Tuesday, 6 August 2024

DIO BULDANA NEWS 06.08.2024

उद्योजकांसाठी गुरूवारी इग्नाईट महाराष्ट्र परिषद

बुलडाणा, दि. 06 : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी गुरूवार, दि. 8 ऑगस्ट रोजी इग्नाईट महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे सकाळी 9.30 वाजल्यापासून ही परिषद सुरू होणार आहे. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील अध्यक्षस्थानी राहतील. तसेच उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या परिषदेला जिल्ह्यातील उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, सहसंचालक गजेंद्र भारती यांनी केले आहे.

परिषदेमध्ये प्रमोद लांडे आणि प्रसन्न देशपांडे बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाबाबत अनुभव सांगतिल. मैत्रीचे विजय शिंदे सिंगल विंडो बाबत माहिती देतील. निर्यात संचालनालयाच्या स्नेहल ढोके भारत सरकारच्या नियांतविषयक योजनांची माहिती देणार आहेत. सिडबीचे महाव्यवस्थापक मनोज सहयोगी सिडबीच्या उद्योगांना असणाऱ्या योजनांची माहिती देतील. आयडीबीआयचे विक्रम जैन उद्योजकांसाठी असणाऱ्या बँकेच्या योजना सांगतील. न्यू इंडिया एश्युरंस कंपनीचे आनंद अम्रीतकर निर्यात विषयक योजनांची माहिती देतील.

डाक विभागाचे डाक अधीक्षक जी. एन. जाधव डाक निर्यात केंद्राची माहिती देतील. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे कृषि विभागाच्या निर्यातविषयक योजनांची माहिती देतील. अंकित गुप्ता जिल्ह्याच्या निर्यात आराखड्याबाबत माहिती देतील. धिरजकुमार आणि जिल्हा उद्यो केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील डिजीटल कॉमर्स सर्व्हीसेस बाबत माहिती देतील.

00000

सुधारीत कालावधीत मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम

यादीत नाव नसणाऱ्या मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 06 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सुधारीत वेळापत्रक जाहिर केले आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार दि. 2 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 2  ते 16 ऑगस्ट 2024 दरम्यान दावे व हरकती स्विकारणे, दि. 27 ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदारांनी मतदारयादीत नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मतदार आणि नागरिकांनी दि. 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदार यादीची पाहणी करावी. मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी. मतदारयादीमध्ये नावे नसल्यास नजिकच्या मतदानकेंद्रावर नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून मतदार यादीत नाव समाविष्ट करावे. मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह दि. 2  ते 16 ऑगस्ट 2024 कालावधीत विहित नमुना-6 भरुन द्यावा लागणार आहे. मतदारयादीतील नावात चुकीची दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना 8 भरुन द्यावा लागणार आहे, तसेच  सदरची कार्यवाही ऑनलाईन करावयाची असल्यास वोटर हेल्पलाईन ॲप आणि voters.eci.gov.in या संकेतस्थळावर देखील मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करता येणार आहे.

            नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात अडचणी आल्यास त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरीकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून येत्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात 23 नवीन मतदान केंद्र, आता 2,288 मतदार केंद्र

बुलडाणा, दि. 06 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्ह्यात 23 नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रामुळे जिल्ह्यात आता 2 हजार 288 मतदान केंद्र असणार आहे. तसेच कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर असणार आहेत.

गत लोकसभा निवडणुकीला जिल्ह्यात 2 हजार 265 आणि 1 सहायकारी मतदान केंद्र असे एकूण 2 हजार 266 मतदान केंद्र होती. यात आता 23 नवीन मतदान केंद्राची वाढ होऊन 2 हजार 288 मतदान केंद्र असणार आहे.

जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदान केंद्रावर निश्चित मर्यादेपेक्षा जास्त मतदार संख्या असल्यास त्या मतदान केंद्रावरील मतदार त्याच इमारतीमध्ये वेगळ्या खोलीमध्ये मतदानकेंद्र स्थलांतरीत करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर समसमान मतदार असणे आवश्यक आहे. त्यानुसार मतदारांच्या सोयीसाठी मतदार संख्या निश्चित करून नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात 23 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्र नादुरूस्त, मोडकळीस आले आहेत अशा मतदान केंद्रांची पाहणी करून दूरूस्ती, तसेच नवीन ठिकाणी मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच निश्चित करण्यात आलेल्या मतदार मर्यादेपेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी आवश्यकतेनुसार विभागणी, विलीनीकरण करण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये बदल झाले आहेत, अशा मतदान केंद्रांच्या नावामध्ये बदल करण्यात आले आहेत.

सुधारीत, नवीन प्रस्तावाच्या अनुषंगाने विधानसभा आणि जिल्हास्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये उपस्थित सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी यांचेकडून सहमती घेवून सदरचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आले. यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

            नवीन, विलीनीकरण, स्थलांतरण आणि नावात बदल झालेल्या मतदान केंद्रांमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मलकापूर 305, बुलडाणा 337, चिखली 317, सिंदखेडराजा 340, मेहकर 350, खामगाव 322, जळगाव जामोद 317 अशी एकूण मतदान केंद्रांची संख्या राहणार आहे. बदल झाल्यानंतर अद्यावत विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदान केंद्रांची यादी सर्व मतदार नोंदणी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध राहणार आहे. या यादीची नागरीकांनी पडताळणी करून मतदानकेंद्राविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

सुधारीत वेळापत्रकानुसार प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध

बुलडाणा, दि. 06 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.

            पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्धीनंतर सर्व विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्तरावर प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 23 जानेवारी ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीत 38 हजार 404 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. तसेच 6 हजार 237 मतदारांची नावे वगळली असून 18 हजार 331 मतदाराच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. नोंदणी आणि वगळणीनंतर प्रारूप मतदार यादीमध्ये 10 लाख 84 हजार 935 पुरूष मतदार, 9 लाख 89 हजार 324 महिला मतदार, 33 तृतीयपंथी असे एकूण 20 लाख 74 हजार 292 मतदार आहेत. यात 14 अनिवासी भारतीय, 16 हजार 968 दिव्यांग मतदार, तर 18 ते 19 वयोगटातील एकूण 34 हजार 581 मतदार प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत.

अंतिम मतदारयाद्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे ceo.maharashtra.gov.in आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचे buldhana.nic.in संकेतस्थळ आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल संकेतस्थळावर electoralsearch.eci.gov.in वर जाऊन यादीत नाव आणि तपशील योग्य असल्याची खातरजमा करून मतदान केंद्र तपासावे. नागरीकांनी प्रारुप मतदारयादीची पाहणी करुन मतदारयादीत नाव असल्याची खात्री करावी. मतदार यादीमध्ये नाव नसल्यास मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह दि. 20 ऑगस्ट पर्यंत विहीत नमुना 6 भरुन द्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000




 शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी

फिरत्या पथकाचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 06 : कीटकनाशक हाताळणी आणि वापरताना घ्यावयाच्या काळजीबाबत फिरत्या रथाचे उद्धघाटन करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घरडा केमिकल्स लिमिटेड मार्फत शेतकऱ्यांनी कीटकनाशक हाताळणी आणि वापरताना घ्यावयाची काळजीबाबत फिरत्या रथाचे उद्धघाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी फिरत्या रथाला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी कृषि उपसंचालक संजीवनी कणखर, तंत्र अधिकारी अशोक सुरडकर, सुवर्णा आदक, मयुरी खलाने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण इंगळे, कंपनी प्रतिनिधी संभाजी पाटील उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment