‘योग स्वयम आणि समाजासाठी’ ही टॅगलाईन निश्चित केली आहे. जिल्ह्यात योग दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुकास्तरावर तालुका क्रीडा संकुलात नियोजन करण्यात आले आहे. यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यार्थी, पोलिस, योग संस्था आणि सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. बुलडाणा येथील कार्यक्रम जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात सकाळी 6.30 वाजता घेण्यात येणार आहे.

योग दिनाच्या कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठीही युवकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

00000

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज स्विकारण्यास सुरवात

बुलडाणा, दि. 19 : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. तसेच अर्ज स्विकारण्याबाबत वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे.

योजनेसाठी वेळापत्रक जाहिर झाले आहे. त्यानुसार उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष असल्यास अर्ज स्विकारण्याची तारीख ही 20 जून 2024, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 15 जुलै 2024 आहे. तसेच निवड यादी दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष असलेल्यासाठी अर्ज स्वीकारण्याची तारीख ही 5 ऑगस्ट 2024, तर अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 20 ऑगस्ट 2024 असणार आहे. तसेच 2 सप्टेंबर रोजी निवड यादी जाहिर करण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतू इतर मागास बहुजन विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नाही, अशा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर योजनेसाठी विद्यार्थी प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी राज्याचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला, विद्यार्थी अनाथ असल्यास महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सकांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रूपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहर, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा. विद्यार्थी इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के गुण आणि दिव्यांगास ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी, दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र जोडणे आवश्यक आहे, या अटी व शती लागू राहणार आहेत.

00000

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

बुलडाणा, दि. 19 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत प्रत्येक वर्षी विजाभज, इमाव आणि विमाप्र जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी दि. 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विजाभज, इमाव, विमाप्र जाती प्रवर्गाकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याकरीता दि. 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील अर्ज भरलेले नाहीत असे विद्यार्थी, तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज रिअप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर दि. 30 जून 2024 पर्यंत अर्ज भरावेत. महाविद्यालयांनी योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करावी.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलद्वारे योजनेची आवेदन पत्रे भरावीत. मुदती विद्यार्थ्याचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहणार आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000



जिल्ह्यात जागतिक सिकलसेल दिन

बुलडाणा, दि. 19 : जागतिक सिकलसेल दिनाची सुरवात आज गणेशपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला. माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव यांचे हस्ते उपक्रमाची सुरवात करण्यात आली.

डॉ. जाधव यांनी सिकलसेल आजाराबाबत प्रकल्प क्षेत्रातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सिकलसेल आजाबाबत माहिती देताना सिकलसेलवाहक रुग्णाला योग्य समुपदेश आणि औषधोपचार करण्याचा सल्ला दिला. तसेच सिकलसेल आजाराचा प्रभाग आणि प्रसार, तसेच आजाराचा दुष्परिणाम यावर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायाबाबत मार्गदर्शनपर माहिती दिली. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगटे, डॉ. बी. एस. तेलंग, शितल साखळीकर आदी उपस्थ‍ित होते.

00000

No comments:

Post a Comment