कोरोना अलर्ट : गृह विलगीकरणातून आज 70 नागरिकांची मुक्तता
*अलगीकरणात 31 दाखल, कोरोना बाधीत चार रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविणार
*संस्थात्मक विलगीकरणातून 30 नागरिकांना सोडले
बुलडाणा, दि. 13 : जिल्ह्यात गृह विलगीकरणामध्ये आज 70 नागरिकांनी आपला 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले. तसेच गृह विलगीकरणात आज 30 नागरिकांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गृह विलगीकरणात 93 नागरिक आहेत. तसेच संस्थात्मक विलगीकरणातून आज 30 नागरिकांना सुटी देण्यात आली. यामध्ये आज 3 नागरिकांची वाढ झाली असून सद्यस्थितीत 53 नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
तसेच बुलडाणा अलगीकरण कक्षात 28 मार्च रोजी मृत पावलेल्या कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना बाधीत आल्या होत्या. त्यांना अलगीकरणात आता 14 दिवस पूर्ण होत असून त्यांचे नमुने आज प्रयोगशाळेत पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. त्यांचा रिपोर्ट कदाचित उद्या मिळणार आहे. सुदैवाने हे चारही रिपोर्ट निगेटीव्ह आले पाहिजे. त्यानंतर पुन्हा 24 तासाच्या अंतराने त्यांचा रिपोर्ट पाठविण्यात येईल. जर तेव्हाही रिपोर्ट निगेटीव्ह आले, तर त्यांना अलगीरकरणातून सुटी देण्यात येईल, अशी माहिती प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे.
काल दि. 12 एप्रिल 2020 पर्यंत 133 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. संस्थात्मक विलागिकरणात आज तीन नागरिकांची भर पडली आहे. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 53 नागरिक आहेत.
जिल्ह्यात आयसोलेशन कक्षात आज एकही संशयीत दाखल करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 1, बुलडाणा 18 व शेगांव येथे 12 व्यक्ती दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 31 व्यक्ती अलगीकरणात आहेत. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 145 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 162 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. अलगीकरणातून आज एकही सुटी देण्यात आली नाही. आजपर्यंत 41 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 19 , शेगांव 11 व खामगांव येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.
आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 248 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज एकही नमुना पाठविण्यात आले आहे. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी 191 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 17 पॉझीटीव्ह व 174 निगेटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे. तसेच 57 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
*******
पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
· तूर, हरभरा व कापूस खरेदी प्रक्रिया 15 एप्रिल पासून सुरू होणार
बुलडाणा, दि. 13 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 25 मार्च 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. सदर लॉकडाउन च्या कालावधीत नाफेड तूर हरभरा खरेदी केंद्र तसेच कापूस पणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे, शेतकऱ्यांचा शेतमाल पडून राहत असल्यामुळे ही खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सदर मागणीच्या अनुषंगाने आज दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली व तूर, हरभरा व कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली. त्या नुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर, हरभरा व कापूस खरेदी प्रक्रिया दिनांक 15 एप्रिल 2020 पासून सुरू करण्याचे निर्देश दिले. तुर, हरभरा व कापूस या शेतमालाच्या खरेदीची प्रक्रिया दिनांक 15 एप्रिल 2020 पासून सुरू करण्यात येणार आहे. यामूळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर चर्चेच्या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, अप्पर मुख्य सचिव (वित्त) मनोज सैनिक व अनुपकुमार सचिव ( पणन) हे उपस्थित होते.
******
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती
बुलडाणा, दि. 13 : कोरोना व्हायरस / कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, फिल्ड आउटरीच ब्युरो, औरंगाबाद यांनी बुलडाणा शहर तथा जवळपासच्या गावांमध्ये रिक्शा तुन PA System च्या माध्यमातून ऑडियो क्लिप द्वारे जनजागृती केली आहे.
