आनंदवार्ता : बुलडाणा जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे ‘चवथे पाऊल..’!
· चिखली, दे.राजा व मलकापूर येथील रूग्ण झाले बरे
· टाळ्यांच्या निनादात रुग्णांना सोडले घरी
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : कोरोनाचा संसर्ग जगभर वेगाने वाढत आहे. भारतातही काही हॉट स्पॉट क्षेत्रात विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. जिल्ह्यातही विषाणूने आपला संसर्ग दाखवित 21 रूग्ण आपल्या कवेत घेतले. मात्र जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात येत आहे. कोरोनाला मर्यादेत ठेवण्यात प्रशासन विविध उपाययोजना अंमलात आणत आहे. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे आता चवथे यशस्वी पाऊल पडले आहे. ठणठणीत बरे झाल्याने व कोरोना निगेटीव्ह अहवाल इाल्यामुळे जिल्ह्यातील तीन रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन, सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रूग्णांची भर पडली आहे. आज चिखली येथील एक, दे.राजा येथील एक आणि मलकापूर येथील एक अशाप्रकारे तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 14 रूग्ण बरे झालेले आहे.
प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या. कन्टेन्टमेंट झोन, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई, गर्दी कमी करण्यासाठी योजलेले उपाय यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे अग्रेसर आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सदर रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोना बाधीत रूग्णांनी आपण कोरोनामुक्त् झाल्याबद्दल प्रशासनाने आभार मानेल. खरच.. आमच्यासाठी सर्व प्रशासनाने खूप मेहनत घेतली, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कोरोना निगेटीव्ह रूग्णांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी डिस्जार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच, 23 एप्रिल रोजी तीन व आज 25 एप्रिल रोजी पुन्हा 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आता 6 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रूग्णांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
*************
No comments:
Post a Comment