DIO BULDANA NEWS 12.06.2024

 खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाचे विशेष आवाहन

बुलडाणा, दि‍. 12 : येता खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना योग्य भावात बियाणे, रासायनिक खते मिळणे, बिज उगवण आणि बिजप्रक्रिया, पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच बियाणे खरेदी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मान्सूनमध्ये 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परंतू हा पाऊस नियमित, विनाखंड स्वरूपात पडणे आवश्यक आहे. आतापर्यंत 51 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. जमिनीमध्ये चार इंच खोल ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी, अल्प पावसावर पेरणी करू नये. असे केल्यास पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊन आर्थिक शकते.

शेतकऱ्यांनी त्यांच्या मागणीनुसार बियाणे आणि खते खरेदी करावी. बियाणांच्या बाबतीत कोणत्याही अफवांना बळी पडू नये. विकत घेतलेले बियाणे जतन करून ठेवावे. बोगस बियाणे आणि किटकनाशके विक्री केल्यास परवाना रद्द करण्यात येत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्यात. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी त्याचे देयक घ्यावे. देयक आणि बियाणांचे नमुने साठवून ठेवावेत. बियाणे बोगस निघाल्यास याबाबत रितसर तक्रार करावी.

शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा विविध पिके, आंतरपिक घेण्याकडे घ्यावीत. तसेच प्रतिकुल हवामानातही टिकणारे आणि विविध रोगांना प्रतिकार करू शकतील सअसे आधुनिक, नवीन आणि जादा उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी. सोयाबीन, कापूस आणि मका पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी शेततळ्याचा लाभ घ्यावा. यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा. शेततळ्यांमध्ये पाण्याची उपलब्धता असल्यास रब्बीमध्येही पिक घेणे शक्य होईल.

तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तलावात जुलैच्या मध्यापर्यंत पाणी साठणार असल्याने गाळ काढण्याची संधी आहे. हा गाळ काढून शेतामध्ये टाकण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. शेतकरी हा गाळ शेतामध्ये टाकून जमिनीची सुपिकता वाढवू शकतील. यासाठी शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. मात्र यात मुरूम आणि इतर गौण खनिजांची अवैध उत्खनन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बियाणे आणि रासायनिक खते खरेदी करताना सतर्कता बाळगावी. पेरणी आणि पेरणी पश्चात घ्यावयाच्या काळजीबाबत कृषि विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

शेतकऱ्यांनी बांबू शेतीसाठी पुढाकार घ्यावा

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*20 हजार हेक्टरवर बांबू शेतीचे उद्दिष्ट

बुलडाणा, दि‍. 12 : शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांपासून दूर करून त्यांना बांबू शेतीकडे वळविण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना 7 लाख 40 हजार रूपये प्रती हेक्टर तीन वर्षांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात बांबू शेतीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, विभागीय वन अधिकारी विपूल राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनील पाटील, इश्वेद बायोटेकचे संजय वायाळ आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, पारंपरिक पिकापासून दूर करून शेतकऱ्यांना तीन वर्षात बांबू शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. शेतकऱ्यांनी बांबू शेतीसाठी पुढाकार घेतल्यास त्यांना शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समिती, कृषि विभागाकडे अर्ज केल्यानंतर त्यांना बांबूची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाल्को ही जादा पाणी आणि ग्रीन वुल्गरीस बांबू ही कमी पाण्यावर जागणारी प्रजाती आहे. मग्रारोहयो अंतर्गत बांबूची लागवड होणार आहे. सामाजिक वनीकरणकडून शेतकऱ्यांच्या बांधावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. यावर्षी सुमारे 25 हजार रोपे लागवड करण्यात येणार आहे.

शेतीचे विविध प्रयोग करताना बांबू हा चांगला पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. शेतकऱ्यांना बांबूची रोपे रोहयोमधून मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांचा गट करून त्यांच्यामार्फत बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांची निवड करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बांबू शेती करताना पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना आंतरपिक घेता येणार आहे. बांबू शेतीसाठी चार वर्षात टप्प्याटप्प्याने 7 लाख 40 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. बांबूच्या रोपांची नर्सरी मध्ये उपलब्धता आहे. ज्यामुळे रिकाम्या जागी, सोयीच्या ठिकाणी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून बांबू लागवड करण्यात येणार आहे. रोपांसाठी कृषी सहायक आणि मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.

