कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…!
· लॉकडाऊन कालावधीत 85.64 क्विंटल उत्पादन
· शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करीत केली मासेमारी
· मत्स्यव्यवसाय विकास विभागाने दिल्या 72 पासेस
बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारिरीक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून कालावधी जरी लॉकडाऊनचा असला तरी मासळी उत्पादनाचा असल्याचा प्रत्यय त्यामुळे येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात 27 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 30 एप्रिल 2020 पर्यंत तलाव अथवा जलाशयांच्या ठिकाणी मासेमारी करून 85.46 क्विंटल मत्स्योत्पादन घेतले आहे. यावेळी मच्छिमारांनी लॉकडाऊनमधील पाळावयाच्या नियमांचे पालन केले आहे. उत्पादित केलेल्या मासळीची विक्रीही करण्यात आली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हा कार्यालयाने मासळी पकडणे, मासळीची वाहतूक करणे व विक्री करण्यासाठी 72 पासेस दिल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करताना मच्छिमार संस्थांना सहजता आली. लॉकडाऊन कालावधीत 23 मार्च ते आज 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 100 तलाव अथवा जलाशयांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था ठेकेदारांपैकी 27 मच्छिमार सहकारी संस्थांनी मासळीचे उत्पादन केले आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी उत्पादन, वाहतूक व विक्री सुरू असल्यामुळे रोजगाररही उपलब्ध झाले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे रोजगार उपलब्ध होवून मासळीचे उत्पादनही घेण्यात आले. असा दुहेरी उद्देश यशस्वी झाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेही घेतलेले महत्वाचे निर्णयही कारणीभूत ठरले आहे. मासेमारी करताना तलाव, जलाशयांजवळ शारिरीक अंतर, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधण्यात आला. तसेच दाटीवाटीने गर्दी न करता मासे विक्री करण्यात आली.
असे झाले तलाव निहाय मासळीचे उत्पादन
जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज 30 एप्रिल पर्यंत विविध तलावांमधून मासळीचे सहकारी मच्छीमार संस्थांनी घेतलेले उत्पादन पुढीलप्रमाणे आहे : मांडवा ता. सिं.राजा : 2.20 क्विंटल, कोराडी ता. मेहकर : 2.53, धनवटपूर ता. मेहकर : 2.77, धानोरी ता. चिखली : 1.10, लव्हाळा ता. मेहकर : 0.80 क्विं, नळगंगा ता. मोताळा : 12 , दहीद ता. बुलडाणा : 1, पलढग ता. मोताळा : 1.50, व्याघ्रा ता. मोताळा : 1, धामणगांव बढे ता. मोताळा : 4, पिंप्री गवळी ता. खामगांव : 3.59, गारडगांव ता. खामगांव : 3.50, कंडारी ता. नांदुरा : 4.50, लांजुड ता. खामगांव : 3.63, पिंपळगांव नाथ ता. मोताळा : 3, येळगांव ता. बुलडाणा : 10, धामणगांव देशमुख ता. मोताळा : 3, गंधारी ता. लोणार : 1.17, शिवणी जाट ता. लोणार : 0.70, पिंपळनेर ता. लोणार 2.50, झरी ता. बुलडाणा : 3.50, टाकळी ता. खामगांव : 4.90, बोरजवळा ता. खामगांव : 4.10, ब्राम्हणवाडा ता. चिखली : 3, किन्ही मोहदरी ता. चिखली : 1, राजुरा ता. जळगांव जामोद : 3 आणि खळेगांव ता. लोणार : 1.65 क्विंटल उत्पादन घेण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण 85.64 क्विंटल मासळी उत्पादन झाले आहे.
कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 21 रिपोर्ट ‘निगेटीव्ह’
बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात आज 30 एप्रिल रोजी 21 रिपोर्ट प्राप्त झाले. हे सर्व 21 रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 24 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे. त्यापैकी 17 रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 17 आहे, तर सध्या रूग्णालयात 6 रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 76 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 6 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 403 प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment