मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
बुलडाणा, दि. 03 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मलकापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ही मतमोजणी होणार आहे. या परिसरातील 200 मीटर परिक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. ही प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून तसेच मतमोजणीच्या ठिकाणी नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मतमोजणी परिसरातील 200 मीटर परिक्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्राप्त अधिकारानुसार दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते मतमोजणीचे काम पूर्ण होईपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 200 मीटर परिक्षेत्रात 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवून जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. सदर आदेश अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी तसेच अंत्ययात्रा, लग्नसोहळा, धार्मिक कार्यक्रमांना लागू राहणार नाही.
00000
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 03 : सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 4 ते 6 जुलै दरम्यान करण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने तसेच सुब्रतो मुखर्जी स्पोटर्स् एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्यातर्फे सन 2024-25 या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (सबज्युनिअर मुले, ज्युनिअर मुले/मुली) या क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम क्रीडा संचालनालय, पुणे यांना प्राप्त आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा अंतर्गत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता सबज्युनिअर 15 वर्षाआतील मुले क्रीडा स्पर्धा मुले वयोगटासाठी दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली दि. 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे ऑफलाईन नोंदणी दि. 29 जून 2024 पर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडे जन्मदाखला, आधारकार्ड व पासपोर्ट सर्व मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यात खेळाडू अधिक वयाचा दाखला आढळल्यास संपुर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.
स्पर्धांचे आयोजन हे 15 वर्षाआतील मुले सबज्युनिअर दि. 4 जुलै 2024, 17 वर्षाआतील मुले ज्युनिअर दि. 5 जुलै 2024, 17 वर्षाआतील मुली ज्युनिअर दि. 6 जुलै 2024 करण्यात येणार आहे.
प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर क्रमांक, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने पाठवावे. 15 वर्षाआतील खेळाडूंकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी आणि subrotocup.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन शाळांनी सहभागी व्हावे, याबाबत अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्याशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
00000
ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप
बुलडाणा, दि. 03 : ग्रामीण विकास मंत्रालय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतील ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के के. सिंग अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आरसेटी संचालक संदीप पोटे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून रूपाली शिंदे होत्या. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांना मोफत निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या प्रशिक्षणात 35 प्रशिक्षणार्थीनी सहभागी नोंदविला.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग यांनी, आरसेटी मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणातून प्रशिक्षण घेतल्यास, कमी भांडवलात चांगला व्यवसाय सुरू करता येतो. तसेच कमी खर्चात चांगला नफा मिळवता येतो. प्रशिक्षणार्थींनी व्यवसायातील समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले. श्री. पोटे यांनी, आरसेटीचा मुख्य उद्देश कला समृद्ध लोकांना त्यांच्या कलेची जाणीव करून देणे आणि त्यांना मदत करणे हा आहे. त्यांनी त्यांच्या कलेमध्ये पारंगत होऊन स्वयंरोजगार मिळावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले.
ब्युटी पार्लर प्रशिक्षणात मॅनिक्युअर, फेशियल, वॅक्सिंग, थ्रेडिंग, हेअर कटींग, हेअर मसाज, ब्रायडल मेकअप, मेहंदी, नेलआर्ट, ब्लिचिंग, स्पा, हायलाईट याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक मनिषा देव, प्रशांत उबरहंडे, कल्पना पोपळघट यांनी सहाय्य केले.
00000
No comments:
Post a Comment