Friday, 28 June 2024

DIO BULDANA NEWS 28.06.2024

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

बुलडाणा, दि. 28 : जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 1 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी 15 दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशा पाठवाव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

000000

पाणीटंचाईसाठी फर्दापूरात दोन विंधन विहिरी मंजूर

बुलडाणा, दि. 28 : पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून फर्दापूर, ता. मोताळा येथे दोन विंधन विहिरी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. फर्दापूर येथे 555 लोकसंख्या असून याठिकाणच्या पाणी टंचाई निवारणार्थ विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या  एका गावात दोन विंधन विहिरी घेण्यात येतील.

000000

अध्यापक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावर नियुक्ती

बुलडाणा, दि‍. 28 : बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी दि. 1 ते 2 जुलै 2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहाय्यक प्राध्यापक नियुक्ती साठी अध्यापन शास्त्रात गणित व विज्ञानसाठी पदसंख्या 1 असून शैक्षणिक अर्हता एमएससी, एमएड्, नेट, सेट, शिक्षणशास्त्रात पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत मुलाखत होणार आहे.

आरोग्य आणि शारिरीक शिक्षणामध्ये आरोग्य आणि शारिरीक शिक्षणासाठी पदसंख्या प्रत्येकी 1 असून, शैक्षणिक अर्हता एमपीएड, योग शिक्षण असणे गरजेचे असून नेट, सेट, शारिरीक शिक्षणात पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दि. 1 जुलै रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे. 

परिपेक्ष शिक्षणामध्ये परिपेक्ष शिक्षणासाठी पदसंख्या 4 असून, शैक्षणिक अर्हता एमए, एमएस्सी सामाजिक शास्त्र, एम. एड. शिक्षण असणे गरजेचे असून नेट, सेट, शिक्षण शास्त्रात पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दि. 1 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे. 

ग्रंथपाल शिक्षणासाठी पदसंख्या 1 असून, शैक्षणिक अर्हता बी. लिब असून एम. लिब असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दि. 2 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे. 

आरोग्य आणि शारिरीक शिक्षणासाठी पदसंख्या 1 असून, शैक्षणिक अर्हता एमपीएड योग शिक्षण असून शारीरिक शिक्षणामध्ये नेट, सेट असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दि. 2 जुलै रोजी दुपारी 2 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे. 

उपयोजित कलासाठी उपयोजित कला पदासाठी पद संख्या 1 असून शैक्षणिक अर्हता उपयोजित कलामधील पदव्युत्तर पदवी किंवा एमपीए, नेट, सेट, उपयोजित कलेमध्ये पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दि. 3 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे.

ललित कला शिक्षकासाठी द्रुक कला साठी पद संख्या 1 असून शैक्षणिक अर्हता एमएफए, दृक कलेमध्ये नेट, सेट, पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दि. 3 जुलै रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी संपुर्ण माहितीसह अर्ज आणि आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायाप्रतीसह वेळापत्रकानुसार स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. घड्याळी तासिका तत्वावरील नियुक्ती ही शैक्षणिक सत्र 2024-25 साठी राहणार आहे. शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतरच मानधन देय होईल. घड्याळी तासिका मानधन शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहील. अर्जाचा नमुना gcebedbuldan.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सिमा लिंगायत यांनी कळविले आहे.

00000

क्रीडा प्रबोधिनीमध्ये कौशल्य चाचणीद्वारे निवासी प्रवेश

बुलडाणा, दि‍. 28 : शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी प्रवेश देण्यात येते. यासाठी इच्छुकांनी दि. 5 जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण शिक्षणासाठी भोजन, निवास, अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत खेळाडूंना पुरविण्यात येतात. सन 2024-25 या वर्षी राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये 19 वर्षाखालील खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत अमरावती, नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद व पुणे येथे क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्र आहेत. या ठिकाणी नवीन प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शुटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स, जलतरण व फुटबॉल, ट्रायथलॉन,सायकलिंग या १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू, तसेच राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूंची तज्‍ज्ञ समितीद्वारे चाचणी घेऊन पात्र खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंचे वय १९ वर्षे आतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून तज्‍ज्ञ समितीद्वारे चाचणी घेऊन पात्र खेळाडूंची निवड केली जाणार आहे. सदर चाचणीमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारिरीकदृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार हा 19 वर्षाखालील, तसेच राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार खेळाडूकडे सहभागी झालेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रे, आधारकार्ड, तसेच नगरपालिका, ग्रामपंचायतीने दिलेले जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पात्र खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रे, आधारकार्ड तसेच नगरपालिका, ग्रामपंचायतीने दिलेले जन्म प्रमाणपत्र जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दि. ५ जुलै २०२४ पूर्वी सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्जात खेळाडूचा संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता, ई-मेल आयडी नमुद करणे आवश्यक आहे.

विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन दि. ८ आणि ९ जुलै २०२४ रोजी विभागीयस्तरावर होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा, अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

000000

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

बुलडाणा, दि‍. 28 : शासकीय अध्यापक महाविद्यालयाकरीता आर्थिक वर्ष 2024-2025 या कालावधीकरीता एक सफाई कामगार आणि एक रात्रपाळी पहारेकरी अशी 2 पदे कत्रांटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले आहे.

पद भरतीसाठी विहित आवेदनपत्र शासनमान्य कंत्राटदार, पंजीकृत बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्राकडून द्वि-लिफाफा पद्धतीने मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. महाविद्यालयाकडे प्रति शेड्युल 500 रूपयांचा भरणा करून दि. 1 ते 3 जुलै 2024 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळू शकतील. दि. 4 जुलै 2024 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहोरबंद निविदा स्विकारण्यात येतील. तसेच मोहोरबंद निविदा दि. 5 जुलै 2024 रोजी दुपारी 12  वाजता प्राचार्यांचे दालनात उघडण्यात येतील. त्यावेळेस संबंधित निविदाधारकांनी प्राचार्यांच्या दालनात दुपारी 12 वाजता उपस्थित राहावे, यासंबंधी अंतिम निर्णय प्राचार्यांचे राहणार आहे. सदर निविदा महाविद्यालयाचे संकेतस्थळ gcebedbuldan.org.in वर उपलब्ध आहे, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एस. लिगायत यांनी कळविले आहे.

000000

डाक विभागाच्या सुविधा केंद्रातून

पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 28 : डाक विभागातून सामायिक सुविधा केंद्रामार्फत एक रूपयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शुक्रवार, दि. २८ जून २०२४ ते दि. १५ जुलै २०२४ कालावधीमध्ये याचा लाभ घेता येणार आहे.

भारतीय डाक बुलडाणा विभागातील सर्व टपाल कार्यालयातून सामान्य नागरिकांना गाव पातळीवर सामायिक सुविधा केंद्रामार्फत प्रामुख्याने वीज बिल भरणा, पॅनकार्ड, शेतकरी बांधवांसाठी पिक विमा योजना, युवकांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली, असंघटीत कामगारांच्या नोंदणीसाठी ई-श्रम, आयुष्यमान भारत योजनेमार्फत डिजीटल आरोग्य पायाभूत सुविधा पुरवण्यात येतात. तसेच डाक विभागातून सामायिक सुविधा केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी एक रूपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाला भेट देऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

00000

अनुसूचित जाती, जमातीच्या मुलींनी

सायकलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 28 : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमातीच्या शाळकरी मुलींनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शाळकरी मुलींना लेडीज सायकल पुरविणे या योजनेसाठी सातवी ते बारावीपर्यंत शिकत असलेल्या मुलींकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची प्रत व अटी शर्ती zpbuldhana.maharashtra.gov.in तसेच तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे. आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन परिपूर्ण भरलेले अर्ज दि. 31 जुलै 2024 या कालावधीत संबधित तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयातच सादर करावे, असे आवाहन बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

00000

Thursday, 27 June 2024

DIO BULDANA NEWS 27.06.2024

 उत्पादकता वाढ, मूल्यसाखळी विकास योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : महाडीबीटी पोर्टलवर राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येणार आहे.

