Tuesday, 25 June 2024

DIO BULDANA NEWS 25.06.2024

 




शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजामध्येच राहणार

*भारतीय पुरातत्व विभागाने केले स्पष्ट

बुलडाणा, दि. 25 : सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराच्या उत्खननात शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशायी विष्णूची मूर्ती सिंदखेडराजा येथेच राहणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे पुरातत्वशास्त्रज्ञ अरुण मलिक यांनी दिली.

भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे. मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोलीवर भव्य शेषशायी विष्णूची मूर्ती आढळून आली आहे. ही मूर्ती साधारणतः अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याचा अंदाज आहे. ही मूर्ती दीड मीटर बाय सव्वा मीटर आकाराच्या दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे. समुद्रमंथन आणि दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम या मूर्तीमध्ये करण्यात आलेले आहे. ही मूर्ती क्लोरियट दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे. साधारणतः हा दगड दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून येतो. या दगडावर बारीक कोरीव काम करणे शक्य आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वसाधारण मानकानुसार उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येतात. भारतीय पुरातत्व विभागाच्या 49 कार्य ठिकाणी याच पद्धतीने पुरातन वस्तू आणि अवशेषांचे जतन करण्यात आले आहे. याच नियमानुसार सिंदखेडराजा येथे आढळलेली शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजा येथेच जतन केल्या जाईल. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाच्या परिसरातच ही मूर्ती सुव्यवस्थितरित्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. ही मूर्ती याच परिसरात ठेवण्यासाठी आधी व्यवस्था करण्यात येईल. त्यानंतरच ही मूर्ती हलवण्यात येईल. सध्या ही मूर्ती उत्खनन करून सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शिव मंदिरामध्ये ही मूर्ती दबल्या गेल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक या मूर्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

ही मूर्ती कोणत्या शैलीतील आहे, याबाबत अधिक माहिती होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. येत्या एका आठवड्यामध्ये या मूर्तीबाबत संशोधन होऊन अधिकची माहिती प्राप्त होईल. सध्यास्थितीमध्ये मूर्तीचे काळजीपूर्वक हाताळणे आणि योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. मलिक यांनी दिली.

०००००

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना

बुलडाणा, दि. 25 : जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये बारावीनंतरच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरावरील तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येते.

या योजनेच्या लाभासाठी मुलभूत पात्रता ही विद्यार्थ्यी धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारण राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:चे आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

शैक्षणिक निकषात इयत्ता बारावीमध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक. दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा मिळणार नाही. बारावीनंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यास अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

तसेच एका विद्यार्थ्यास जास्तीस जास्त 5 वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी व्यवसाय करत नसावा. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांने विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या महाडीबीटी अर्ज केला आहे व त्याचा अर्ज मंजूर झाला आहे, त्यांना अनुज्ञेय राहील. वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.

संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थेने अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. त्याच प्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहिल. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.

अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी शनिवारपर्यंत नोंदणी आवश्यक

बुलडाणा, दि. 25 : जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी शनिवार, दि. 29 जून 2024 पर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धांचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्यानुसार क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता सबज्युनिअर 15 वर्षाआतील मुले क्रीडा स्पर्धा मुले वयोगट दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली दि. 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. 29 जुन, 2024 पर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूकडे जन्मचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट फोटो असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन हे 15 वर्षाआतील मुले सबज्‍युनिअर दि. 9 जुलै 2024, तसेच 17 वर्षाआतील मुले ज्युनिअर दि. 8 जुलै 2024 आणि 17 वर्षाआतील मुली ज्युनिअर दि. 9 जुलै 2024 रोजी करण्यात येणार आहे. प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपूर्ण नाव, जन्म तारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिष्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने पाठवावे लागणार आहे. 15 वर्षाआतील खेळाडू करिता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी, तसेच subrotocup.in संकेतस्थळावर नोंदणी करुन सहभागी व्हावे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

00000

खामगाव आयटीआयमध्ये शुक्रवारी महिला रोजगार मेळावा

बुलडाणा, दि‍. 25 : खामगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. 28 जून रोजी करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत मॉडेल करियर सेंटर बुलडाणा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन खामगाव आयटीआयमध्ये करण्यात आले आहे.

सदर ‍महिला रोजगार मेळाव्यात हिंदुस्थान युनीलीव्हर लिमिटेड, खामगाव या उद्योजकांनी त्यांच्याकडील आयटीआय इलेक्ट्रिशियन, इंस्ट्रुमेंटेशन, ‍फिटर या पदांसाठी फक्त महिलांसाठी 15पेक्षा अधिक पदे अधिसुचित केली आहेत. तसेच एलआयसी इंडियाच्या विमा अभिकर्ता पदासाठी देखील 20 पदे  अधिसूचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे गरजू व रोजगार इच्छुक ‍महिला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुद्धा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली असलेल्या अथवा नसलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर महिला उमेदवारांनी दि. 28 जून 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जलंब रोड, खामगाव, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे आणि रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करुन घ्यावी.

पात्र, गरजू व नौकरी इच्छुक महिला उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीताही अर्ज करु शकतात. तरी इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. याचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा 07262-242342 दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment