Friday, 23 August 2024

DIO BULDANA NEWS 23.08.2024

 जिल्ह्यातील तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी

बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यातील तरुणांना जर्मनीमध्ये कुशल आणि अकुशल रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करुन सक्षम बनविण्यासाठी राज्य शासन जर्मनी सिस्टर स्टेट रिलेशनशीप अंतर्गत पथदर्शी प्रकल्प राबविणार आहे. यात युवकांना प्रशिक्षित करुन जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तसेच माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने जर्मन भाषा प्रशिक्षण, तसेच कौशल्य वृद्धी उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता मारोती गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली उबरहंडे उपस्थित होते.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या जर्मन भाषा प्रकल्पाची माहिती, प्रचार व संकल्पना तरुणांपर्यंत पोहचून जर्मनीत विविध कौशल्याधारीत रोजगार संधी बाबत माहिती दिली. तसेच शासनाच्या पथदर्शी उपक्रमाचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

विदेशातील रोजगाराच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक भाषा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्याची शिखर संस्था असलेल्या डाएट येथे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. समाधान डुकरे यांनी दिली. जर्मनीत विविध क्षेत्रात मागणी असलेले क्षेत्र आणि त्यासाठी लागणारे निकष स्पष्ट करण्यात आले. उद्योग, कृषी, वैद्यकीय क्षेत्रात युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत रोजगार, औद्योगिक, बांधकाम, दळणवळण आदीविषयी निगडीत कौशल्य प्राप्त युवकांना जर्मनीत रोजगार उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छित तरुणांनी maa.in या वेबसाईटवर अर्ज सादर करावा, असे आवाहन केले आहे.

0000000

होमगार्डची 27 ऑगस्टपासून मैदानी चाचणी

बुलडाणा, दि. 23 : जिल्हा होमगार्डची सदस्य नोंदणी करण्यात आली. यात आता दि. 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानात ही चाचणी होणार आहे.

जिल्ह्यातील 248 होमगार्ड सदस्य नोंदणीकरीता 12 हजार 762 पुरुष, तर 1 हजार 552 महिलांनी ऑनलाइन अर्ज केले आहे. या सर्व उमेदवारांनी आवेदन क्रमांकानुसार ठरवून दिलेल्या दिवशी सकाळी 6 वाजता मुळ आवेदनपत्र व कागदपत्रासह उपस्थित राहावे लागणार आहे.

महिला उमेदवार वगळून आवेदन क्रमांक 01 ते 2850 दि. 27 ऑगस्ट, 2851 ते 5700 दि. 28 ऑगस्ट, 5701 ते 8550 दि. 29 ऑगस्ट, 8551 ते 11400 दि. 1 सप्टेंबर, 11401 से 14228 दि. 2 सप्टेंबर आणि सर्व महिला उमेदवार दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. सदर तारखेस पाऊस आल्यास किंवा अडचणी आल्यास तारखेत बदल करण्यात येणार आहे. सर्व महिला उमेदवारांनी दि. 3 सप्टेंबर रोजी मैदानी चाचणी करिता सकाळी 6 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन होमगार्ड समादेशक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

00000000

परिवहन महामंडळात युवा कार्य प्रशिक्षण योजनेत संधी

*गुरूवारी उमेदवारांसाठी मेळावा

बुलडाणा, दि. 23 : राज्य मार्ग परिवहन महामंडळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कार्य प्रशिक्षण उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी गुरूवार, दि. 29 ऑगस्ट रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. यात पात्र युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात लिपीक टंकलेखकाच्या 12 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पात्रता पदवीधर, टायपिंग इंग्रजी 40 शप्रमि, मराठी 30 शप्रमि, एमएससीआयटी असावी लागणार आहे. सहाय्यक 10 जागांसाठी पात्रता आयटीआय मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, वेल्डर, मेकॅनिकल रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल, तसेच शिपाई 1 जागेसाठी पात्रता बारावी राहणार आहे. विजतंत्री 1 पदासाठी पात्रता आयटीआय इलेक्ट्रीशियन ट्रेड असावी लागणार आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असावी लागणार आहे. कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने राहणार आहे.

सदर मेळावा विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा येथे सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. उमेदवारांना मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. रिक्त पदासाठी ऑनलाईन नोंदणी करावी किंवा प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाण उपस्थित राहावे लागणार आहे त्याचप्रमाणे एम्प्लायमेंट कार्ड असणे आवश्यक आहे.

यांत्रिक प्रवर्गातील उमेदवारांना दोन शिफ्टमध्ये कामगिरी करावी लागेल. उमेदवारांना दिलेल्या नेमणूकीच्या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. उमेदवाराना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले आणि करीत असलेले उमेदवार या योजनेस पात्र राहणार नाहीत. असे आवाहन राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

000000

ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : ग्रंथालय संचालनालयाकडून उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडे जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकते व सेवकांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावे डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो.

राज्यातील शहरी आणि ग्रामीण विभागातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 75 हजार रुपये 50 हजार रुपये, 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता आणि एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवकांना प्रत्येकी 50 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र, तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता आणि उत्कृष्ट सेवकांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 26 ऑगस्ट 2024 ते दि. 25 सप्टेंबर 2024 पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

00000

ई-पिक पाहणीसाठी 15 सप्टेंबर अंतिम मुदत

बुलडाणा, दि. 23 : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई-पिक पाहणीची सुरुवात दि. 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. यात सातबारावर पिकपेरा स्वतः शेतकऱ्यांनी अॅन्ड्राईड फोनद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. शेतकरीस्तरावर पिक पाहणी करण्यासाठी अंतिम दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

जिल्ह्यातील 9 लाख 28 हजार 781 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 37 हजार 18 हेक्टर क्षेत्र, तसेच 6 लाख 61 हजार 135 खातेदारांपैकी 1 लाख 72 हजार 784 खातेदारांनी पिकांची ई-पिक पाहणी करून मोबाईल अॅपद्वारे सातबारावर नोंदणी केली आहे. आजवर जिल्ह्याची ई-पिक पाहणीची नोंदणी फक्त 31.60 टक्के क्षेत्रावर झाली आहे. तसेच खरीप हंगाम 2024 डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत जिल्ह्यातून निवड झालेल्या बुलडाणा तालुक्यात आजपर्यंत 57 हजार 694 हेक्टर क्षेत्रापैकी 20 हजार 768 हेक्टर क्षेत्र, तसेच 72 हजार 344 खातेदारांपैकी 21 हजार 578 खातेदारानी पिकांची ई-पिक पाहणी केली आहे. बुलडाणा तालुका डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई-पिक पाहणीची नोंदणी 36.01 टक्के क्षेत्रावर झाली आहे. उर्वरीत क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी अॅपद्वारे पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन आले आहे.

सदर पिक पाहणीची नोंदणी ई-पिक पाहणी व्हर्जन 3.0 या मोबाईल अॅपद्वारे करताना अॅन्ड्रॉईड फोन आवश्यक आहे. सदर अॅप गुगल क्रोम अपडेट करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई-पिक पाहणी अॅपद्वारे शेत बांधावर जावुन पिकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास किंवा हाताळता येत नसल्यास, संबंधीत गावाचे तलाठी, कोतवाल, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांची मदत घेवून पिकांची नोंदणी ई-पिक पाहणी अॅपद्वारे करावी. अॅपविषयी अडचण असल्यास तलाठी, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, डीसीएस निवड तालुक्यासाठी सहायक यांची मदत घ्यावी.

-पिक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी केली नसल्यास सातबारावर पिक पेरा कोरा राहणार आहे. तो नंतर भरता येत नसल्यामुळे पीक विमा आणि इतर शासकीय अनुदान, लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होणार आहे. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीबाबत पिक विमा मिळण्यासाठी सातबारावर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

बुलडाणा, दि. २३ : राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता दि. २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार, दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात आज दि. २२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment