17 ऑगस्ट पासून जमा होणार
माझी लाडकी बहिणीचा पहिला हप्ता
बुलडाणा, दि. 14 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता दि. 17 ऑगस्टपासून बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी बँक खाते आधार सिडींग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात तीन लाख 87 हजार महिलांनी फॉर्म भरलेले आहे. यातील पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या बँक खात्यात 17 तारखेपासून पहिला हप्ता जमा होण्यास सुरूवात होणार आहे. योजनेच्या लाभासाठी सदर केलेल्या फॉर्ममध्ये आधार सिडिंग बँक खाते दिलेले असतील, त्यांच्या खात्यात माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता जमा सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास तात्काळ बँक खाते आधारशी संलग्न करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
युवा कार्य प्रशिक्षणाच्या सात उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान
बुलडाणा, दि. 14 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेत निवड करण्यात आलेल्या सात उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेंतर्गत सात विद्यार्थ्याची डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्लर्क ट्रेनी म्हणून निवड करण्यात आली. या निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात शहरातून निघाली तिरंगा प्रभात फेरी
*विद्यार्थ्यांना दिली तिरंगा शपथ, स्वाक्षरी मोहिम
बुलडाणा, दि. 14 : स्वातंत्र्य दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमात आज जिल्हा प्रशासनातर्फे तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. यात शहरातील सात शाळांतील दोन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. जिजामाता प्रेक्षागार येथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तिरंगा प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, गटविकास अधिकारी सरीता पवार, तहसिलदार विठ्ठल कुमरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हा क्रिडा अधिकारी बी. एस. महानकर आदी उपस्थित होते.
सुरवातीला उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना तिरंगा शपथ देण्यात आली. तसेच हर घर तिरंगा मोहिमेत स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली. यावर जिल्हाधिकारी डॉ. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी स्वाक्षऱ्या करून मोहिमेला सुरूवात केली.
त्यानंतर तिरंगा रॅली जिजामाता प्रेक्षागार, संगम चौक, जयस्तंभ चौक, तहसिल चौक मार्गे निघून जिजामाता प्रेक्षागार येथेच समारोप करण्यात आला. या रॅलीत भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, सहकार विद्या मंदिर, सेंट जोसेफ स्कूल, एडेड हायस्कूल, शिवाजी विद्यालय, उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रॅलीसाठी जिल्हा प्रशासनासोबतच नगर पालिका, क्रिडा विभाग, शिक्षण विभाग यांनी सहकार्य केले.
000000
जिल्हाधिकारी कार्यालयात आधार केंद्राचे उद्धाटन
बुलडाणा, दि. 14 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील उपविभागीय कार्यालयात डाक विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या आधार केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, डाक अधीक्षक गणेश अंभोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात याआधीही एक आधार केंद्र कार्यान्वित आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे आधार केंद्रावर आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी गर्दी होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे आधार केंद्र सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याठिकाणी मोबाईल क्रमांक जोडणे, अपडेट करणे, नावातील दुरूस्ती, अद्ययावतीकरण आदी आधारविषयक कामे केली जाणार आहे. तसेच डाक विभागातर्फे बचत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000000
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
बुलडाणा, दि. 14 : भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरूवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता राष्ट्रध्वजारोहण होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
भारतीय डाक विभागाची दिनदयाल फिलाटेली शिष्यवृत्ती योजना
* 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत
बुलडाणा, दि. 14 : भारतीय डाक विभागातर्फे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यामध्ये फिलॅटेली मार्फत फिलॅटेलीक स्टॅम्पची माहिती, तसेच स्टॅम्प संग्रहाबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी दिनदयाल शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यावर्षीच्या दिनदयाल शिष्यवृत्ती योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे.
या योजनेचा मूळ हेतू हा विद्यार्थ्यांमध्ये डाक विभागाप्रती आवड निर्माण व्हावी हा आहे. या योजनेतून फिलॅटेली छंद म्हणून जोपासणाऱ्या भारतातील 920 विद्यार्थ्यांना सहा हजार रूपये प्रती वर्ष याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.
00000
राष्ट्रीय क्रीडा दिनी खेळाडूंचा सत्कार
बुलडाणा, दि. 14 : राज्यातील क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि नागरिकांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण होण्यासाठी हॉकीचे जादुगर स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त केंद्र आणि राज्य शासनातर्फे 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातर्फे खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 21 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणार आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात केले जाणार आहे. यात मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमेचे पुजन, जीवनावर व्याख्यान, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार, खेळाडूंना मान्यवरांचे मार्गदर्शन, खेळांच्या विविध क्रीडा स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात दि. 1 ऑगस्ट 2023 ते दि. 30 जुलै 2024 मध्ये शालेय आणि अधिकृत एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य तथा सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 25 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करावीत. या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. खेळाडूंनी दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता सहकार विद्या मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
00000
ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा
*समाज कल्याण विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 14 : ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र 1 व 2, शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेत राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना सुस्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येणार आहे.
सदर योजनेंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरीक असमर्थतता, दुबर्लतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट सर्वाइकल कॉलर आदीचा समावेश आहे. मनस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी 3 हजार रूपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरीकांचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा. तसेच नोंदणीची पावती आवश्यक आहे. आधारकार्ड नसल्यास आणि स्वतंत्र दस्ताऐवज असल्यास ते ओळख पटविण्यासाठी पुरेसे असणार आहे. लाभाच्या पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा रेशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत किंवा राज्य, केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात.
लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रूपयांच्या आत असावे. याबाबत लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. मागील 3 वर्षाचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून तेच उपकरण विनामुल्य प्राप्त केलेले नसावे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरीत झाल्यावर विहित केलेली उपकरण खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत पोर्टलवर अपलोड करणे आवयक राहणार आहे.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, तसेच योजनेबाबत नागरीकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातून माहिती घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment