Monday, 6 April 2020

DIO BULDANA न्यूज ६.४.२०२०

जिल्ह्यात माहे एप्रिल 2020 मध्ये एकूण 20925  मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप होणार

·        दि 7 एप्रिल 2020  पासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध

बुलडाणा , दि. 6 :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ५  एप्रिल २०२० या पाच दिवसात बुलडाणा जिल्ह्यातील 106629 शिधापत्रिका धारकांना तब्बल 26170 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा यांनी दिली आहे.तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

     जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 18.5 लाख आहेत.या लाभार्थ्यांना 1536 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड 20 किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड 15 किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.

   तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो. बुलडाणा जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे 15555 क्विंटल गहू, 10615 क्विंटल तांदूळ, तर  136 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 4279 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

     प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ दि.07 एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सदर योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त करून घेतले जाणार आहे. दि.07 एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे .हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे यांनी दिली आहे.

जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक  ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत.जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी  गणेश बेल्लाळे यांनी दिली आहे.

****************



लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सहकार्य करावे

-         पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

·        पालकमंत्री यांनी डॉक्टर्स, व्यापारी यांच्या बैठकीत केले आवाहन

·        पालकमंत्री यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद

बुलडाणा, दि. 6 : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्यांना अन्न मिळावे. त्यासोबतच शहरातील लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी. यासाठी शहरातील डॉक्टर्स, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

   शहरातील डॉक्टर्स, व्यापारी यांच्यासमवेत पालकमंत्री यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करीत बैठकीचे चिखली रस्त्यावरील साईकृपा लॉन येथे आयोजन 5 एप्रिल रोजी करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.  यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, व्यापारी असोसिएशनचे राजेश देशलहरा, डॉ दीपक लद्धड, डॉ संजय पाटील, डॉ एस एस राजपूत, डॉ योगेश गोडे, डॉ सुभाष जोशी, डॉ शॉन चिंचोले, अमोल हिरोळे, संदीप शेळके, डॉ मेहेत्रे, डॉ बोथरा आदी उपस्थित होते.

        ते पुढे म्हणाले, देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे गोरगरिबांचा रोजगार हातातून गेला असून  हातात असलेला पैसा देखील संपला आहे. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना दोन वेळेचं अन्न मिळावे.

   पालकमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी व बुलडाणा अर्बनने शहरातील अन्नापासून वंचित असलेल्या गोरगरिबांना मोफत अन्न धान्य पुरविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शहरातील काही प्रतिष्ठित डॉक्टर्सनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर व इतर साहित्य स्त्री रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयासाठी या संकटकाळात देण्याची ग्वाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांना दिली  आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांवर देखील योग्यप्रकारे उपचार करता येणार आहे.

                                                           

************

कोरोना अलर्ट : गृह विलगीकरणातील 9 नागरिकांची मुक्तता 

 * संस्थात्मक विलगीकरणात 76 नागरिकांची वाढ

* अलगीकरणात 22 दाखल

बुलडाणा, दि. 6 :  जिल्ह्यातून शेगांव, खामगांव व बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात दाखल संशयीत व्यक्तींचे तसेच संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या संशयीत व्यक्तींचे असे एकूण 34 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच गृह विलगीकरणामध्ये आज 10 नागरिकांची वाढ झाली. तसेच संस्थात्मक विलगीकरणात 76 नागरिकांची वाढ करण्यात आली असून यामध्ये सध्या  एकूण 78 नागरिक आहेत.   

     काल दि. 5 एप्रिल 2020 पर्यंत 86 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातील 9 नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली. अशाप्रकारे 10 ने वाढ जिल्ह्यात एकूण 96  नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज 76  व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज 22 नागरिकांची मुक्तता करण्यात आली. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 78 नागरिक आहेत.

     जिल्ह्यात आज बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 2 व शेगांव येथे 1 संशयीताला दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे 3 संशयीतांना दाखल करून त्यांचे स्वॅब नमुने  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 22 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 4, शेगांव 5 व बुलडाणा 13 व्यक्तींचा समावेश आहे.  घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 57 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 95 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 22 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 18 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 11 व खामगांव येथील 7 व्यक्तींचा समावेश आहे.

  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 114 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 80 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 9 पॉझीटीव्ह व  71  निगेटीव्ह रिपोर्ट  आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे.   तसेच 34 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यामध्ये मरकज कार्यक्रमातून परत आलेल्या जिल्ह्यातील पॉझीटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील हाय रिस्कमधील 27 संशयीतांचे नमुन्यांचाही समावेश आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.

*******

मरकज कार्यक्रमात सहभागी नागरिकांनी स्वत: हून तपासणी करावी

- जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि. 6 :  जिल्ह्यातून दिल्ली येथील मरकज या धार्मिक कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. अशा नागरिकांनी स्वत: हून आरोग्य तपासणी करावी. त्यांनी हेल्पलाईन 1077 अथवा नियंत्रण कक्षाच्या 07262- 242683 या संपर्क क्रमांकावर माहिती द्यावी. त्यांच्यापर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचेल. दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी नागरिकांनी स्वत:हून तपासणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे त्यांना स्वत:चे, कुटूंबीयांचे आरोग्य सांभाळता  येईल. तसेच लाखो बुलडाणा जिल्हावासियांच्या आरोग्यासाठी सुद्धा मोलाचे योगदान लाभेल. तरी मरकज कार्यक्रमात सहभागी नागरिकांनी स्वत:हून पुढे येत आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी. अथवा हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केले आहे.

                                                                                                **********

No comments:

Post a Comment