Monday, 12 August 2024

DIO BULDANA NEWS 11.08.2024

 


विभागीय आयुक्तांकडून शेगाव येथील अतिक्रमणाची पाहणी

बुलडाणा, दि. 11 : शेगाव येथील अतिक्रमणाची विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी पाहणी केली. शेगाव येथील पालखीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.

शेगाव शहरात दरवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून आगमन झाले. शेगाव येथे पालखी आल्यावर शहरात श्रींचा पालखी सोहळा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज दि.११ ऑगस्ट रोजी पोहचली. त्याअनुषंगाने श्री गजानन महाराज मंदिराच्या पालखी सोहळ्याची पूर्वतयारी करण्यात आली. शेगाव गेली दोन दिवस शहरात नगर परिषद कर्मचारी, तसेच पोलीस प्रशासनासमवेत अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. शहरातील रेल्वे स्टेशन ते श्री गजानन महाराज मंदिर परिसरामधील अतिक्रमण हटवून शेगावात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी रस्ता मोकळा करुन देण्यात आला.

तसेच पालखीच्या दिवशी अतिक्रमण होऊ नये यासाठी अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली, तसेच शेगाव शहरातील साफसफाईची कामे जलद गतीने स्वच्छ करण्याची कामे नगर परिषदेमार्फत करण्यात आले

विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, खामगाव, मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी श्री गजानन महाराज संस्थान सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर श्री गजानन महाराज संस्थामध्ये असलेल्या पोलिस मदत कक्षाला भेट दिली. यावेळी पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली.

पाहणीनंतर नगर परिषदेमार्फत गांधी चौक येथे माझी वसुंधरा अंतर्गत आयोजित सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाला भेट दिली. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी श्री गजानन वाटिका येथे वारकरी शिक्षण संस्था येथे जाऊन पालखीचे दर्शन घेतले.

00000

हर घर तिरंगा उपक्रमात प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवावा
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 11 : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात
दि. ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत  प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
हर घर तिरंगा उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात येणार आहे. तसेच तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रम सर्व शासकीय खासगी कार्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हर घर तिरंगा उपक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याची दक्षता घ्यावी. नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी. तसेच हर घर तिरंगा उपक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००
विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांचा दौरा
बुलडाणा, दि. 11 : विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. वडेट्टीवार यांचे सोमवार, दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. त्यानंतर मंगळवार, दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अकोला शहर अकोला ग्रामीण, बुलडाणा आणि वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या एकत्रित बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी पाच वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहातून अमरावतीकडे प्रयाण करतील.
००००००
नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी नोंदणी करावी
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 11 : जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम, तसेच अतिदुर्गम भागातील प्रतिभावंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रियेची माहिती पोहाचविण्यासाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. मागील वर्षी 12 हजार 379 विद्यार्थ्यांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली होती. यात यावर्षी किमान 10 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत नवोदय विद्यालय समितीतर्फे संपूर्ण देशभरात शैक्षणिक सत्र 2024-25 करीता इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी दि. 18 जानेवारी 2025 रोजी घेतली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थी त्यांच्या पालकांना दि. 16 सप्टेंबर 2024 पर्यंत navodaya.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करुन प्रवेश अर्ज भरावे लागणार आहे.
विद्यार्थी हा जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेत पाचवीत शिकत असावा. विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 मधील असावी. विद्यार्थी तिसरी चौथी शासनमान्य शाळेतून सलग उत्तीर्ण असावा. शासनाच्या नियमानुसार 75 टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अपंग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच मुलींना शासन नियमानुसार प्राधान्य देण्यात येणार आहे.. प्रमाणपत्राची अचूक माहिती भरताना यू-डायस प्लसमधील विद्यार्थ्यांचा विद्यार्थी कोड क्रमांक हा संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त करुन घ्यावा लागणार आहे. मुख्याध्यापकांची सही शिक्क्यासह प्रमाणपत्र संपूर्ण माहिती भरुन अपलोड करावे लागणार आहे. प्रवेश अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. आर. कसर यांनी कळविले आहे.
000000



आरसेटीमध्ये सोराबजी पोचखानवाला जयंती साजरी
बुलडाणा, दि. 11 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संस्थापक सर सोराबजी पोचखानवाला यांची १४३वी जयंती सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत साजरी करण्यात आली.
संचालक संदीप पोटे यांनी बँकेच्या स्थापनेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. स्वदेशी चळवळ आणि राष्ट्र उभारणीसाठी बँकेची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर सोराबजींनी महिला शाखा, गृह बचत खाते, क्रेडिट कार्ड आदी सेवा सुरू केल्या असल्याचे सांगितले. यावेळी सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
००००

 

No comments:

Post a Comment