Friday, 9 August 2024

DIO BULDANA NEWS 09.08.2024

 ‘हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*ध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे

बुलडाणा, दि. 09 : स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ मोहिम दि. 9 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही दि. 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने 9 उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत दि. 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. प्रत्येक गाव, शहरामध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा यासाठी पोस्ट ऑफिस, खादी ग्रामोद्योग, खाजगी आस्थापना, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच जिल्हा, शहरातील महत्वाच्या शासकीय इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे.

राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी केल्या आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्डस्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीचा असावा. याव्यतिरिक्त प्लास्टिक किंवा इतर वस्तूपासून निर्मित राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती असावा, त्याची लांबी व रुंदीचे प्रमाण 3:2 असावे. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात असावा. त्याचा आकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 -  लांबी,  रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मीमी, प्रकार 2 – लांबी व रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3 - लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 - लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7- लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8-  लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 -  लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मीमी असावी.

राष्ट्रध्वजासाठी वेलस्पून, राकेश दौडडियाल 9818509875, ग्रासिम इंडस्ट्रीज, उदय खाडीलकर 8422969992, अनिरत कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट लिमीटेड, कबीर कुमार 8800265779, 8377885588, अलोक इंडस्ट्रीज, नागेंद्र भुत्रा 9930306145, शाही इक्सपोर्ट सुनील वझीरानी 9818146457, कस्तुरी एंटरप्रायजेस, विजयभाई कस्तुरी 9924984410, सस्टेन फॅब एंटरप्रायजेस, अमित मांजरेकर 9820515598, मेंड्रो कॉर्पोरेशन, अरुण गोपाल 7210273000 यांच्याशी संपर्क साधावा.

राष्ट्रीय सणावेळी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. भारतीय ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेले, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. उपयोगात आणलेले ध्वज सन्मानपूर्वक जतन करावे किंवा शासकीय यंत्रणांना सोपवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000




सोयाबीन पिकातील हुमणी किड नियंत्रण करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 09 : जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन पिकात हुमणी किडीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हुमणी किडीचे नियंत्रण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषि विज्ञान केंद्राच्या किड सर्वेक्षणात सोयाबीन पिकात हुमणी किडीचा प्रादुर्भाव चिखली तालुक्यातील काटोडा, अमोना, चंदनपूर, अंत्री या गावात आढळून आला आहे. किडीची अळी जमिनीत राहून पिकांच्या मुळावर हल्ला करून उपजिविका करते. त्यामुळे झाडे वाळतात. अंडी अवस्थेमधून अळी अवस्थेमध्ये आल्यानंतर ही कीड अळी अवस्थेत सुमारे 7 ते 9 महिन्यापर्यंत जिवंत राहते. या किडीचे वर्षभरामध्ये एकच जीवनचक्र असून बहुपिकांच्या मुळावर हल्ला करून ही उपजिविका करते. जिल्ह्यामध्ये कमी पाऊस आहे आणि हलकी जमिन आहे, अशा ठिकाणी हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

किडीच्या नियंत्रणासाठी सद्यस्थितीत करावयाच्या उपाययोजनेत उभ्या पिकामध्ये एका सरळ रेषेत हुमणी अळीमुळे मर होत असल्यास मेटारायझियम अॅनिसोपली या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रादूर्भावग्रस्त भागात पिकाच्या मुळाजवळ आळवणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून हुमणी ग्रस्त झाडाच्या मुळाजवळ आवळणी करावी.

किडीचा उद्रेक होऊ नये, यासाठी सोयाबीन पिकात हुमणी किड नियंत्रणासाठी उपयायोजना करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्‍ज्ञ किटकशास्त्रज्ञ प्रवीण देशपांडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. ए . एस. तारू यांनी केले आहे.

000000






इग्नाईट महाराष्ट्र परिषदेत उद्योजकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 09 : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित इग्नाई महाराष्ट्र परिषदेत जिल्ह्यातील 375 उद्योजकांनी सहभाग नोंदविला. परिषदेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ही परिषद यशस्वी झाली.

बुलडाणा रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमाला बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, उद्योग उपसंचालक रंजना बोराळे, विदेश व्यापार महासंचालनालयाच्या संचालक स्नेहल ढोके, आयडीबीआयचे वरीष्ठ कार्यकारी लोहीत ऋषी, सिडबीचे महाव्यवस्थापक मनोज सहयोगी, न्यू इंडिया इंन्श्युरंस कंपनीचे आनंद अमृतकर, वस्तू व सेवा कर उपायुक्त आत्माराम अवचार, कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी भास्कर मोरडे, डाक विभागाचे गजेंद्र जाधव, चैतन्य बायोटेकचे संचालक प्रसन्न देशपांडे, कामगार उपायुक्त विजय शिंदे विभाग उपस्थित होते.

प्रसन्न देशपांडे यांनी निर्यात करताना आंतराष्ट्रीय घडामोडीचा निर्यातीवर परिणाम होत असल्याचे सांगितले. रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनच्या समुद्रीमार्गाभोवती रशियाच्या सैनिकांनी घेराव घातल्याने भारतातून निर्यात होणारे कंटेनर सहा महिन्यापर्यंत अडकले असल्याचे सांगितले. अशा प्रकारे विविध कारणांनी निर्यातीस अडसर निर्माण होत असल्याचे सांगितले. भास्कर मोरडे यांनी औद्योगिक धोरणामध्ये एकात्मिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आले. त्यानंतर 2019 मध्ये मैत्री पोर्टल अद्ययावत करण्यात आले. सद्यस्थितीत या पोर्टलवर 18 विभागाच्या एकुण 119 ऑनलाईन सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले. स्नेहल ढोके यांनी, निर्यातीसाठी सर्वप्रथम आयात निर्यात कोड देण्यात येतो. तसेच विदेश व्यापार संचालनालयाकडे नोंदणी केल्यानंतर कस्टम ड्युटी माफ होते. तसेच कृषि उत्पादनाकरीता अॅपेडाकडे नोंदणी करावी लागत असल्याचे सांगितले. लोहीत रुषी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या उद्योजकांना 5 कोटीपर्यंत विनातारण कर्ज देण्यात येत असल्याचे सांगितले. आनंद अमृतकर यांनी उद्योजकांनी घटकाचा विमा काढणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्योग सुरु होण्यास विलंब झाल्यास होणाऱ्या नुकसानीचा भरणा केला जात असल्याचे सांगितले. गजेंद्र जाधव यांनी, पोस्ट विभागामार्फत उद्योजकांना 35 किलोपर्यत वजनाचे उत्पादने देश किंवा देशाबाहेर निर्यात करायचे असल्यास बुकींग केल्यानंतर डाक कर्मचारी पॅकिंगपासून पार्सल सुरक्षित वाहतूक करण्याची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे परिषदेच्या आयोजनाची माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली. सन 2024-25 करीता 1500 कोटीचे निर्यातीचे लक्षांक ठेवण्यात आले आहे. यासाठी उद्योजकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

00000

हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहिमेचे आज उद्घाटन

बुलडाणा, दि. 09 : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचे उद्घाटन आज करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचे उद्घाटन लॉन्च इव्हेंट दूरदृष्य प्रणालीद्वारे दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र अर्बन बँकेच्या मेहकर येथील मुख्य कार्यालयातून होणार आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 09 : शैक्षणिक वर्ष सन 2023-24 या वर्षातील महाडीबीटी प्रणालीवरील महाविद्यालयस्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेले अर्ज महाविद्यालयांना पाठविण्यात येतात. महाविद्यालयांनी प्राप्त अर्जांची तपासणी करुन शिष्यवृत्तीकरिता पात्र अर्ज समाज कल्याण कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. तसेच त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत करणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील 669 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत.

            महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तपासणी करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या लॉगीनला दि. 25 ऑगस्‍टपर्यंत पाठवावे. त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थी लॉगीनला परत करावेत. महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु

बुलडाणा,दि. 09 : जवाहर नवोदय विद्यालयातील शैक्षणिक सत्र 2024-25 मधील पाचवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सन 2025-26 मध्ये सहावी करिता प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया दि. 19 जुलैपासून सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 16 सप्टेंबर आहे.

ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही शुल्क नाही. प्रवेशसाठी विद्यार्थी जिल्ह्यातील रहिवासी असावा. तसेच शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेत पाचवीत शिकत असावा.  विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 मधील असावी. विद्यार्थी तिसरी आणि चौथीमध्ये शासनमान्य शाळेतून सलग उत्तीर्ण असावा. विद्यार्थ्यांना पालक व विद्यार्थी यांचे स्वाक्षरी असलेले, तसेच संबधित शाळेतील मुख्याध्यापकांचे सत्यापन केलेले आणि संपूर्ण भरलेले विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र अर्ज भरताना अपलोड करावे लागणार आहे. विद्यार्थी आणि पालकाची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी. विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करुन अपलोड करावा.

ऑनलाईन अर्ज navodaya.gov.in या संकेतस्थळावर भरावे लागणार आहे. सदर परीक्षा ही शनिवार, दि. 18 जानेवारी 2025 होणार आहे, असे नवोदय विद्यालय प्राचार्य आर. आर. कसर यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment