रब्बी हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन

 

•         शेतकऱ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

         राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य स्पर्धा 

बुलडाणा, दि.29 (जिमाका) : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांचा समावेश असून, रब्बी हंगाम सन २०२३ स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत शेतकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये प्रयोगशील शेतकरी विविध प्रयोग करून उत्पादकता वाढवत आहेत. अशा शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

 

ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम दिनांक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी 300 व आदिवासींसाठी 150 रुपये राहील. स्पर्धेत भाग घेण्याचसाठी  शेतकऱ्याकडे स्वरतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसणारा असावा. शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागा होता येईल. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याची स्वतःच्या शेतावर किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग पीक लागवड आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आणि बँक खाते चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

 

तालुकास्तरीय पहिले 5 हजार रुपये, द्वितीय तीन आणि तृतीय दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले असून, जिल्हास्तरीय प्रथम 10, द्वितीय 7 आणि तिसरे पाच हजार रुपये तर राज्य पातळीवर प्रथम 50, द्वितीय 40 आणि तृतीय बक्षीस हे 30 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या