विशेष लेख :मकाः बदलत्या वातावरणात पर्यायी पीक

 विशेष लेख :

                मकाः बदलत्या वातावरणात पर्यायी पीक

जगात तृणधान्य पिकाच्या उत्पादनामध्ये गहू व भात या पिकानंतर मक्याचा क्रमांक लागतो. मक्याच्या उत्पादन क्षमतेमुळे या पिकास "धान्याची राणी" म्हणुन ओळखले जाते. मका हे मानव आणि पशुंसाठी दर्जेदार खाद्य आहे. याव्यतिरिक्त विविध औद्योगिक विशेषतः इथेनॉलच्या निर्मितीत मोठया प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात मक्याची मागणी सतत वाढुन शेतक-यांना चांगले भाव मिळतील. वातावरणातील बदलावर उत्तम पर्याय आहे. तसेच रोजगार आणि निर्यातीची संधी उपलब्ध करुन देण्याची ताकद या पिकात आहे. आजकाल जनावरांच्या चा-यांसाठी मुरघास बनवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

मका हे उष्ण हवामानाला उत्तम प्रतिसाद देणारे पीक असले तरीही याची लागवड तिन्ही हंगामात करता येते. पाण्याचा योग्य निचरा होणारी, भारी ते मध्यम प्रतीची जमीन उपयुक्त असली तरीही कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. पाणी धरुन ठेवणारी किंवा चिबड जमिनीमध्ये या पिकाची लागवड करु नये. जमिनीची खोल १५ ते २० सेंमी नांगरणी करुन वखराच्या ३ ते ४ पाळया दयाव्यात आणि शेवटच्या पाळी पुर्वी शेतात एकरी ६ ते ८ गाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खत पसरुन घ्यावे. पेरणी करिता एकरी ६ ते ८ किलो बियाणे वापरावे. पेरणी पुर्वी कार्बोक्सीन ३७.५% ३ ग्रॅम अधिक थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणेस चोळावे, त्यावर अॅझोटोबॅक्टर, पी. एस.बी., के.एम.बी. व ट्रायकोडर्मा यांची जैविक बिज प्रक्रिया करावी.

ऊन्हाळी हंगामात जानेवारीच्या दुस-या पंधरवाडयात ६० सेंमी अंतराच्या तिफणीने पेरणी करुन विरळणी ने दोन झाडातील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे व बियाणे पेरणीची खोली ४ ते ५ सेंमी असावी त्यापेक्षा कमी किंवा जास्त असु नये. टोकन पध्दतीने लागवड केल्यास बियाण्याचे योग्य अंतर राखता येईल. एकरी झाडांची संख्या ३३ ते ४० हजार अपेक्षित आहे.

मका पिकाकरिता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (आय.एन.एम.) नत्र ६२ किलो, स्फुरद ४० किलो व पालाश १२ किलो प्रति एकर शिफारस केली आहे. पेरणीच्या वेळी १६ किलो नत्र, संपुर्ण स्फुरद व पालाश ची खत मात्रा देण्यात यावी. पेरणी नंतर ३० दिवसांनी १६ किलो नत्र, व ५० दिवसांनी ३० किलो नत्राची मात्रा मुळाशी उखरून देण्यात यावी.

तणाच्या नियंत्रणासाठी २ ते ३ डवरणी सोबत पीक २५ ते ३० दिवसाचे असतांना मेसोट्रीऑन २.२७% अधिक अँट्राझीन २२.७% ईसी या पूर्व मिश्रीत तणनाशकाचा गवत आणि रुंद पाणाचे तण व्यवस्थापनात उपयुक्त आहे.

मका पिकास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वाढ होते. पिकाच्या संवेदनशील पिक अवस्थेत म्हणजेच तुरा बाहेर पडतांना, फुलोरात असतांना, दुधाळ अवस्थेत आणि दाने भरण्याचे वेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा उत्पादनात लक्षणीय घट येते.

    मक्याचे पिक ९० ते १०० दिवसात पक्व होते. कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर काढणी करावी. धान्यात ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के होईपर्यंत चांगले वाळवावे म्हणजेच साठवणुक केल्यास नक्कीच नुकसान होणार नाही. मका पिकाचे सरासरी प्रति एकरी उत्पादन लवकर ग्रेप्मारे वाणाचे १६ ते २० क्विंटल व मध्यम ते उशिरा येणारे वाणाचे एकरी २४ ते ३० क्विंटल मिळु शकते.

                                                                                                                      लेखक : उमेश घाटगे ( विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर)

                                    

                                       0000


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या