Friday, 8 November 2024

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्राची वाढ; आता 340 मतदान केंद्र

 

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्राची वाढ; आता 340 मतदान केंद्र

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 8: विधानसभा निवडणूकीत मतदारांना मतदान करणे सोईचे व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघात मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार 24- सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात चार नवीन मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली असून आता सिंदखेड राजा मतदारसंघात 340 मतदान केंद्र झाले आहेत.

 

मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी ज्या मतदान केंद्रांवर मर्यादेपेक्षा जास्त मतदार आहेत  किंवा दोन गावातील मतदार एकाच मतदान केंद्रांना जोडण्यात आलेले होते, असे सर्व मतदान केंद्र मिळून जिल्ह्यात नव्याने 23 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. सिंदखेड राजा मतदार संघात चार नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.  यामध्ये सिंदखेड राजा शहरातील नगर परिषद प्राथमिक उर्दु शाळा, पंचायत समिती आवक जावक विभाग, जांभोरा व पांगरी उगले येथे मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 340 मतदान केंद्र झाले असून शहरी भागात 39 तर ग्रामिण भागात 301 मतदान केंद्र आहेत. नवीन मतदान केंद्राच्या निर्मितीमुळे कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहेत.

 

   लोकसभेला जिल्ह्यात 2 हजार 265 मतदान केंद्रे होती. यात 23 नवीन मतदान केंद्रांची वाढ होऊन 2 हजार 288 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र सुसूत्रीकरणांतर्गत मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे.

 

> मतदारसंघात चार नवीन मतदार केंद्राची वाढ

 

1.         मतदान केंद्र क्रमांक 158-अंभोरामध्ये जांभोरा या गावच्या मतदारांचा समावेश आहे. अंभोरा व जांभोरा या दोन गावांचे आमना नदीमुळे विभाजन झालेले आहे. त्यामुळे जांभोरा गावच्या लोकांना मतदान केंद्रावर येण्यास 8 ते 10 की.मी. अंतरावरून वळसा घालून यावे लागत असल्याने 159-जांभोरा येथे नविन मतदान केंद्र सुरु करण्यात आले आहे.

2.         सिंदखेड राजा तालुक्यातील मतदान केंद्र क्रमाक 228 व 233 हे एकाच ठिकाणी असुन त्‍या दोन्ही मतदान केंद्रावरील मतदार संख्‍या 1400 पेक्षा जास्‍त झाल्‍यामुळे मतदान केंद्र क्रमांक 228 मधील 360 व केंद्र क्रमांक 233 मधील 494 मतदार असे एकुण 854 चे नविन मतदान केंद्र 230 - सिंदखेड राजा नगर परिषद प्राथमिक उर्दु शाळा जुनी इमारत सिंदखेड राजा येथे सुरुवात करण्यात आले आहे.

3.         सिंदखेड राजा तालुक्यातील मतदान केंद्र क्र.235 व 236 हे एकाच ठिकाणी असुन त्‍या दोन्ही मतदान केद्रावरील मतदार संख्‍या 1400 पेक्षा जास्‍त झाल्‍यामुळे मतदान केंद्र क्रमांक 235 मधील 422 व केंद्र क्रमांक 236 मधील 605 मतदार असे एकुण 1027 चे नविन मतदान केंद्र 239 - सिंदखेड राजा पंचायत समिती आवक जावक विभाग येथे सुरु करण्यात आले आहे.

4.        पांगरी उगले येथे मतदारांची संख्‍या मर्यादेपेक्षा जास्‍त असल्‍यामुळे मतदान केंद्र क्रमांक 274-पांगरी उगले जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा रुम नं 2 येथे नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आले.

 

3 लक्ष 22 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 

 24- सिंदखेड रजा मतदारसंघात 3 लक्ष 22 हजार 995 मतदार असून त्यामध्ये 1 लक्ष 68 हजार 601 पुरुष तर 1 लक्ष 54 हजार 393 महिला व 1 तृतीयपंथी मतदार आहेत. 85पेक्षा जास्त वयोमान असलेले मतदार 6 हजार 138 असून 2 हजार 412 पुरुष तर 3 हजार 726 महिला मतदार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणारे 6 हजार 216 नवमतदार असून 4 हजार 2 पुरुष तर 2 हजार 124 महिला नवमतदार आहेत.

 

मतदान यादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी- जिल्हाधिकारी

 

भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार केंद्र जाणून घेण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी किंवा मतदान केंद्राची माहिती शोधण्याच्या बाबतीत काही मदत हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांक किंवा सिंदखेड राजा मतदारसंघासाठी हेल्प लाईन क्रमांक 18002336368 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment