गुरुवारपासून अतिसार नियंत्रण पंधरवाडा
बुलडाणा, दि. 05 : जिल्ह्यात पाच वर्षाखालील बालकांना अतिसार व जुलाब आजारापासून संरक्षित करण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवाडा गुरूवार, दि. ६ ते २१ जून २०२४ दरम्यान राबविण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिल्या.
अतिसार नियंत्रण कार्यक्रम राबविण्याबाबत जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी, पाच वर्षांखालील जिल्ह्यातील बालकांना अतिसार, जुलाब आजारापासून सुरक्षित करण्यासाठी ओआरएस पावडरचे पाकीट व अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना झिंक गोळ्याचे वाटप आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे, कार्यक्रमाचे नियोजन आणि मोहिम, तसेच ओआरएस पावडर पाकिट, झिंक गोळ्यांच्या साठ्याची उपलब्धता व आवश्यक मनुष्यबळ आणि कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजनाची माहिती दिली.
जिल्हास्तरीय सुकाणू समिती बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सहाय्यक संचालक कृष्ठरोग डॉ. हरीश पवार, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण घोंगटे, महिला व बालकल्याण अधिकारी श्री. येंडोले आदी उपस्थित होते.
00000
इतर मागास बहुजन कल्याणच्या
वसतिगृह प्रवेशास सुरूवात
बुलडाणा, दि. 05 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरावरील वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इतरमागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरावरील मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25 या वर्षाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असल्यास विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेशाकरीता आवश्यक अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे उपलब्ध आहे. सदर अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
जिल्हास्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांसह कार्यालय सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
डाक विभागाच्या एजंटसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 05 : भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे
थेट अभिकर्तासाठी अर्जाचा नमुना बुलडाणा प्रधान डाक घर किंवा डाक अधीक्षक बुलडाणा यांच्या लार्यालयात उपलब्ध आहे. एजंट भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी. बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवानिवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतील. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबत ज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रूपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. सदर रक्कम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा कृषी विकास पत्राच्या स्वरुपात राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केल्या जाणार आहे. ही परवाना परीक्षा नियुक्तीनंतर ३ वर्षाच्या आत पास करणे अनिवार्य राहिल. निवड झालेल्या उमेदवारास ठरविलेले कमिशन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक, डाक घर कार्यालय, बुलडाणा ४४३००१ येथे विहित नमुन्यातील अर्ज आणि दहावी किंवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र, यासह सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्ताऐवजासोबत दि. २८ जून २०२४ रोजी ११ वाजता उपस्थित राहावे.
याबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा maharashtrapost.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे यांनी कळविले आहे.
00000
पाणीटंचाई निवारणार्थ धानोरी येथे टँकर मंजूर
बुलडाणा, दि. 05 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थितीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे धानोरी, ता. चिखली गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार धानोरी, ता. चिखली येथे एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धानोरी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment