आपत्ती व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी शनिवारी मॅरेथॉन
बुलडाणा, दि. 13 : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्ती व्यवस्थापनासंबंधी जनजागृती करण्यासाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे शनिवार, दि. 17 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. यात महिला आणि पुरूषांमधून पहिल्या तीन स्पर्धकांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.
मॅरेथॉन आयोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी तहसिलदार विठ्ठल कुमरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर आदी उपस्थित होते.
जयस्तंभ चौकातील गांधी भवनातून या मॅरेथॉनला सुरवात होणार असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि परत असा मॅरेथॉनचा मार्ग राहणार आहे. शनिवारी सकाळी 6 वाजता खेळाडूंची नोंदणी होणार असून त्यानंतर सकाळी 7 वाजता मॅरेथॉनला सुरवात होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवतील. या स्पर्धेत एनसीसी, एनएसएस, आपदा मित्र, होमगार्ड, स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी होतील. यात प्रथम 150 नोंदणी करणाऱ्यांना टी शर्ट देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रूग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक ठेवण्यात येणार आहे.
मॅरेथॉनमधून पूर, दरड कोसळणे, वीज कोसळणे, भूस्खलन, भूकंप, चक्री वादळे, थंडीची लाट, जंगलातील वणवे, आग, दुष्काळ आदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे. संपर्कासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर 8888538974 आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार 7020435954 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
अनाथ प्रमाणपत्रासाठी संपर्क करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 13 : जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत दोन्ही पालक नसलेल्या किंवा गमावलेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. या अनाथ प्रमाणपत्रासाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोविड-19 किंवा नैसर्गिक आणि अकस्मात दोन्ही पालकांचा मृत्यू झाला असल्यास बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. ज्या बालकांची दोन्ही पालक नैसर्गिक किंवा अकस्मात मृत्यू पावले असेल, अशा बालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक असलेल्या कागदपत्रासोबत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, बुलडाणा बसस्थानकामागे, जोशी नेत्रालयाजवळ, मुठ्ठे ले-आउट, बुलडाणा यांच्या संपर्क साधावा. तसेच सदर बालकांनी किंवा पालक आणि नातेवाईकांनी अनाथ प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची पूर्तता करून अनाथ प्रमाणपत्र प्राप्त करावे.
अनाथ प्रमाणपत्रासाठी बालकांचे आई-वडील, पालक मृत्यू झाले त्यावेळी बालकांचे वय 18 वर्षे पूर्ण नसावे, तसेच विनंती अर्ज, आई-वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्राची सत्यप्रत आणि झेरॉक्स, बालकाच्या शाळेच्या टीसी ची झेरॉक्स प्रत, प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या शिक्क्यासह बालकाच्या बोनाफाईट प्रमाणपत्राची सत्यप्रत व झेरॉक्स, चौथी, सातवीचा बालकाचा निर्गम उतारा, बालकाचा जन्माचा दाखला, बालकाच्या जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, बालकाचे आधार कार्ड, आई-वडिलांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पालकांचा कोविड-19मुळे मृत्यू झाला असल्यास हॉस्पिटलचे आवश्यक कागदपत्रे, बालकाचा पासपोर्ट फोटो जोडणे आवश्यक आहे.
00000
बुलडाणा डाक विभागाचा उत्कृष्ट कार्यासाठी गौरव
बुलडाणा, दि. 13 : डाक विभागामार्फत विविध योजनांसाठी आणि राबविण्यात आलेल्या मोहिमांसाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या हस्ते बुलडाणा डाक विभागाचा उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आला.
मुंबई येथे आयोजित सत्कार सोहळ्यात राज्यातील सर्व विभाग, जिल्हा प्रमुख, डाक निदेशक, क्षेत्रिय पोस्टमास्तर जनरल उपस्थित होते. बुलडाणा डाक विभागाने केलेल्या प्रयत्नांसाठी दोन पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यात बुलडाणा डाक विभागाला आर्थिक वर्ष 2023-24 साठी 90 हजार निव्वळ खात्यांचे उद्दिष्ट देण्यात आले. यात विभागाने एकूण 77 हजार 742 खाती जोडलीत. यात बुलडाणा नागपूर क्षेत्रांतर्गत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच दि. २९ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या ‘नया साल, नया जोश’ मोहिमेत बुलडाणा विभागाने 49 हजार 795 खाते जोडली, यात बुलडाणा विभाग राज्यात तिसरे स्थानी आहे.
बुलडाणा डाक विभागाने वर्षभरात आर्थिक समावेशन कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या प्रयत्नांसाठी विभागास मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बुलडाणा डाक विभागामार्फत डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी सन्मान चिन्ह स्विकारले.
00000
महात्मा फुले महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 13 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे बीज भांडवलाच्या विविध योजना राबविण्यात येते. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विविध बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री अभ्युदय अनुदान योजनेंतर्गत. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाकरीता अनुदान भौतिक 90 आणि आर्थिक 45 लाख, तसेच बीजभांडवल अंतर्गत भौतिक 90 व आर्थिक 45 लाख अनुदान व बीजभांडवल रक्कम 1 कोटी 80 लाख रुपये एवढे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेंतर्गत 50 हजार रूपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे. यात कमाल 25 हजार रूपये देण्यात येते. बीजभांडवल योजनेंतर्गत 5 लाख रूपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे.
पात्र लाभार्थ्यांनी आपले कर्ज मागणी अर्ज आवश्यक कागदपत्रासह महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलींद धांडे यांनी केले आहे.
00000
उत्कृष्ट कार्य खेळातील पुरस्कारप्राप्त खेळाडूंना विशेष गौरव पुरस्कार
बुलडाणा, दि. 13 : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कार्य खेळातील पुरस्कारप्राप्त खेळाडू माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना एकरकमी 10 हजार आणि 25 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात आणि इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार रुपये आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभागाकडून दिला जातो. तसेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या शैक्षणिक बोर्डातून पाच माजी सैनिक पाल्यांना 10 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार दिला जातो.
निकष पूर्ण करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह दि. 20 सप्टेंबर 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment