विकेल ते पिकेल अभियानातून शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होईल
- किसन मुळे
- जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे जिल्हाधिकारी यांच्याहस्ते उद्घाटन
- कृषि महोत्सवात अन्नधान्य प्रदर्शनी व विक्री
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असते. वाढत्या उत्पादकतेतून शेतमालाचा दर्जा चांगला ठेवत शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होणे काळाची गरज आहे. ग्राहकाभिमुख विचार करीत जे विकेल ते पिकविले पाहिजे. राज्य शासन यासाठी विकेल ते पिकेल अभियान राबवित आहे. या अभियानातून शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होत आहे, असे प्रतीपादन अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी आज केले.
स्थानिक जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय एकदिवसीय कृषि महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन फित कापून जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते करण्यात आले. या उद्घाटनीय कार्यक्रमाचे आयोजन 28 मार्च रोजी करण्यात आले. त्यावेळी विभागीय कृषि सहसंचालक श्री. मुळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, बुलडाणा कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी जायभाये, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधन अभियंता डॉ. प्रमोद बकाने, कृषि विकास अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे, कृषी उपसंचालक श्री. बेतीवार, उपविभागीय कृषि अधिकारी सर्वश्री संतोष डाबरे, श्री. पटेल, श्री. मिसाळ, डॉ. पीडीकेव्ही समिती सदस्य विनायक सरनाईक, कृषि विज्ञान केंद्र जळगांव जामोदचे प्रमुख विकास जाधव, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कोटे आदी उपस्थित होते. उद्घाटनांनतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक स्टॉल ला भेट देत पाहणी केली.
शेतमालाच्या जास्तीत जास्त विक्रीसाठी ग्राहकाभिमुख विपणन व्यवस्था उभारण्याचे आवाहन करीत विभागीय कृषि सहसंचालक श्री. मुळे म्हणाले, शेतमालाचा दर्जा चांगला ठेवण्यात यावा. शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्न करावे. शेतमाल जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी शेतमालाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या स्मार्ट उपक्रमात शेतकरी उत्पादक कंपनीला 60 टक्के अनुदान देण्यात येते. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक म्हणाले, कृषि महोत्सवातून विचारांची देवाण – घेवाण होते. तसेच शेतीतील नवनवीन प्रयोग, उपक्रम व तंत्रज्ञानाचीही देवाण घेवाण होते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे अशाप्रकारचे आयोजन करता आले नाही. आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे कृषि क्षेत्रातील ज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नांद्राकोळी गावचे शेतकरी तथा माजी सरपंच संजय काळवाघे यांनी पोकरा योजनेचे लाभ सांगितले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्याहस्ते कृषि विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पॉकेट डायरी व हस्तपत्रकाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर मागील काळात राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त व पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बाळकृष्ण वासुदेव पाटील कंडारी ता. नांदुरा, विठोबा दंदाळे खल्याळगव्हाण ता. दे.राजा, प्रल्हाद संपत गवते मंगरूळ ता. चिखली, सौ. अनिता रामसिंग पवार, मलगी ता. चिखली, संजय ज्ञानेश्वर चिबळे, भगवान आश्रुजी काकडे टिटवी ता. लोणार, विमलताई विजयराव टापरे, वच्छला नारायण कोकाटे, सौ. वसुधा विजय चांगडे, श्रीकांत पवार पाडळी, विजय भुतेकर सवणा ता. चिखली, जयश्री संजय पाखरे रोहीणखेड ता. मोताळा, महेश उन्हाळे तांदुळवाडी ता. मलकापूर, रूपेश थोरात धानोरा ता. नांदुरा, अनिल मेटांगे येऊलखेड ता. शेगांव, ताराबाई गजानन करळे मडाखेड ता. जळगांव जामोद, मोहन आगरकर बोडखा ता. संग्रामपूर, खासदार प्रतापराव गणपतराव जाधव मादनी ता. मेहकर, प्रकाश विठोबा नरवाडे बागुलखेड ता. लोणार, प्रदीप जायभाये रूमणा ता. सिं.राजा, विकास चेके सरंबा ता. दे.राजा, अमद घट्टे सायखेड ता. संग्रामपूर, रामेश्वर रिंढे मेहकर आदींचा समावेश होता. संचलन उमेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन उपसंचालक श्री. बेतीवार यांनी केले. कार्यक्रमाला शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, शेतकरी गट, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे दिनांक 29 मार्च 2022 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 29 मार्च रोजी दु. 2 वाजता समृद्धी महामार्ग नजिक फर्दापूर ता. मेहकर येथील हेलिपॅडवर आगमन व मोटारीने मेहकरकडे प्रयाण, दु 2.30 वा आकाशवाणी टॉवर, रामनगर, मेहकर येथे आगमन, चि. अभिषेक व चि. सौ. का डॉ. नयन यांचे शुभ विवाहास उपस्थिती, दु 3 वाजता मेहकर येथून फर्दापूरकडे मोटारीने प्रयाण, दु. 3.30 वा फर्दापूर येथे आगमन व हेलिपॅडवरून खाजगी हेलिकॉप्टरने ठाणेकडे प्रयाण करतील
No comments:
Post a Comment