संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी
- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
· पालकमंत्री यांनी घेतला चिखली येथील परिस्थितीचा आढावा
बुलडाणा, दि. 8 : देशभर हैदोस घालणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यात देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. बुलडाणा आणि चिखली शहरात तर रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर कुणीही पडू नये. पोलीस प्रशासनासने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज चिखली येथील मुकूल वासनिक सांस्कृतिक भवन येथे अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार श्वेताताई महाले, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, नायब तहसीलदार निकेतन वाळे, बीडीओ सुरेश कांबळे, ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ खान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ इम्रान खान, डॉ. वायाळ, डॉ अमोल राजपूत आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी सुरक्षीततेची काळजी घेण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कोरेानाचा प्रादुर्भाव् रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. काम करत असतांना अधिकाऱ्यांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी त्या देखील मनमोकळेपणाने सांगाव्यात. संचारबंदीच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणारा लहान असो की मोठा त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
चिखली शहरातील परिस्थिती हाताळत असतांना येथील निर्णय घेण्याचे अधिकार नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले. ग्रामीण भागात नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहे, याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना शेतीचे काम करतांना कुठलाही त्रास होणार नाही, याबाबत काळजी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी महत्वपूर्ण सूचना देखील पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना केली.
यावेळी पालकमंत्री यांनी ग्राउंड स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. बैठकीमध्ये सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले.
स्त्री रूग्णालय व सामान्य रूग्णालयातील अलगीकरण कक्षाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
बुलडाणा, दि. 8 : स्थानिक स्त्री रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड -19 रूग्णांच्या अलगीकरण कक्षाची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी 7 एप्रिल रोजी पाहणी केली. यावेळी त्यांनी कक्षातील सुविधा, अडचणी जाणून घेतल्या. तसेच आरोग्यविषयक सुविधांचाही आढावा घेतला.
शासनाने स्त्री रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून जाहीर केले आहे. या रूग्णालयात कोरोना संशयीतांचे विलगीकरण करण्यात येत आहे. या रूग्णालयातील बेड, तेथील स्टाफची उपलब्धता, औषधांचा पुरवठा, रूग्ण क्षमता, सद्यस्थितीत असलेला साठा, स्वच्छता आदींविषयक परिस्थिती जाणून घेत पालकमंत्री यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत उपस्थित होते. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
शिवभोजन थाळी ठरली स्थलांतरीतांसाठी जगण्याचा ‘आधार’
· जिल्ह्यात दररोज 1600 थाळ्यांचे वितरण
बुलडाणा, दि. 8 : कोरोना प्रादुभार्व थांबविण्यासाठी शासनाने देशभरात संचारबंदी लागू केली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या काळात हाताला काम नसलेल्या व स्थलांतरणामुळे जिल्ह्यात आलेल्या मजुरांना शासन शिवभोजनालयाच्या माध्यमातून नाममात्र 5 रूपये दराने दररोज 11 ते 6 यावेळेत भोजन मिळत आहे. खरे तर ही शिवभोजन थाळी विस्थापितांसाठी जगण्याचा आधारच ठरली आहे.
शासनाची ही शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात बुलडाणा, मोताळा, मलकापूर, सिंदखेड राजा, नांदुरा, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, जळगांव जामोद, शेगांव व खामगांव येथे ही सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात एकूण 17 शिवभोजनालये कार्यान्वीत असून 1600 थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.
राज्य शासनाची महत्वांकांक्षी योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन योजनेने संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली. कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना बुलडाणा जिल्ह्यासाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी योजना उपयोगी ठरत आहे.
जिल्ह्यासाठी या काळात ही योजना अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन राबवित आहे. संपूर्ण जिल्ह्यात शिवभोजन थाळीचे वितरण सुरू करण्यात येत आहे. सध्या 1600 थाळी वाटप केल्या जात आहे. शिव भोजन थाळीचे स्वरूप संचार बंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे. त्यामुळे एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणे शक्य झाले आहे. बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू ,गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील दिले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात आणखी प्रखरतेने पुढे आली आहे. तरी ही शिवभोजन योजना संचारबंदीच्या काळात कमी मिळकत असणारे, स्थलांतरीत मजूरांसाठी जगण्याचा आधार आहे, एवढे मात्र निश्चित.
कोरोनाच्या लढाईतील पोलीसांचे कार्य कौतुकास्पद
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
· जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात मोबाईल सॅनीटायझेशन व्हॅनचा शुभारंभ
बुलडाणा, दि. 8 : कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले आहे. प्रत्येक देशात कोरोनाने पाय पसरले आहे. आपल्या देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. जिल्ह्यातही कोरोना बाधीत रूग्ण आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत पोलीस विभाग राबत आहे. संचारबंदीचे पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत आहे, प्रसंगी कारवाईसुद्धा करीत आहे. कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत पोलीसांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात मोबाईल सॅनीटायझेशन व्हॅनचा शुभारंभ पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते. प्रास्ताविकात मोबाईल व्हॅनच्या निर्मितीमागील भूमिका जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी व्यक्त केले. त्यांनी व्हॅनमुळे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गापासून बचावासाठी चांगलाच उपयोग होणार असल्याचे सांगितले. संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बुलडाणा पोलीस मोटार परिवहन विभागातील 'फोर्स मोटर्स लाईट व्हॅन' या वाहनाचा उपयोग संबंधित सुविधेसाठी करण्यात आला आहे. या वाहनामध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टम बसवण्यात आली असून वाहनाच्या टपावर 750 लिटर क्षमतेच्या टाकीचा वापर या कामासाठी करण्यात आला आहे. या टाकीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाणारे सोडिअम हायपोक्लोराईड सोल्युशन योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून पाईपद्वारे गाडीच्या आतील भागात सोडण्यात आले आहे. ही मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरणासाठी फिरणार आहे. या व्हॅनमधून 6 ते 7 सेकंदात पोलीस कर्मचारी सॅनीटायझींग होवून बाहेर पडणार आहे.
कोरोना अलर्ट : जिल्ह्यात आज प्राप्त 12 रिपोर्ट ‘निगेटीव्ह’, तर 1 पॉझीटिव्ह
* संस्थात्मक विलगीकरणात 16 नागरिकांची वाढ
* अलगीकरणात 10 संशयीत दाखल
बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यात आज 10 संशयीत व्यक्ती आयसोलेशन (अलगीकरण) करण्यात आले आहे. त्यामध्ये बुलडाणा कक्षात 1, खामगांवमध्ये 1 आणि शेगांव येथे 8 व्यक्तींचा समावेश आहे. काल संशयीत व्यक्तींचे 13 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आज 13 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 12 निगेटीव्ह व 1 पॉझीटीव्ह आला आहे. आज प्रयोगशाळेत 44 संशयीत व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.
घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये आज भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही. काल दि. 8 एप्रिल 2020 पर्यंत 96 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 10 नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 86 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात संस्थात्मक विलगिकरणात आज 16 व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज मुक्तता करण्यात आलेली नाही. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 102 नागरिक आहेत.
आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 24 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 5, शेगांव 1 व बुलडाणा 10 व्यक्तींचा समावेश आहे. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 57 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 95 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 24 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 30 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 14, शेगांव 5 व खामगांव येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.
आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 169 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 125 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 12 पॉझीटीव्ह व 113 निगेटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच 44 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
*******
रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र व सामान्य रूग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
बुलडाणा, दि. 8 : खामगांव तालुक्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र व खामगांव सामान्य रूग्णालयाला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील सोयी – सुविधा, कोरोना संदर्भात करण्यात आलेली तयारी व उपाययोजनांची पाहणी केली. संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
खामगांव येथील आयसोलेशन कक्षाची पाहणी करीत बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती घेतली. सामान्य रूग्णालयातील स्वच्छता, रूग्णांच्या सुविधा, औषधांचा पुरवठा व साठा, स्टाफ, डॉक्टर्स याबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार डॉ. शितल रसाळ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. बी वानखेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाब पवार आदी उपस्थित होते. तसेच रोहणा येथे डॉ. संगीता इंगळे, डॉ. मेघा जोहरी, आरोग्य सहाय्यक श्री. सोनपसारे, श्रीमती बगाडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment