DIO BULDANA NEWS 21.06.2024
दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
*युवकांचा उत्स्फूर्त प्रसिसाद
*उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ
बुलडाणा, दि. 21 : जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात आज सकाळी 7 वाजता दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात योगक्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. दिपप्रज्वलन करून योग कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसिलदार व्ही. एस. कुमरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, नेहरू युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत, डॉ. राजेश्वर उबरहंडे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी, देशभरात प्रत्येक ठिकाणी हजारो नागरीक योग दिनाच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतात. तसेच निरामय आयुष्य जगण्याची जीवनशैली अंगीकारत आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये तालुका क्रीडा संकुलांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व रक्तदान शिबीर घेण्यात आले. विशेषतः युवकांनी रक्तदान व नियमीत योग करण्याचे आवाहन केले.
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशानूसार अंजली परांजपे, प्रशांत लहासे, भुषण मोरे, सचिन खाकरे, उर्मिला दिदी, कुंदा पंधाडे, अच्युतराव उबरहंडे, बालयोगी क्षितीज निकम, साई वानखेडे यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम हे प्रकार करुन घेतले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. उर्मिला दिदी यांच्या प्रार्थनेने योगदिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच योग दिनानिमित्त जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलातील हॉलमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले.
क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे, वरिष्ठ लिपीक संजय मनवर, सुरेशचंद्र मोरे, मनोज श्रीवास, विनोद गायकवाड, नम्रता वाचपे, शेख रफीक, मंगलाबाई पसरटे, सुहास राऊत, किसना जाधव यांनी पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये सहकार विद्या मंदिर, शारदा ज्ञानपीठ, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, सेंट जोसेफ इंग्लिश स्कुल, भारत विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नर्सिंग महाविद्यालय, ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालय, एएसपीएम आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच एडेड विद्यालय, प्रबोधन विद्यालय, महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय, श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
00000
चिखली येथील तालुका प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन
बुलडाणा, दि. 21 : चिखली येथील प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन आज आमदार श्वेता महाले आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, उपवनसंरक्षक सरोज गवस, जिल्हा आरोग्य अधिकरी अमोल गीते, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत आदी उपस्थित होते.
आमदार श्वेता महाले म्हणाल्या, नागरिकांच्या सोयीसाठी तालुका प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे. ही इमारत बांधताना नागरिकांना जवळ पडेल, असे ठिकाणी निवडण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे. कोणत्याही विकासकामांना प्रशासनाची साथ असल्यास ही कामे गतीने होण्यास मदत मिळणार आहे. शासनाकडून कामाला मंजुरी आणि निधी मिळाला असताना ही कामे तातडीने सुरू करून पूर्णत्वास नेल्यास नागरिकांची सोय होणार आहे. गेल्या काळात तालुक्याला मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने कामे सुरू व्हावीत. येत्या काळात तसलिस कार्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयाच्या इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्याचा विकास करण्यात येत आहेत. जिल्ह्यात विविध कामांना वाव आहे. गेल्या काळात पाणंद रस्त्यांची कामे करण्यात आली. येत्या काळातही विकासात्मक कामे करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांच्या सोयीसाठी संगणकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक नक्कल स्वत: काढू शकतील. प्रशासकीय इमारतींसाठी जागेची कमतरता असली तरी यावर तोडगा काढण्यात येतील. शासनाकडून इमारती बांधण्यात येतात, येत्या काळात त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
000000
समृद्धी मार्गावर वाहनांची विशेष तपासणी मोहीम
*मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकावर कारवाई
बुलडाणा, दि. 21 : समृद्धी मार्गावर होणाऱ्या अपघाताना आळा घालण्यासाठी परिवहन विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार गुरूवार, दि. 20 जून 2024 रोजी राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 42 वाहनांची सिंदखेडराजा समृद्धी टोल नाक्यावर तपासणी करण्यात आली. यात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एका वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पर्यायी चालकाची व्यवस्था होईपर्यंत वाहन सुरक्षितरित्या उभे करण्यात आले. तसेच 3 प्रवासी बसवर कारवाई करण्यात आली.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्त्यावर होत असलेल्या अपघाताचे विशेषत: खासगी बसेसने होत असलेल्या अपघाताबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. यात जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची वेगवेगळी पथके तयार करून खासगी प्रवाशी बसची तपासणी करण्यात येत आहे. बसचालकांची मद्य प्राशनाबाबत ब्रीथ अनालायझरद्वारे तपासणी करण्यासाठी दोन दिवस विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक सीमा खेते, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुरज कोल्हे, स्वप्नील वानखेडे, राधिका चव्हाण यांनी सहभाग घेतला.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात मलकापूर नाका, समृध्दी महामार्ग व बुलडाणा शहर अशा तीन ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान दि. 20 जून रोजी तीनही पथकाद्वारे एकूण 172 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 बसचे चालक मद्य प्राशन करुन वाहन चालवित असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. तसेच इतर बाबतीत दोषी आढळून आलेल्या 9 वाहनावरही कार्यवाही करण्यात आली. मद्य प्राशन करून वाहन चालवित असलेली वाहने सुरक्षित पार्क करण्यात आली. चालकाची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्यानंतर वाहन सोडण्यात आले. सदर कारवाई यापुढे देखील सुरु ठेवण्यात येणार आहे, याची सर्व बसचालक आणि मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे.
00000
ग्रामीण डाक जीवन विमाची गुरूवारी विशेष मोहीम
बुलडाणा, दि. 21 : ग्रामीण डाक जीवन विमा ही उत्कृष्ट परतावा देणाऱ्या विमा योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोचण्याकरिता येत्या गुरुवारी, दि. २७ जून २०२४ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा नागरिकांना विमासुरक्षा व आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याकरिता योजना चालविल्या जातात. भारतीय डाक विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या या योजना कमी प्रीमियम, जास्त बोनसामुळे नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. आतापर्यत जवळपास दीड कोटीहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.
ग्रामीण डाक जीवन विमा ही योजना २४ मार्च १९९५ ला ग्रामीण भागातील नागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली. यामध्ये वय १८ ते ५५ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करू शकतो. उत्कृष्ट परतावा देणाऱ्या विमा योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोचण्याकरिता येत्या दि. २७ जून ला विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.
00000
ज्वारी खरेदी नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, दि. 21 : हमी दराने भरडधान्य ज्वारी खरेदीसाठी पुरेशी नोंदणी झालेली नाही. शासनाकडून भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी साठी दि. 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांचे हमी दराने भरडधान्य ज्वारी नोंदणीसाठी यापुर्वी दि. २० जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतू मागील हंगामामधील ऑनलाईन शेतकरी नोंदणी आणि रब्बी हंगाम २०२३-२४ मधील शेतकरी नोंदणी पाहता रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पुरेशी झाली नाही. त्यामुळे शासनाकडून भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी दि. ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करणेसाठी, आधारकार्ड, रब्बी २०२३-२४ चा सातबारा ऑनलाईन पिकपेरासह, बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल नंबर घेऊन कागदपत्रे स्कॅन करुन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येते. तसेच हाताने लिहिलेले सातबारा व खाडाखोड केलेले कागदपत्र कोणत्याही परिस्थितीत स्विकारण्यात येणार नाही. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज त्याच दिवशी पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावयाचे आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन सातबारावरील ज्वारी पिकपेऱ्यापेक्षा जास्त क्षेत्रावर नोंदणी करण्यात येणार नाही. तसे झाल्यास खरेदी केंद्राला जबाबदार ठरविण्यात येणार आहे. असे जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी कळविले आहे.
00000






.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)

Comments
Post a Comment