० ते १८ वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी होणार जिल्ह्यात आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम

 

० ते १८ वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी होणार

 

जिल्ह्यात आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम

 

बुलढाणा, दि. २८ (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन शनिवार, १ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता पुणे येथे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री ना.डॉ. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या मोहिमंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके व किशोरवयीन मुलामुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हास्तरीय कार्यक्रम पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकार विद्यालय, चिखली रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार. आजारी आढळलेल्या बालकांवर तात्काळ उपचार केले जातील. गरजू व आजारी बालकांना औषधोपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व समुपदेशनाच्या सुविधा पुरविण्यात येतील.

 

या तपासणीसाठी नियुक्त पथकामध्ये पुरुष व महिला अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य सेविका यांचा समावेश आहे. उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या बालकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, महापालिका रुग्णालये, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करारबद्ध रुग्णालये व आरबीएसके करारबद्ध रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे.

 

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

०००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या