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन. नैनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. यासाठी दि. १२ ते ३० जून २०२४ पर्यंत अर्ज करावे लागणार आहे. मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी दि. १२ ते २३ जून २०२४ पर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १२ जून २०२४ पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर farmer login मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

00000

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त

जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम

बुलडाणा, दि. 27 : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम दि. २६ जून  ते दि. २ जुलै २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील २०२४-२५ मधील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दि. २६ जून ते २ जुलै २०२४ या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेचे ई-मेल आले आहेत, त्यांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटीची पुर्तता करुन योग्यरित्या जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे.

जिल्ह्यातील अकरावी आणि बारावी विज्ञान शाखा, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील सन २०२४-२५ मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

खामगाव येथील युवा शक्ती करिअर उत्साहात

बुलडाणा, दि. 27 : खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर कोल्हटकर स्मारक मंदिरात उत्साहात पार पडले.

 आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य एस. डी. गंगावणे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य पी. के. खुळे, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. धनंजय तळवळकर, प्राचार्य नंदा उदापूरकर, अशोक गायकी, श्री. बेलसरे यांच्या उपस्थित होते. शिल्पनिदेशक व्ही. टी. अंजनकर यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पनिदेशक एस. एच. बेलसरे यांनी आभार मानले.

00000

समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिन साजरा

बुलडाणा, दि. 27 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद, समाज कल्याण येथून रॅली, तसेच समता दिंडी काढण्यात आली. तसेच नशामुक्तीबाबत चित्र प्रदर्शन स्टॉल उभारण्यात आले. सदर रॅली आणि समता दिडींला समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी हिरवी झेंडी दाखविली. दिंडीची सुरुवात जिल्हा परिषद कार्यालयातून करण्यात आली. तसेच राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येंडोले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शाहू महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलनाने करण्यात आले. सुरुवातीला व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. डॉ. राठोड यांनी प्रस्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अस्मिता ठोंबरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व शेती कार्याचा उल्लेख केला. समाजाला तारण्यासाठी शाहू महाराज यांच्या विचारांची गरज समाजाला आहे. छत्रपती शाहू महाराजाचे शासन म्हणजे लोककल्याणकारी प्रशासक होते. त्याचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या घटनेच्या माध्यमातून समाजामध्ये रोवला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने जीवनाची दिशा ठरवावी, असे सांगितले.

शाहीर डी. आर. इंगळे आणि शाहीर गणेश कदम यांच्या कलासंचाने छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याच्या थोरवीची गीते सादर केली. यावेळी समाज कल्याण विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 तालुका समन्वयक सतिश बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी, नर्सिग महाविद्यालयाचे विद्यार्थी, समाज कार्य महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय निवासी शाळा आणि  शासकीय वसतिगृह गृहपाल व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

00000

Wednesday, 26 June 2024

DIO BULDANA NEWS 26.06.2024







 मिशन ग्रीन बुलडाणाचा शुभारंभ

बुलडाणा शहराला गतवैभव प्राप्त करून देणार

-आमदार संजय गायकवाड

बुलडाणा, दि. 26 : थंड हवेचे ठिकाण म्हणून बुलडाणा शहर प्रसिद्ध होते. मात्र गेल्या काळात इतरत्र जाणवणारा उन्हाळा शहरातही जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियानात शहरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात येत आहे. यासाठी मिशन ग्रीन बुलडाणा राबविण्यात येत आहे. या मिशनच्या माध्यमातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

मिशन ग्रीन बुलडाणाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. पेंटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे आदी उपस्थित होते.

श्री. गायकवाड म्हणाले, देशात चंदीगड, इंदौर यासारखी प्रगत शहरे आहेत. याठिकाणी नियोजनबद्ध विकास करताना झाडेही लावण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. बुलडाणा शहराचा विकास करताना शहर अतिक्रमण मुक्त करावे. त्यासोबतच विकासात्मक कामे करताना शहरातील हिरवळ वाढविण्यासाठी झाडांचे संवर्धन करावे. शहरातील 65 भूखंडांवर विविध प्रजातींची झाडे लागवण्यात येणार आहे. ही झाडे जगविण्यासाठी दोन वर्षे पाणी आणि संरक्षणाची काळजी घेतली जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, शहरातील झाडे लावण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. इतर ठिकाणी शहरात झाडे लागवड करण्यात येतात, त्याचप्रमाणे शहरात झाडांची लागवड व्हावी. शहरातील हिरवळ टिकून राहण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एक झाड लावून ते दत्तक घ्यावे. यावर्षी प्रशासनामार्फत पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आमदार श्री. गायकवाड यांनी झाडांविषयी माहिती दिली. तसेच वृक्ष लागवडीचे नियोजन सांगितले.

00000


जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन

बुलडाणा, दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, तहसिलदार संजिवनी मुपडे, माया माने, नायब तहसिलदार प्रमोद करे, नाझर गजानन मोतेकर उपस्थित होते.

00000




नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणारे आणि अद्याप मतदार नोंदणी केलेली नसलेल्या युवाना मतदार नोंदणीची संधी प्राप्त होणार आहे. यासाठी मतदारयादीत नसलेल्या नागरिकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, नायब तहसिलदार संजय बंगाळे आदी उपस्थित होते.

नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात voters.eci.gov.in आणि वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करून सादर करावा. ऑफलाईन स्वरूपात संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. यासाठी अर्ज आणि लिंक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे अथवा टोल फ्री क्रमांक 1950 वर मतदारांनी मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

तसेच नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या महिला, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. दि. 25 जून 2024 ते दि. 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बीएलओ घरी येणार असून याआधी अनावधनाने मतदारयादीतून नावाची वगळणी झाली असल्यास बीएलओ यांच्याकडे किंवा ऑनलाईन स्वरूपात नमुना 6 भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.

या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार मंगळवार, दि. 25 जून ते बुधवार, दि. 24 जुलै 2024 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदारयादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक  छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराकडून योग्य छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे, तसेच विभाग, भाग यांची नव्याने रचना, मतदानकेंद्राच्या सीमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे.

पुनरिक्षण कार्यक्रमात गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे, गुरूवार, दि. 25 जुलै 2024 ते शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2024 दरम्यान दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहणार आहे. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार रोजी विशेष मोहिमांचा कालावधी राहणार आहे. सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 25 जुलै 2024 रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त दावे आणि हरकती स्विकारून निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदार यादीत नाव तपासावे व नाव नसल्यास तात्काळ त्या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांच्या सोबत संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

अनुसूचित जातीच्या मुला- मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

बुलडाणा, दि. 26 : अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2023-24 या वर्षीसाठीही राबविण्यात येणार आहे. यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 12 जुलै 2024 आहे. पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षि शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती सुरु केली आहे. यात प्रतिवर्षी 75 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. तसेच अन्य सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यासाठीही शासनाच्या विविध विभागांकडून परदेश शिष्यवृत्ती योजना राबविली जाते.

या योजनेबाबत maharashtra.gov.in संकेतस्थळावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

बुलडाणा, दि. 26 : गेल्या वर्षी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना ‘राईट टू गीव्ह अप’चा टॅप उपलब्ध करून देण्यात आला होता. शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांकडून हा टॅब दाबल्या गेला. परिणामी विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागले. अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज रिव्हर्ट बॅक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत सन 2023-24 या वर्षाकरीता महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे सुरु आहे. अर्ज स्वीकृती मॉड्युलमध्ये महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये राईट टू गीव्ह अपचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला होता. शिष्यवृत्तीचा लाभ कायमस्वरुपी थांबविण्याची किंवा सोडून देण्याची तुमची इच्छा असली तरच राईट टू गिव्ह अप हे बटन दाबावे, असा त्यावर उल्लेख आहे. सदर सुविधा प्रणालीवर नव्याने प्रथमत:च उपलब्ध करुन दिलेली असल्याने सदर टॅब अनेक विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञेतून किंवा नजर चुकुन क्लिक झाला होता. पर्यायाने असे विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्कापासून वंचित राहत होते.

याबाबत झालेल्या एकत्रित मागणीचा विचार करून माहिती व तंत्रज्ञान विभागाने राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अनावधानाने किंवा नजरचुकीने राईट टू गीव्ह अपचा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्द झालेले असतील, अशा विद्यार्थ्यांना त्याचा अर्ज रिव्हर्ट बॅक करण्याची सुविधा रिव्हर्ट राईट टू गिव्ह अप सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दि. 30 जून 2024 पर्यंत याबाबत अंतिम कार्यवाही करावी लागणार आहे.

याबाबत विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीनमधून आपले अर्ज रिव्हर्ट बॅक करुन घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित मुदतीत विद्यार्थ्याच्या लॉगीनमधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी उपरोक्त पर्यायाचा अवलंब करुन त्यांचे शिष्यवृत्ती अर्ज विहित मुदतीत रिव्हर्ट बॅक करुन घ्यावे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करावे. याबाबत अडचण असल्यास समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज घेण्यास सुरवात

बुलडाणा, दि. 26 : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य व तेलताड योजनेमध्ये फ्लेक्सी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच घटकासाठी अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2024-25 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके व गळीतधान्यांतर्गत फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच या बाबींसाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांचाकडून तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात आले आहेत. गोदाम बांधकाम व बीज प्रक्रिया संचाचा लाभ नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ असणाऱ्यांना आहे. त्यासाठी दि. 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. जिल्ह्यात गोदाम बांधकामासाठी चार आणि बीज प्रक्रिया संचासाठी एक लक्षांक प्राप्त आहे. सदर लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याची सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

गोदाम बांधकामासाठी जिल्ह्यांमध्ये या योजनेंतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० लाख रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्यानुसार अनुदान देण्यात येणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहील. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर व बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान देण्यात येणार आहे.

बीज प्रक्रिया संचासाठी योजनेंतर्गत उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रक्रिया संच उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रूपये यापैकी कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदाराने बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर आणि बीज प्रक्रिया संच उभारणी पूर्ण झाल्यावर अनुदान देण्यात येणार आहे.

00000

Tuesday, 25 June 2024

DIO BULDANA NEWS 25.06.2024

 




शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजामध्येच राहणार

*भारतीय पुरातत्व विभागाने केले स्पष्ट

बुलडाणा, दि. 25 : सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराच्या उत्खननात शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशायी विष्णूची मूर्ती सिंदखेडराजा येथेच राहणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे पुरातत्वशास्त्रज्ञ अरुण मलिक यांनी दिली.

भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे. मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोलीवर भव्य शेषशायी विष्णूची मूर्ती आढळून आली आहे. ही मूर्ती साधारणतः अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याचा अंदाज आहे. ही मूर्ती दीड मीटर बाय सव्वा मीटर आकाराच्या दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे. समुद्रमंथन आणि दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम या मूर्तीमध्ये करण्यात आलेले आहे. ही मूर्ती क्लोरियट दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे. साधारणतः हा दगड दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून येतो. या दगडावर बारीक कोरीव काम करणे शक्य आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वसाधारण मानकानुसार उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येतात. भारतीय पुरातत्व विभागाच्या 49 कार्य ठिकाणी याच पद्धतीने पुरातन वस्तू आणि अवशेषांचे जतन करण्यात आले आहे. याच नियमानुसार सिंदखेडराजा येथे आढळलेली शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजा येथेच जतन केल्या जाईल. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाच्या परिसरातच ही मूर्ती सुव्यवस्थितरित्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. ही मूर्ती याच परिसरात ठेवण्यासाठी आधी व्यवस्था करण्यात येईल. त्यानंतरच ही मूर्ती हलवण्यात येईल. सध्या ही मूर्ती उत्खनन करून सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शिव मंदिरामध्ये ही मूर्ती दबल्या गेल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक या मूर्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

ही मूर्ती कोणत्या शैलीतील आहे, याबाबत अधिक माहिती होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. येत्या एका आठवड्यामध्ये या मूर्तीबाबत संशोधन होऊन अधिकची माहिती प्राप्त होईल. सध्यास्थितीमध्ये मूर्तीचे काळजीपूर्वक हाताळणे आणि योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. मलिक यांनी दिली.

०००००

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना

बुलडाणा, दि. 25 : जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये बारावीनंतरच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरावरील तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येते.

या योजनेच्या लाभासाठी मुलभूत पात्रता ही विद्यार्थ्यी धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारण राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:चे आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

शैक्षणिक निकषात इयत्ता बारावीमध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक. दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा मिळणार नाही. बारावीनंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यास अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

तसेच एका विद्यार्थ्यास जास्तीस जास्त 5 वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी व्यवसाय करत नसावा. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांने विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या महाडीबीटी अर्ज केला आहे व त्याचा अर्ज मंजूर झाला आहे, त्यांना अनुज्ञेय राहील. वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.

संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थेने अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. त्याच प्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहिल. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.

अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी शनिवारपर्यंत नोंदणी आवश्यक

बुलडाणा, दि. 25 : जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी शनिवार, दि. 29 जून 2024 पर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धांचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्यानुसार क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता सबज्युनिअर 15 वर्षाआतील मुले क्रीडा स्पर्धा मुले वयोगट दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली दि. 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. 29 जुन, 2024 पर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूकडे जन्मचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट फोटो असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन हे 15 वर्षाआतील मुले सबज्‍युनिअर दि. 9 जुलै 2024, तसेच 17 वर्षाआतील मुले ज्युनिअर दि. 8 जुलै 2024 आणि 17 वर्षाआतील मुली ज्युनिअर दि. 9 जुलै 2024 रोजी करण्यात येणार आहे. प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपूर्ण नाव, जन्म तारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिष्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने पाठवावे लागणार आहे. 15 वर्षाआतील खेळाडू करिता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी, तसेच subrotocup.in संकेतस्थळावर नोंदणी करुन सहभागी व्हावे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

00000

खामगाव आयटीआयमध्ये शुक्रवारी महिला रोजगार मेळावा

बुलडाणा, दि‍. 25 : खामगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. 28 जून रोजी करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत मॉडेल करियर सेंटर बुलडाणा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन खामगाव आयटीआयमध्ये करण्यात आले आहे.

सदर ‍महिला रोजगार मेळाव्यात हिंदुस्थान युनीलीव्हर लिमिटेड, खामगाव या उद्योजकांनी त्यांच्याकडील आयटीआय इलेक्ट्रिशियन, इंस्ट्रुमेंटेशन, ‍फिटर या पदांसाठी फक्त महिलांसाठी 15पेक्षा अधिक पदे अधिसुचित केली आहेत. तसेच एलआयसी इंडियाच्या विमा अभिकर्ता पदासाठी देखील 20 पदे  अधिसूचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे गरजू व रोजगार इच्छुक ‍महिला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुद्धा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली असलेल्या अथवा नसलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर महिला उमेदवारांनी दि. 28 जून 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जलंब रोड, खामगाव, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे आणि रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करुन घ्यावी.

पात्र, गरजू व नौकरी इच्छुक महिला उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीताही अर्ज करु शकतात. तरी इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. याचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा 07262-242342 दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

00000


Monday, 24 June 2024

DIO BULDANA NEWS 24.06.2024

 विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

मतदारांनी मतदान यादीत नाव असल्याची खात्री करावी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याचे घोषित केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 25 जुलै 2024 रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त दावे आणि हरकती स्विकारून निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार मंगळवार, दि. 25 जून ते बुधवार, दि. 24 जुलै 2024 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदारयादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक  छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराकडून योग्य छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे, तसेच विभाग, भाग यांची नव्याने रचना, मतदानकेंद्राच्या सीमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे.

पुनरिक्षण कार्यक्रमात गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे, गुरूवार, दि. 25 जुलै 2024 ते शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2024 दरम्यान दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहणार आहे. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार रोजी विशेष मोहिमांचा कालावधी राहणार आहे. सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणारे आणि अद्याप मतदार नोंदणी केलेली नसलेल्या युवाना मतदार नोदणीची संधी प्राप्त होणार आहे. त्यानुसार नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात voters.eci.gov.in आणि वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करून सादर करू शकतात. ऑफलाईन स्वरूपात संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. सदर अर्ज आणि लिंक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दि. २३ जानेवारी २०२४ आणि दि. 4 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर electoralsearch.eci.gov.in जाऊन यादीतील आपले नाव तपासावे. सर्व तपशील योग्य असल्याची खात्री करावी. आपल्या मतदारयादीतील तपशिलामध्ये दुरूस्ती असल्यास कार्यक्रमानुसार नमुद कालावधीत संपूर्ण कार्यवाही करावी.

तसेच नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या महिला, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. दि. 25 जून 2024 ते दि. 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बीएलओ घरी येणार असून याआधी अनावधनाने मतदारयादीतून नावाची वगळणी झाली असल्यास बीएलओ यांच्याकडे किंवा ऑनलाईन स्वरूपात नमुना 6 भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.

नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. उपरोक्त कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांच्या सोबत संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000




जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त चर्चासत्र

बुलडाणा, दि. 24 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा विविध एकविध खेळ संघटनेतर्फे रविवारी, दि. 23 जून 2024 रोजी बुलडाणा तालुका क्रीडा संकुलात सायंकाळी 5 वाजता ऑलिम्पिक दिनानिमित्त चर्चासत्र पार पडले. यावेळी प्रा. डॉ. मनोज व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत इलग उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी जागतिक ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून 23 जून रोजी ‘ऑलिम्पिक डे’ साजरा करण्यात येतो. त्यानुसार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सन 1952पासून ऑलिम्पिक डे आणि ऑलिम्पिक सप्ताह साजरा करीत असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. व्यवहारे यांनी, जगभरातील खेळाडूना सर्वोत्कृष्ट बनविण्याच्या हेतूने प्रोत्साहन देणे आणि प्रवृत्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात येतो. ऑलिम्पिक खेळाविषयी जनजागृती करण्याचे आणि क्रीडा प्रचार व प्रसार करुन, तळागाळातील विद्यार्थी व खेळाडूंना ऑलिम्पिक खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे सुध्दा आवाहन त्‍यांनी केले. श्री. इलग यांनी, खेळाडूंना खेळाविषयी आवड निर्माण होईल व आपला जिल्हा, राज्य, देश खेळामध्ये निश्चित अव्वल स्थानावर राहील आणि अनेक शाळांमधून स्व. खाशाबा जाधव यांच्या सारखे ऑलिम्पिक पदक विजेते महाराष्ट्रातून घडण्यास प्रोत्साहन मिळेल असे सांगितले.

जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून श्री. महानकर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरात 27 आंबा व इतर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी डिगांबर पाटील, डॉ. सतीश मुंढे, प्रदीप शिंगणे, यमुना गडदे, नितीन आघाव, विनोद गायकवाड उपस्थित होते.

00000



आरसेटीमध्ये योग दिवस साजरा

बुलडाणा, दि. 24 : सेंट्रल बँक सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार, दि. 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

योग दिनानिमित्त आरोग्याचे महत्व आणि काळजी कशी ठेवावी याबाबत संस्थेचे संचालक श्री. पोटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आरसेटी येथे सुरु असलेल्या ब्युटीपार्लर प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.

00000

खादी ग्रामोद्योगच्या नॉर्मल, सीबीसी योजनेत दंड व्याज माफी

बुलडाणा, दि. 24 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नॉर्मल व सीबीसी योजनेंतर्गत दंडव्याज माफी देण्यात आली आहे.

मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोर्टीयम बँक फायनान्स या दोन्ही योजनांसाठी मंडळाने दंडव्याज माफी जाहिर केली आहे. या योजनेतील थकीत कर्जदार आहेत, त्यांनी एकरकमी भरणा केल्यास दंड व्याज माफी संबंधितांना लागू होणार आहे. या दंडव्याज माफी योजनेचा कर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

0000

आदिवासी मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि. 24 : आदिवासी विकास विभागाच्या बुलडाणा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकरावी व पुढील शिक्षणाकरिता प्रथम वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थिंनींना ऑनलाईन अर्ज swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावे लागणार आहे. या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून हार्डकॉपीसह विहीत शैक्षणिक कागदपत्रे आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, राऊत मंगल कार्यालय, सर्क्युलर रोड, जिजामाता महाविद्यालयाजवळ, बुलडाणा येथील वसतीगृह कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावेत. वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींना निवासासोबत आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थिनींच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट डीबीटी द्वारे निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल भत्ता व अभ्यासक्रमानुसार इतर शैक्षणिक भत्ते रक्कम देण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता जातीचे वैधता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, बुलडाणा शहरातील प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, फिटनेस मेडिकल सर्टीफीकेट, सन 2023-24चा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेचे आधारसंलग्न बँक खाते पासबुक किंवा पोस्ट बँक पासबुकची झेरॉक्स. रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी अचूकपणे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.

विद्यार्थिनींनी अर्जामध्ये स्वतःचा किंवा पालकांचा मोबाईल नंबर नोंद करावा. हा मोबाईल नंबर बँक खात्यासोबत, तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वतःचे नाव नोंदणी करताना ते आधार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झाला नसल्याची खात्री करावी. विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्जामध्ये बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर बँक खाते सुरू असल्याची प्रत्यक्ष बँकेत जाऊन खात्री करण्यात यावी.

वसतिगृह प्रवेशाकरीता अधिक माहितीसाठी वसतिगृह कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

000000

 






जिल्हा रूग्णालयात जागतिक रक्तदान दिवस साजरा

बुलडाणा, दि. 24 : जिल्हा रूग्णालयातील रक्त केंद्र येथे जागतिक रक्तदान दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने स्वच्छेने रक्तदान करणाऱ्यांविषयी कृतज्ञता आणि त्यांच्‍या कार्याची दखल घेण्यात आली.

या वर्षीच्या जागतिक आरोग्य संस्थेचे घोषवाक्य ‘२० वर्षे दानाचा उत्सव साजरा करत आहोत, धन्यवाद रक्तदात्यानो’ हे आहे. जागतिक रक्तदान दिन साजरा करण्याचा उद्देश राष्ट्रीय रक्त कार्यक्रमाची उपलब्धी, राष्ट्रीय रक्त कार्यक्रमात असणारी आव्हाने याची नागरिकांना माहिती व्हावी, स्वैच्छिक नि:शुल्क आणि निरंतर असणारी रक्ताची गरज पूर्ण करून सार्वत्रिक सुरक्षित रक्त संक्रमण उपलब्ध करणे, सर्वसामान्य जनता आणि तरुणांनी निरंतर रक्तदान करावे यासाठी पोषक वातावरण निर्मितीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येते.

रक्तदान दिनानिमित्त शहरातून शासकीय नर्सिग महावि‌द्यालयाच्या वि‌द्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून रक्तदानाविषयी माहिती दिली. तसेच रक्तदात्यांची नोंदणी करून रक्त संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच रक्त संबंधित प्रतिज्ञा वाचन करण्यात आली. रक्त संकलन, रक्त संक्रमण आणि रक्त विघटन याविषयी माहिती प्राप्त व्हावी आणि रक्ताच्या उपलब्धतेची माहिती व्हावी, यासाठी डिजिटल उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्राची तायडे यांच्या हस्ते रक्त केंद्राच्या यूट्यूब चॅनलचे अनावरण करण्यात येणार आहे. महिनाभरातील उपक्रमाद्वारे रक्तगट तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे.

सदर उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. उपक्रमांसाठी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्राची तायडे, टेक्निकल सुपरवायझर विनोद झगरे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी गौरव कुलकर्णी, विष्णू मुंढे, रक्तपेढी तंत्रज्ज्ञ आकाश जाधव, पूजा बनकर, अनिल घोडेस्वार हे पुढाकार घेत आहेत.

जागतिक रक्तदाता दिवसानिमित संपूर्ण जून महिनाभ विविध कार्यक्रम राबवले जात आहेत, यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. प्राची तायडे यांनी केले आहे.

000000