शेततळ्या सभोवताल बांबूची लागवड शक्य आहे. तसेच कुंपन म्हणूनही बांबूची लागवड करता येणे शक्य आहे. तसेच यातून मिळणारा लाभ पूरक उत्पन्न म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे. बांबूचा समोवश गवतात केला आहे. बांबू तोडण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. त्यामुळे बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, यासाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावे. मनरेगा अंतर्गत मोफत बांबू रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी नोंदवावी. याबाबत अडचण असल्यास जिल्‍हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

000000

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा, दि‍. 12 : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार दि. 13 जून 2024 रोजी सकाळी 5.40 वाजता शेगाव रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी 7 वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर दर्शन व पालखी सोहळयास उपस्थित राहतील. सकाळी 10.15 वा. लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या खामगाव येथील समाधीस्थळी दर्शन आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता खामगाव येथून मेहकरकडे प्रस्थान करतील.

00000

आरोग्य सेवक भरती प्रक्रियेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध

बुलडाणा, दि‍. 12 : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक पदासाठी परिक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहे.

ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत जिल्हा  परिषदेतील गट-क मधील विविध संवर्गातील राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 करीता आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गाची परीक्षा दि. 13 ते 15 जून 2024 या कालावधीत होणार आहे. या संवर्गातील परिक्षेकरीता जिल्हा परिषद, बुलडाणाच्या zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्रासाठी लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले आहे.

00000

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

बुलडाणा, दि‍. 12 : शासकीय अध्यापक महाविद्यालयाकरीता आर्थिक वर्ष 2024-2025 या कालावधीकरीता एक सफाई कामगार आणि एक रात्रपाळी पहारेकरी अशी 2 पदे कत्रांटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले आहे.

पद भरतीसाठी विहित आवेदनपत्र शासनमान्य कंत्राटदार, पंजीकृत बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्राकडून द्वि-लिफाफा पद्धतीने मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. महाविद्यालयाकडे प्रति शेड्युल 500 रूपयांचा भरणा करून दि. 19 ते 21 जून 2024 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळू शकतील. दि. 25 जून 2024 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहोरबंद निविदा स्विकारण्यात येतील. तसेच मोहोरबंद निविदा दि. 27 जून 2024 रोजी दुपारी 12  वाजता प्राचार्यांचे दालनात उघडण्यात येतील. त्यावेळेस संबंधित निविदाधारकांनी प्राचार्यांच्या दालनात दुपारी 12 वाजता उपस्थित राहावे, यासंबंधी अंतिम निर्णय प्राचार्यांचे राहणार आहे. सदर निविदा महाविद्यालयाचे संकेतस्थळ gcebedbuldan.org.in वर उपलब्ध आहे, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एस. लिगायत यांनी कळविले आहे.

000000

मका, ज्वारीच्या नोंदणीस 20 जूनपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि‍. 12 : शासनाकडून भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी साठी दि. २० जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांची हमी दराने भरडधान्य ज्वारी नोंदणीसाठी दि. ३१ मे २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली. मागील हंगामामधील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी आणि रब्बी हंगाम २०२३-२४ मधील शेतकरी नोंदणी पाहता रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नाही. त्यामुळे ही मुदत वाढ देण्यात आली आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी, आधारकार्ड, रब्बी २०२३-२४ चा ऑनलाईन पिकपेरासह सातबारा, आधार लिंक बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर घेऊन कागदपत्रे स्कॅन करुन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच हाताने लिहिलेले सातबरा व खाडाखोड केलेले कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्विकारण्यात येणार नाहीत. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज त्याच दिवशी पोर्टलवर नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच ऑनलाईन सातबारावरील ज्वारी पिक पेऱ्यापेक्षा जास्त क्षेत्रावर नोंदणी करण्यात येणार नाही, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी कळविले आहे.

00000

Comments