Thursday, 17 March 2022

जलजागृतीसाठी सरसावला जलसंपदा विभाग




 जलजागृतीसाठी सरसावला जलसंपदा विभाग

  • विद्यार्थ्यांना जल संवर्धनाची शपथ, विविध ठिकाणी जलजागृती

बुलडाणा,(जिमाका) दि.17: राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्याअंतर्गत 16 मार्च ते 22 मार्च या दरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताह अधिक्षक अभियंता सु.व.चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. विविध माध्यमांतून जलजागृती करण्यासाठी जलसंपदा विभाग सरसावला असून शाळां-शाळांमधून विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाची शपथ, सार्वजनिक ठिकाणी पत्रकांमधून जलजागृती, जलसंवर्धनाचे पोस्टर आदींद्वारे जलजागृती करण्यात येत आहे.

  या सप्ताहानिमित्त जिगाव प्रकल्प पुनर्वसन विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता स.दी. रालेकर यांच्या मार्गदर्शनात आज 17 मार्च 2022 रोजी जळगाव जामोद शहरातील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ शाळेत सर्व विद्यार्थ्यांना  शपथ  देण्यात आली. विद्यार्थ्यांना पाण्याचे मानवी जीवनातील महत्त्व, पर्यावरण संतुलनासाठी उपयोगीता, जलस्त्रोतांचे संरक्षण व संवर्धनाची गरज, त्यासाठी  पाणी वाचविण्याबात व पाण्याचा काटकसरीने वापर करावा याचे महत्व सांगण्यात आले. या    

 

   कार्यक्रमा करीता शाळेचे संस्थापक अध्यक्ष गिरीशजी मालपांडे, प्राचार्य आणि समस्त शिक्षक वृंद तसेच जिगाव प्रकल्प उपविभाग जळगाव जामोद येथील कर्मचारी वृंद उपस्थित होते. त्याचप्रमाणे खामगांव बस स्थानकांवर जलजागृतीचे पोस्टर लावत उपस्थितांना पत्रके वाटप करीत जलजागृती करण्यात आली. तसेच राहेरा प्रकल्प स्थळी सहायक अभियंता श्रेणी 1 श्रीतीजा गायकवाड, कनिष्ठ अभियंता शुभम फिरके, सरपंच संतोष जाधव यांनी ग्रामस्थांना जलसंवर्धनाची शपथ दिली. तसेच पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. मेहकर येथील ज्ञानपीठ शाळेतही विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली.

************

रंगपंचमी निमित्त मार्गदर्शक सुचना जारी

बुलडाणा,(जिमाका) दि.17: कोविड-19 च्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षापासून सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच विविध कार्यक्रम नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता, शक्यतोवर घरातच राहून साजरे केले आहेत.  कोरोनाचे संक्रमण अद्याप सुरू असल्यामुळे रंगणपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन अथवा गर्दी करून साजरे न करता स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन साजरे करणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी ‘होळी, धूलिवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे.

    या संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोविड-१९ चे संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करुन साजरा करावा. रंगपंचमी हे सण साजरे करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.

   कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment