Wednesday, 7 August 2024

DIO BULDANA NEWS 07.08.2024



बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी 2023 मधील पीकविमा मिळण्याचा मार्ग कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केला मोकळा


खरिपातील 55 कोटी व रब्बीतील 119 कोटी रुपये पीकविमा 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार - धनंजय मुंडे


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्ह्याचा प्रलंबित विम्याचा प्रश्न निकाली


मुंबई (दि. 07) - बुलढाणा जिल्ह्यात खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023 मध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने द्यावयाचा प्रलंबित पीक विमा येत्या 31 ऑगस्ट च्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावा असे निर्देश आज मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीस दिले आहेत. 


पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा पिक विमा नाकरायचा असेल तर त्यासाठी ठोस कारण देऊन विशिष्ट मुदतीत पिक विमा नाकारणे बंधनकारक आहे. या अटीचे पालन पिक विमा कंपनीने केले नसल्यामुळे त्यांच्यावर प्रसंगी एफ आय आर करण्यास मागे पुढे बघणार नाही, असा सज्जड दम कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपन्यांना या बैठकीत भरला.


बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी यांच्या मागणीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2023 मध्ये प्रलंबित पीक विम्याचा विषय निकाली काढण्याच्या अनुषंगाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत श्री मुंडे बोलत होते.  


बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पिक विमा बाबत हरकती दाखल करण्यास 72 तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाइन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून 31 ऑगस्ट पर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. 


या बैठकीतील निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023 चे 119 कोटी तर खरीप हंगामातील 55 कोटी रुपये येत्या 31 ऑगस्ट पूर्वी खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधी यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.


या बैठकीस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.संजय रायमूलकर, आ.श्वेताताई महाले, आ.आकाश फुंडकर, आ.संजय गायकवाड, आ.डॉ.संजय कुटे, कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही.राधा, उपसचिव प्रतिभा पाटील, उपसचिव नीता शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिन्द्र सावंत, कृषी आयुक्तालयाचे वैभव तांबे, कृषी संचालक विनायकुमार आवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, भारतीय कृषी विमा कंपनीचे उपप्रबंधक सचिन हराळ, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अभिजित उद्धव आदी उपस्थित होते.

00000

 बुलडाणा विधानसभा मतदारसंघात सहा नवीन मतदार केंद्र

बुलडाणा, दि. 07 : निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार बुलडाणा 22 विधानसभा मतदारसंघात 6 नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे.

नव्याने निर्माण केलेल्या मतदारकेंद्राचा नाव व क्रमांक 75 जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खोली क्र. 3, गजानन महाराज मंदिराजवळ, मोताळा, 109 जिल्हा परिषद प्रायमरी शाळा, रामगाव, 136 जिल्हा परिषद प्रायमरी शाळा, नेहरुनगर, 233 जिल्हा परिषद मराठी प्रायमरी शाळा खोली क्र. 1, गोंधनखेड, 248 जिल्हा परिषद मराठी प्रायमरी शाळा, हनवतखेड, 292 जिल्हा परिषद मराठी प्रायमरी शाळा, अफजलपूरवाडी ही सहा नव्याने निर्माण केलेली मतदान केंद्र आहेत.

नव्याने निर्माण झालेल्या मतदान केंद्राबाबत, तसेच 28 मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यात आले आहे. मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमानुसार 6 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. 20 ऑगस्टपर्यंत नागरिकांनी दावे व हरकती दाखल करता येणार आहे. मतदार यादी अंतिम प्रसिद्धी दि. 30 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

सदर यादी विधानसभा निवडणूकीसाठी उपयोगात आणली जाणार असल्याने नागरिकांनी मतदारयादीत आपले नाव असलयाची खात्री करावी. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार व्ही. एस. कुमरे यांनी केले आहे.

00000000

मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

बुलडाणा, दि. 07 : निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. नागरिकांनी मतदारयादीत नव्याने नाव नोंदणी, दुरूस्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळापत्रकानुसार प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी दि. 6 ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. दावे व हरकती दाखल करण्यासाठी दि. 20 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. विशेष मोहिमेत दि. 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्टमध्ये येणाऱ्या सर्व शनिवार, तसेच रविवारी दावे व हरकती दाखल करता येतील. दि. 29 ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढणे, आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार अंतिम यादी प्रसिद्धीसाठी सादर करणे, मतदानयादीमध्ये आदेशानुसार सुधारणा करुन प्रसिद्धीसाठी पाठविण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी दि. 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सदर यादी उपयोगात आणली जाणार असल्याने नागरिकांनी मतदान यादीत नाव असल्याची खात्री करावी. तसेच मतदान नोंदणीसाठी बीएलओ यांच्या घरोघरी भेटीवेळी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि तहसिलदार व्ही. एस. कुमरे यांनी केले आहे.

00000000

चर्मकार विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 07 : सामाजिक न्याय विभागांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून चर्मकार, डोहर, मोची व होलार जातीकरीता विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. सन 2024-25 या वर्षासाठी उदिष्टे प्राप्त झाले असून योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळातर्फे 50 टक्के अनुदान योजनेत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये बँकेचा सहभाग 40 हजार रुपये आणि महामंडळाचे अनुदान 10 हजार रुपये कर्ज दिले जाते. बीज भांडवल योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. यात बँकेचे 75 टक्के कर्ज, लाभार्थी सहभाग 5 टक्के आणि महामंडळाचे अनुदान 10 हजार रुपये कर्ज दिले जाते.

केंद्र शासनाच्या योजनेमार्फत मुदती कर्ज योजना, लघु ऋण वित्त योजना, महिला समृद्धी योजना, महिला अधिकारीता योजनेमध्ये महामंडळाचे 50 हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक डी. व्ही. भानावतकर यांनी केले आहे.

0000000 

स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 07 : वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना राबविण्यात येते. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, तसेच पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपनीमार्फत वडार व रामोशी समाजातील नागरिकांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघू उद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारीक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक आणि महामंडळामाध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. सदर दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्यांना मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहे. महामंडळातर्फे व्याजाची 12 टक्यांपर्यंत रक्कम लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेबाबत मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या vjnt.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेच्या लाभासाठी पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत आणि थेट कर्ज योजनेंतर्गत 1 रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. महामंडळाच्या कार्यालयात योजनेचे अर्ज उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा. इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेस सुरवात

बुलडाणा, दि. 07 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त बुलडाणा आणि चिखली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आणि चिखली मुलींच्या वसतिगृहातील शैक्षणिक वर्ष 2024-25 याकरीता प्रवेश प्रक्रिया सुधारीत वेळापत्रकानुसार ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना hmas.mahait.org या पोर्टलवर दि. 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. सन 2024-25 शैक्षणिक वर्षाकरीता व्यावसायिक अभ्यासक्रम अथवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन, तसेच ऑनलाईन भरलेला अर्ज पोर्टलवरुन डाऊनलोड करून त्याची प्रिंट सबंधित वसतिगृह कार्यालयास ऑफलाईन सादर करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment