कृषि विभागाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाकडे वळवावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 01 : जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचे लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र ही पिके नगदी पिके असली तरी यातून शाश्वत उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे कृषि विभागाने शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळणारे इतर पिके, फळपिके, औषधी वनस्पतीकडे वळवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी योजनांची माहिती सादर केली.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, परंपरागत शेतीपासून शेतकऱ्यांना परावृत्त करणे आवश्यक आहे. नगदी पिके असणाऱ्या सोयाबीन आणि कापसापासून शेतकऱ्यांना परवडेल असे उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पर्यायी पिके, भाजीपाला, फळपिकांकडे वळविणे आवश्यक आहे, असे करीत असताना शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा. शेती किफायतशीर करण्यासाठी किटकनाशके आणि खतांचा वापर प्रमाणात करण्यात यावा.
शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीसाठी ई-पिक पाहणी महत्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करावी, यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांना देण्यात येणारे सर्व लाभ आधार संलग्न बँक खात्यात देण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बँक खाते आधार संलग्न करावे, मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी ठेवावा. यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचतील. पारंपरिक पिकांपासून शेतकऱ्यांना फळपिकांकडे वळविताना विविध फळपिके घेण्यासाठी त्यांना माहिती देण्यात यावी.
जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकांचे लागवडीखालील क्षेत्र कमी करावे. सध्यास्थितीत या दोन्ही पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात नसल्याने प्रक्रियेसाठी इतर राज्यात जात आहे. या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यात औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. औषधी वनस्पती लागवड होण्यासोबतच त्यावरील प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
000000
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 01 : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अक्षय गोडगे, डॉ. जयश्री ठाकरे, तहसिलदार संजीवनी मुपडे आदी उपस्थित होते.
00000
जुन्या अभिलेखांच्या संगणकीकरणाने महसूल पंधरवड्यास सुरवात
बुलडाणा, दि. 01 : महसूल पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यास आजपासून सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे 100 वर्षे जुन्या अभिलेखांच्या संगणकीकरणास सुरवात करून महसूल पंधरवड्यास सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते संगणकीकरण करण्यात येत असलेल्या कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अक्षय गोडगे, डॉ. जयश्री ठाकरे, तहसिलदार संजीवनी मुपडे आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, गतीमान प्रशासनासाठी ई-ऑफीस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याचा सर्व कर्मचाऱ्यांनी उपयोग करावा. प्रशासनात संगणकीकरणामुळे गती येणार असल्याने 100 वर्षे जुन्या दस्तावेजांचे संगणकीरण करण्यात येणार आहे. हे सर्व संगणकीकृत दस्तावेज संकेतस्थळावर सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना लाभ होणार असून कार्यालयात येण्याचा वेळीही वाचणार आहे.
सुरवातीला भूसंपादनाची प्रकरणे संगणकीकृत करण्यात येणार असून टप्याटप्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दस्तावेजांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. संगणकीकरणामुळे आपत्तीमुळे मूळ कागदपत्रे नष्ट होण्याचा धोका राहणार नाही. त्यामुळे दस्तावेजांचे संगणकीकरण महत्वपूर्ण ठरणार असल्याचे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
000000
मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 01 : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 60 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना योजनेत महाराष्ट्रासह भारतातील तिर्थदर्शन होणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील 60 वर्षापुढील नागरीकांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी राज्य शासनाने सर्व जातीधर्मातील नागरिकांसाठी मोफत तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत राज्यातील 66 आणि भारतातील 73 पैकी एका स्थळाची दर्शनभेट होणार आहे. या योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकाच वेळी घेता येणार आहे. अर्ज सादर करताना आधार कार्ड, फोटो, स्वयंम घोषणापत्र, अर्ज, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, हमीपत्र कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
00000
माझी लाडकी बहीण योजनेसाठी संकेतस्थळ सुरू
बुलडाणा, दि. 01 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना अर्ज करणे सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दि. 1 ऑगस्ट 2024 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in संकेत स्थळ सुरु करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी नारीशक्तीदूत ॲपवर अर्ज भरले आहेत, त्यांना या पोर्टलवर पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नसल्यास त्यांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.
00000
पारधी वस्तीवर बालसंस्कार केंद्र सुरु करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. 01 : पारधी समाजाच्या मुलांसाठी पारधी वस्तीवर बालसंस्कार केंद्र सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
सन 2023-24 या वर्षात मंजूर निधीतून पारधी समाजाच्या मुलांसाठी पारधी वस्तीवर चार बालसंस्कार केंद्र सुरु करण्यात येणार आहे. गौलखेड, ता. शेगाव, झोडगा आणि धोगर्डी, ता. मलकापूर, नागापूर, ता. खामगाव येथे बालसंस्कार केंद्र सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्था पारधी मुलांसाठी बालसंस्कार केंद्र चालविण्यासाठी इच्छुक असावी. यासाठी संस्थांनी दि. 12 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत. योजेनेचा छापील प्रस्ताव कार्यालयातून विनामुल्य देण्यात येणार आहे. परिपूर्ण प्रस्ताव दि. 13 ऑगस्ट 2024 पर्यंत स्विकारण्यात येतील, असे एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
0000000
सोमवारी लोकशाही दिन
बुलडाणा, दि. 01 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.
लोकशाही दिनासाठी तक्रारदारांनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे तहसीलदार संजिवनी मुपडे यांनी कळविले आहे.
000000000
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
*पालखीमुळे प्रचलित मार्गात बदल
बुलडाणा, दि. 01 : श्री संत गजानन महाराज यांच्या परतीच्या पालखीनिमित्त जिल्ह्यातील मार्गात बदल करण्यात आले आहे. नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालेगाव, जि. वाशिम, मेहकर, सुलतानपूर, सिंदखेडराजा, न्हावा, जालना या सध्या प्रचलित असलेला मार्गावरील वाहतूक मालेगाव, जि. वाशिम, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, जालना या पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे. जालना, न्हावा, सिंदखेड राजा, सुलतानपूर, मेहकर, मालेगाव, जि. वाशिम या प्रचलित मार्गावरील वाहतूक जालना, देऊळगाव राजा, चिखली, मेहकर, मालेगाव, जि. वाशिम या मार्गावर वळविण्यात आली आहे. हा वाहतूक बदल दि. 3 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजल्यापासून दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे. या पर्यायी मार्गाचा नागरिकांनी अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000000
राज्य खादी, ग्रामोद्योग मंडळाचे कार्यालय स्थलांतरीत
बुलडाणा, दि. 01 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत झाले आहे.
नवीन जागेचा पत्ता हा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, आशिर्वाद बिल्डींग, मुठ्ठे ले आऊट, मलेरिया ऑफिस जवळ, जिल्हा बुलडाणा असा आहे. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
000000000
No comments:
Post a Comment