तीन हजार आले अन् गावात दिवाळी साजरी झाली
बुलडाणा, दि. 17 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभाचे बँकेच्या खात्यात तीन हजार आले आणि गावात दिवाळी साजरी झाली, असे भावपूर्ण उद्गार प्रिया खरात या महिलेने काढले. भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला. ही योजना यशस्वी करण्याचा शब्द सरकारने रक्षाबंधनाआधी पाळल्याबद्दल आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या शुभारंभाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात महिला व बालकल्याण विभागाने महिलांनी त्यांच्या मदतीतून कुटुंबासाठी कापडे खरेदी केल्याचे दर्शविण्यात आलेली जाहिरात दाखविण्यात आली. या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या कथनकाप्रमाणे पाडळी गावात काल चित्र असल्याचे प्रियाने सांगितले. जाहिरातीतील वर्णन हुबेहुब गावात अनुभवले. शासनाने केलेली ही जाहिरात यशस्वी झाली आहे. योजना ज्या उद्देशाने राबविण्यात येणार आहे, तो उद्देश सफल झाला असल्याचे सांगितले.
माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ बँक खात्यात जमा होत असल्याचे माहिती पडताच गावातील नागरिकांनी बँकेत जाऊन पाहिले. अनेक महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाल्याचे दिसताच गावात जल्लोषाचे वातावरण होते. लाभ पोहोचताच घरोघरी ही योजना पोहोचली आहे. ज्याप्रमाणे दिवाळी सणाला हर्षोउल्हासचे वातावरण असते, तशाच प्रकारचे वातावरण काल गावात होते. रक्षाबंधनाच्या आधी महिलांना लाभ मिळणार असा शब्द सरकारने दिले होता, तो शब्द सरकारने पाळला आहे. रक्षाबंधनाआधी लाभ मिळणार असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. आज ते मोठे दादा ठरले आहेत. यापुढे महिला त्यांना मुख्यमंत्री दादा असा उल्लेख करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शुभारंभ कार्यक्रमात महिलांना मनोगत व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित महिलांपैकी प्रिया खरात यांनी पुढे येऊन मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना त्यांच्या भावना दाटून आल्या. कमी कालावधीत योजना लोकप्रिय होऊन लाभही मिळत असल्याने ही योजना 100 टक्के यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
लाडकी बहिण योजनेच्या लाभातून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ
बुलडाणा, दि. 17 : राज्य शासन विविध घटकांना मदत करणाऱ्या योजना राबवित आहे. नव्याने सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत जिल्ह्यातील असंख्य महिलांना लाभ देण्यात येणार आहे. महिलांनी या योजनांमधून मिळणारा लाभ योग्यरित्या उद्योगांमध्ये गुंतवावा, यातून उत्पन्नाचे साधन विकसित करून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी प्रमोद एंडोले, तहसिलदार विठ्ठल कुमरे, बाल विकास अधिकारी श्रीमती पांचाळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, माझी लाडकी बहिण योजनेत तीन लाख 86 हजार महिला पात्र ठरल्या आहेत. यात टप्प्याटप्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. केवळ बँक खाते आधार संलग्न नसल्याने योजनेची मदत देण्यास अडचण येत आहे. त्यामुळे महिलांनी प्राधान्याने बँक खाते आधारशी संलग्न करावे. थेट लाभाच्या मदत व्यतिरिक्त रेशन देण्यात येत आहे. तसेच सणाच्या काळात आनंदाचा शिधाही देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी बांबू लागवडीची योजना, फळबाग लागवड योजनेतून मदत देण्यात येत आहे. महिलांनी प्राधान्याने जॉब कार्ड काढावे. जॉबकार्डमुळे मनरेगा अंतर्गत लाभ घेता येणे शक्य आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उद्यमी होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात बचतगटाची चळवळ चांगली रुजली आहे. प्रत्येक महिलेने बचतगटाशी जुळून उमेद, माविम सारख्या यंत्रणांच्या सहाय्याने विकास साधावा. महिलांना मिळालेल्या मदतीची गुंतवणूक होणे गरजेचे आहे. त्यांनी स्वयंरोजगार सुरू करून कायमस्वरूपी पायावर उभे राहणे गरजेचे आहे. प्रामुख्याने कृषी मालावर प्रक्रिया, बीज उत्पादन केल्यास स्वयंपूर्ण होण्यास मदत मिळेल. तसेच युवा प्रशिक्षण कार्यक्रम, तिर्थाटन, वयोश्री आदी योजनांसाठी नोंदणी करावी.
एकही महिला सुटणार नाही – श्री. गायकवाड
आमदार श्री. गायकवाड यांनी, या योजनेमुळे राज्याचे चित्र बदलेले आहे. महिलांच्या संसारात मदत होत आहे. थेट लाभाच्या इतरही योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे माझी लाडकी बहिण योजना भविष्यात बंद होणार नाही. पात्र ठरलेल्या एकही महिला यातून सुटणार नाही. तसेच महिलांना वर्षाला तीन गॅस सिलींडरची रक्कमही मिळणार असलयाचे सांगितले.
श्री. जंगम यांनी कमी वेळात ही योजना यशस्वी झाली आहे. महिलांनी या योजनेचा चांगला उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. श्री. कुमरे यांनी योजनेचे अर्ज छाननीची माहिती दिली. तसेच इतरही योजनांसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभ मिळालेल्या लाभार्थी महिलांचा प्रमाणपत्र आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. प्रिया खरात यांनी महिलांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. अमोल डिघुळे यांनी आभार मानले.
00000
डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्लर्क ट्रेनीसाठी आज रोजगार मेळावा
बुलडाणा, दि. 17 : जिल्हा परिषद आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालय यांच्या वतीने रविवार, दि. 18 ऑगस्ट रोजी डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्लर्क ट्रेनी पदासाठी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
यावेळी पदवी, एमएससीआयटी, टायपिंग किंवा बारावी, एमएससीआयटी आणि टायपिंग ही शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी उपस्थित रहावे. यासाठी रोजगार विभागात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. सदर रोजगार मेळाव्यात उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक असून त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र दिले जाणार आहे, असे कौशल्य विकास व रोजगार विभागाने कळविले आहे.
०००००
मिनी मॅरेथॉनमधून आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती
बुलडाणा, दि. 17 : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्ती व्यवस्थापनासंबंधी जनजागृती करण्यासाठी आज मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखविली. यात शेकडो महिला आणि पुरूषांनी सहभागी होत आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती केली. महिला आणि पुरुषांच्या गटातून प्रत्येकी पहिल्या तीन स्पर्धकांना पदके देऊन गौरविण्यात आले.
मॅरेथॉन स्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ यांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी तहसिलदार विठ्ठल कुमरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, शिक्षण विभागाच्या वैशाली उंबरहंडे, परिवहन विभागचे निरीक्षक सुरज कोल्हे आदी उपस्थित होते.
आज सकाळी जयस्तंभ चौकातील गांधी भवनातून मॅरेथॉनला सुरवात झाली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि परत असा दोन किलोमीटरचा मॅरेथॉनच्या मार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यात आली. यात पूर, दरड कोसळणे, वीज कोसळणे, भूस्खलन, भूकंप, चक्री वादळे, थंडीची लाट, जंगलातील वणवे, आग, दुष्काळ आदीबाबत जनजागृती करण्यात आली.
महिलांच्या गटात प्रथम गौरी वसंता राठोड, चिखली, द्वितीय अस्मिता गजानन सोनुने, बुलडाणा, तृतीय मृणाल संजय पडोळसे बुलडाणा यांनी क्रमांक पटकाविला. तर पुरूषांच्या गटात प्रथम गौरव प्रकाश भराड, चिखली, द्वितीय आकाश रमेश बारवाल, जुनना, तृतीय विशाल संजय सोनुने, मढ यांनी क्रमांक पटकाविला.
बक्षीस वितरण कार्यक्रमात श्री. पोळ यांनी, धावणे आरोग्यासाठी चांगले असल्याने स्पर्धांमध्ये पदकापेक्षा आरोग्यासाठी धावावे. जिल्हाभरातील स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविल्याने ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. आज धावण्यातून स्पर्धकांनी आपत्तीचा सामना करण्यासाठी समाजात जनजागृतीसाठी संदेश दिला आहे. आजची स्पर्धा ही कमी अंतराची होती. यामुळे खेळाडूंनी गती ही स्पर्धा पूर्ण करणे गरजेचे होते. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तारासिंग पवार व सहकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी अव्वल कारकून कृष्णा जाधव, महसूल सहाय्यक सांडू भगत उपस्थित होते. स्पर्धेसाठी क्रीडा विभागातील श्री. गायकवाड, श्री. धारपवार, गोपालसिंग राजपूत, जिल्हा मैदानी संघटनाचे पदाधिकारी, विजय वानखेडे, हर्षल काळवाघे, रविंद्र भगत, मनोज श्रीवास यांनी सहकार्य केले.
0000000
जवाहर नवोदय प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 17 : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत १६ सप्टेबर आहे. यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
शैक्षणिक सत्र 2024-25 करीता सहावीतील प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी दि. 18 जानेवारी 2025 रोजी घेतली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी navodaya.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून प्रवेश अर्ज भरावा लागणार आहे.
जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेत पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 यामधील असावी. विद्यार्थी तिसरी आणि चौथी शासनमान्य शाळेतून सलग उत्तीर्ण असावा. यात 75 टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. अपंग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच मुलींना प्राधान्य देण्यात येते. प्रमाणपत्राची अचूक माहिती भरताना यू-डायस प्लस मधील विद्यार्थ्यांचा विद्यार्थी कोड क्रमांक हा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त करून घ्यावा. मुख्याध्यापकांची सही आणि शिक्क्यासह प्रमाणपत्र संपूर्ण माहितीने भरून अपलोड करावे लागणार आहे. प्रवेश अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
जिल्ह्यातील ग्रामीण तसेच दुर्गम, अतिदुर्गम भागातील प्रतिभावंत. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेशाबाबत माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. मागील वर्षी 12 हजार 379 विद्यार्थ्यांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली होती. यावर्षी यात वाढ होणे अपेक्षित आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
आरसेटीतर्फे सूक्ष्म उद्योजकता विकास प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 17 : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार रोजगार प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्यावतीने समुदाय संसाधन व्यक्ती यांच्यासाठी सूक्ष्म उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित केले आहे. सदर प्रशिक्षण 13 दिवसांचे राहणार आहे.
यामध्ये स्वयंरोजगाराची गरज, क्षमता प्रशासन, प्रभावी संप्रेषण, व्यवसाय संधी मार्गदर्शन, बाजार सर्वेक्षण, बँकिंग, नेतृत्व गुणाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून दिलीप ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.
0000
सोमवारी जिल्ह्यात स्थानिक सुट्टी
बुलडाणा, दि. 17 : जिल्हाधिकारी यांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करून जिल्ह्यात सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) निमित्त स्थानिक सुटी जाहीर झाली आहे. यानंतर ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त दि. 11 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी राहणार आहे. सदर सुट्टी ही जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी न्यायालय आणि अधिकोष यांना लागू राहणार नाही.
00000
No comments:
Post a Comment