जलदौडमध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : जिल्ह्यात 16 ते 22 मार्च 2022 या कालावधीत "जलजागृती सप्ताह"चे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमीत्ताने जिजामाता प्रेक्षागार येथे 20 मार्च रोजी आयोजित वॉटर रन (जलदौड) स्पर्धेत लहान व मोठ्या गटात विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते देण्यात 20 मार्च रोजी जिजामाता प्रेक्षागार येथे देण्यात आले.
या स्पर्धेत लहान गट मुलांमध्ये 18 वर्षापर्यंत प्रथम क्रमांक संकेत इंगळे, द्वितीय क्रमांक गजानन नागवे व तृतीय क्रमांक अर्जुन मेवनकर यांनी पटकाविला. तसेच लहान गटात मुलींमध्ये प्रथम क्रमांक सिद्धी डिडोळकर, द्वितीय क्रमांक गौरी राठोड व तृतीय क्रमांक ईशा घोडगे हिने पटकाविला. या गटात उत्तेजनार्थ बक्षीस युवराज दिपक बाहेकरला देण्यात आले. तसेच मोठ्या गटात पुरूषांमध्ये श्रावण जाधव यांनी प्रथम क्रमांक, योगेश राजुगाडे यांनी द्वितीय क्रमांक व आदित्य जाधवने तृतीय क्रमांक पटकाविला. तर महिलांमध्ये प्रथम क्रमांक समिक्षा चव्हाण, द्वितीय क्रमांक कांचन बढे व तृतीय क्रमांक पुजा सावळेने पटकाविला. तसेच या गटात लहान मुलींमध्ये तनिष माधव देशमुख हिला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
*********
जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे 28 मार्च रोजी आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : कृषि विभागाच्यावतीने 28 मार्च 2022 रोजी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन जिजामाता महाविद्यालय क्रीडांगण, मोठी देवी मंदिराच्या मागे, बुलडाणा या ठिकाणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री व्हावी हा उद्देश या प्रदर्शनीचा असून या महोत्सवात शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, विज्ञान, योजना, मार्केटिंग इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच धान्य महोत्सवात आपण विविध प्रकारचे धान्य थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकणार आहात. यामध्ये सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्य याचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे. ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असून आपण सर्वांनी प्रदर्शनीस आवश्यक भेट देऊन शेतकऱ्यांकडील उत्पादीत सेंद्रीय माल खरेदी करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
*********
नगर परिषदेच्या डिजीटल सेवा प्रणालीचा शुभारंभ
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : बुलडाणा नगर परिषद डिजिटल सेवा प्रणालीचा शुभारंभ आज दिनांक 21 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उत्पादन शुल्क अधिक्षक भाग्यश्री जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, ॲक्सीस बँकेचे आकाश जैन, कुणाल संजय गायकवाड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी एकनाथ गोरे, मो.सज्जाद, मुन्नाजी बेंडवाल, उदय देशपांडे तसेच सर्व नगरपरिषद कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.
*********
पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन
• उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे
• 25 मार्चपर्यंत चालणार मेळावे
बुलडाणा,(जिमाका)दि. 21 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 21 ते 25 मार्च 2022 पर्यंत करण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भरावे. या ऑनलाईन मेळाव्यात 100 पेक्षा जास्त पदांसाठी नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, आय. टी. आय. पास, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करावा. तसेच सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करण्याची संधीचा उपयोग करावा.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रां. यो. बारस्कर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment