Tuesday, 28 April 2020

दोन रूग्ण कोरोनावर मात करीत परतले स्वगृही…!


दोन रूग्ण कोरोनावर मात करीत परतले स्वगृही…!
·        मलकापूर व बुलडाणा येथील रूग्ण
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : कोरोना या शब्दाने संपूर्ण जगाला छळले आहे. त्यामध्ये आपला देश, राज्य व जिल्हाही अपवाद नाही. कोरोना विषाणूच्या थैमानाने जग मेटाकुटीस आले आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातून कोरोनाच्या या हल्लकल्लोळात काही सुखद वृत्तही येत आहे. आज 28 एप्रिल रोजी आणखी दोन रूग्णांनी कोरोनावर मात दिली आहे. कोरोनातून बरे झाल्याने मलकापूर व बुलडाणा येथील रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.       
     जिल्ह्यात एकूण 24 कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. त्यापैकी एक मृत आहे. यामध्ये बुलडाणा 9, चिखली 3, दे.राजा 2, सिं. राजा 1, मलकापूर 4, शेगांव 3 व चितोडा ता. खामगांव येथे 2 रूग्ण होते. अशाप्रकारे जिल्ह्यात 24 रूग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत 15 रूग्णांना बरे झाल्याने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये आज दोन रूग्णांची भर पडली असून ही संख्या 17 झाली आहे. सध्या कोविड रूग्णालयात 6 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
   प्रशासनाने कंटेन्टमेंट झोन, लॉकडाऊन पुर्णपणे बंदी, विहीत कालावधीत जिवनावश्यक वस्तुंचे दुकान उघडण्यास परवानगी आदी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मर्यादीत राही आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज दोन रूग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांना आनंदाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सिंदखेड राजा येथील एका रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णांचा चेहरा आनंदीत होता.
    या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
    त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या एका रूग्णामुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 17  झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 24 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच , 23 एप्रिल रोजी 3, 27 एप्रिल रोजी एक आणि आज 28 एप्रिल रोजी दोन रूग्ण बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. अशाप्रकारे 17 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. आता 6 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
   सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                              ********

कोरोना अलर्ट : जिल्हयात आजपर्यंत 357 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात एकूण 24 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे.  त्यापैकी 17  रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 17 झाली असून सध्या रूग्णालयात 6 रूग्ण उपचार घेत आहेत.  रूग्णालयात सध्या 6 रूग्णांवर उपचार सुरू आहेत . तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 19 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 6 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 357 आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                            ******
हनवतखेड गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर गावची लोकसंख्या 397 आहे. या टँकरद्वारे गावाला दररोज 13 हजार 820 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.                                                                                                             *******
कक्कुट पक्षाच्या मांसातून कोरोना विषाणूचा संसर्ग नाही
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : समाज माध्यमांमध्ये कुक्कुट पक्षापासून मानवात नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्या बाबतची अशास्त्रीय माहिती पसरविली जात होती. याबाबत पशुसंवर्धन आयुक्त, नवी दिल्ली यांनी कुक्कुट पक्षांपासून नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याबाबत स्पष्ट केले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी देखील त्यांचे सेवन पुर्णपणे सुरक्षित असल्याबाबत प्रसिद्धी पत्रक निर्गमित केलेले आहे. कुक्कुट मांस व अंडी प्रथिनांचे उत्तम व स्वस्त स्त्रोत असून कुक्कुट उत्पादने मानवी आहारात वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षित आहेत. कुक्कुट मांस व अंडी यांच्या सेवनामुळे नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही, असे उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी कोविड -19 जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                            *******

No comments:

Post a Comment