अमृत योजनेच्या लाभार्थ्यांना उद्योजकता वाढीसाठी मिळणार प्रशिक्षण विविध प्रशिक्षण योजनांसाठी अमृत व एमसीईडी यांच्यात सामांज्यस्य करार

 

वृत्त क्रमांक : 906                                             दिनांक : 10.12.2024

 

अमृत योजनेच्या लाभार्थ्यांना उद्योजकता वाढीसाठी मिळणार प्रशिक्षण

विविध प्रशिक्षण योजनांसाठी अमृत व एमसीईडी यांच्यात सामांज्यस्य करार

 

बुलढाणा, दि. 10 (जिमाका) :  महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना, अमृत-आयात निर्यात प्रशिक्षण योजना आणि अमृत बेकरी प्रशिक्षण या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

याप्रसंगी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक यशवंते यांनी या सामंज्यस्य करारावर स्वाक्षरी केली.

उद्योग क्षेत्राची कमी माहिती आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकजण उद्योजकतेकडे वळण्यात मागे पडतात. अमृत लक्षीत गटातील युवक, युवतींमध्ये उद्योजकेतेचे प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवून अमृत संस्थेने हे महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केले आहे. 

अमृत संस्थेच्या सोलार पी.व्ही. इंस्टॉलेशन, आयात-निर्यात आणि अमृत बेकरी प्रशिक्षण योजना या तिन्ही निवासी प्रशिक्षण योजनांचा कालावधी 18 दिवसांचा आहे. यात 80 टक्के तांत्रिक प्रशिक्षण व 20 टक्के उद्योजकता विकास यावर भर देण्यात येईल. आयात-निर्यात प्रशिक्षण यामध्ये आयात निर्यात प्रक्रिया, परकीय व्यापार धोरण, डीजीएफटी, अपेडा याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

सूर्यमित्र प्रशिक्षण, अमृत-बेकरी प्रशिक्षण योजनेत फक्त तांत्रिक ज्ञानच मिळणार नसून उद्योग उभारणीसाठी मदत दिली जाईल. अमृत संस्थेच्या तिन्हीही योजनांची वैशिष्ट्ये म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रकल्प अहवाल, कर्ज प्रस्ताव, उद्योग नोंदणी, कच्चा माल खरेदी याबाबत अमृत संस्था मार्गदर्शन करणार आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून दोन वर्षांपर्यंत लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन उद्योग उभारणीसाठी आवश्यक ते सहकार्य करणार आहे. प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या शासकीय योजनांच्या सहाय्याने उद्योगासाठी भांडवल उभे करता येणार असल्याने अमृत लक्ष्ज्ञित गटाच्या उन्नतीसाठी या योजना मैलाचा वाटा ठरणार आहेत. पात्र लाभर्थ्यांचा प्रशिक्षणाचा खर्च व प्रशिक्षण कालावधीतील निवास, भोजन व्यवस्था अमृत संस्थेमार्फत केली जाणार असल्याने अधिकाधिक युवक-युवती आपले उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी अमृत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

अमृत संस्थेच्या योजना महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील खुल्या प्रवर्गासाठी तयार करण्यात आल्या आहेत. अमृतच्या लक्षीत गटातील युवक, युवती आणि इतर उमेदवारांना, प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. अमृत संस्थेच्या योजनेचा लाभ घेत आपल्या उद्योजकतेला नवी ओळख देण्यासाठी इच्छुकांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या