पुढील काही दिवसांत, हे ऑटो रिक्षा नेाव्हेल कोरोना विषाणू आजाराशी संबंधित विविध पैलूंबद्दल लोकांना जागृत करतील. कोरोना व्हायरस / कोविड-19 संदर्भात प्रभावी जनजागृतीसाठी आरओबी पुणे आणि गीत व नाटक विभागातील कर्मचारी आणि कलाकारांनी स्थानिक भाषा आणि गाण्यांमध्ये तयार केलेला ऑडिओ संदेश रिक्शाद्वारा लोकांपर्यंत पोहिचविण्यात येत आहे.
या ऑडिओ संदेशाचा भर हा संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठीच्या विविध खबरदारीच्या उपाययोजनांवर असेल, जसे की वैयक्तिक स्वच्छता राखणे, घरी राहून कठोर लॉकडाउन पाळणे, सार्वजनिक ठिकाणी पुरेसे सामाजिक अंतर राखणे, सरकारी आदेश व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, अफवा न पसरवणे, शेतीसमवेत लॉकडाऊन अंतर्गत परवानगी असलेल्या आवश्यक सेवांची यादी आणि कोरोना व्हायरस / कोविड-19 संदर्भातील पंतप्रधानांचा संदेश. हा उपक्रम राज्य सरकार द्वारा कोरोना व्हायरस / कोविड-19 वर केल्या जाणा-या जनजागृतीच्या प्रयत्नांना पूरक ठरण्यास मदत करेल व या साथीचा प्रसार रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी मदत होईल, असे क्षेत्रीय कार्यालयृ औरंगाबाद यांनी कळविले आहे.
संचारबंदी काळात मासेमारीच्या सर्व कृती करण्यास परवानगी
· मत्स्यव्यसाय विभागाची माहिती
बुलडाणा, दि. 13 : भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाच्या सचिवांनी मासळीच्या मत्स्यखाद्याची गणना अत्यावश्यक वस्तूंमध्ये केली आहे. त्यामुळे त्याची वाहतूक सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. राज्यातही 30 एप्रिल 2020 पर्यत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात खाद्य / चारा टाकणे, मत्स्यखाद्याची वाहतूक यासह मासेमारीच्या सर्व कृती करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून मत्स्यकास्तकारांनी शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. संबंधित तालुक्यातील ठेकेदार मस्त्यव्यवसाय सहकारी संस्थांनी मासेमारीबाबत नियमितरित्या स्थानिक तहसिलदार तथा पोलीस स्टेशन अधिकारी यांना अवगत करून मान्यता घ्यावी. सामाजिक अंतर राखण्याचे काटेकोरपणे पालन करावे. किमान 1.5 मीटरत ते 2 मीटरचे अंतर दोन व्यक्तींमध्ये असणे आवश्यक आहे. मासेमारीच्या वेळापत्रकानुसार मच्छिमार अथवा मत्स्यकास्तकार यांची मासे जाळ्याने पकडण्याची संख्या एका वेळेस पाचपेक्षा जास्त् नसावी. संबंधित मच्छिमार व्यक्तीने मास्क, रूमाल अथवा टिश्यू पेपर तोंडास घट्ट बांधलेला असावा. हात धुण्यासाठी साबणाचा वारंवार वापर करावा. मासेमारीची कृती करीत असताना कोरोना विषाणू आजारासंबंधीत जर प्राथमिक लक्षणे आढळल्यास तथा संशयास्पद वाटल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
यानुसार शासनाच्या मान्यतेनुसार व जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील मच्छिमार सहकारी संस्थेचे सभासदांना / मस्त्यकास्तकारांना मासेमारीच्या सर्व कृती करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. मासळी तसेच मासळीपासून बनविलेल्या पदार्थांमधून कोरेाना विषाणूचा प्रसार होत नाही. सोशल मिडीयावरील खोट्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. तरी मस्त्यव्यवसाय सहकारी संस्थांनी प्रशासनाशी योग्य पद्धतीने संवाद साधून आणि सहकार्याची भूमिका ठेवून मासेमारीच्या कृती करण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, मस्तयव्यवसाय स. इ नायकवडी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment