खामगाव मुलींच्या वसतिगृहाच्या वृत्तात तथ्य नाही
*समाजकल्याण विभागाचा खुलासा
बुलडाणा, दि. 27 : खामगाव येथील वसतिगृहात पुरुष गृहपाल असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे याबाबत समाज कल्याण विभागाने खुलासा केला आहे.
समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलींची 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी 2 वसतिगृहावर नियमित महिला गृहपाल कार्यरत आहे. उर्वरित 6 वसतिगृहावर कनिष्ठ लिपिक वर्गीय महिला गृहपाल कार्यरत आहे. सदर वसतिगृहावर नियमित महिला गृहपाल अद्यापपर्यंत भरलेले नसल्याने ही पदे रिक्त आहेत.
खामगाव येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये नियमित महिला गृहपाल नसल्याने सदर वसतिगृहाचा तात्पुरता प्रभार खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या नियमित पुरुष गृहपाल डी. बी. बोथिंगे यांच्याकडे सोपविण्यात आला. याबाबत सुरज बेलोकार, रा. खामगाव यांच्या तक्रारीनुसार महिला चौकशी समितीतर्फे मुलींच्या वसतिगृहाची चौकशी करण्यात आली. सदर चौकशी समितीच्या अहवालानुसार काहीही तथ्य नसल्याचे निदर्शनास आले आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचा प्रभार कनिष्ठ लिपिक वर्गीय महिला गृहपाल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची दि. 25 ऑगस्ट रोजी भेट घेतली. तसेच विद्यार्थिनींच्या अडचणीच्या अनुषंगाने चर्चा केली. विद्यार्थिनींनी नियमानुसार सर्व सोयी सुविधांचा पुरवठा झाला असल्याचे सांगितले. वसतिगृहाबाबत बदनामीकारक वृत्त प्रसिध्द केले जात असल्याबाबत तक्रार केली. त्यामुळे शहनिशा करून वृत्त प्रकाशित करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
00000
सेसफंड योजनेतून कृषि साहित्याचा लाभ
*अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 27 : जिल्हा परिषद सेसफंड योजना सन 2024-25 अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण योजनेतून 75 टक्के अनुदानावर कृषि साहित्य खरेदीवर अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर योजनेतून 5 एचपी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच, पॉवर स्प्रेअर्स आणि मानवचलित टोकनयंत्र कृषि साहित्य खरेदीवर अनुदान देणे प्रस्तावित आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता पंचायत समिती स्तरावर विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. गरजू शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात दि. 12 सप्टेंबर 2024 पर्यंत आवश्यक सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment