अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव समतेसाठी विषयावर
अनुभव लेखन उपक्रमाचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : नागरीकांमध्ये निवडणूक व त्यासंदर्भात जागृती व्हावी, तसेच त्यांना निवडणूक प्रक्रीयेची माहिती व्हावी या हेतूने भारत निवडणूक आयोगाकडून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो, या वर्षी महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणूक आयोगाकडून “अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव (Gender) समतेसाठी” या विषयावरील अनुभव लेखन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत सर्वसामान्यांनी त्यांचे अनुभव लेख 25 मार्च 2022 पर्यंत पाठवायचे आहेत. प्राप्त लेखातील निवडक लेखाचे पुस्तक तयार करून, ते प्रसिध्द करण्यात येणार आहे.
सदर उपक्रम सर्वांसाठी खुला आहे, आपले अनुभव मराठी भाषेत पाठवावेत, अनुभव लेखन पाठवताना शब्दमर्यादा 700 ते 1200 असावी. लेखन काल्पनिक किंवा तात्विक स्वरूपाचे नसावे, तर अनुभवाधारित असावे. लेखन शक्यतो युनिकोड - टंकलिखीत असावे. ते शक्य नसेल तर सुवाच्य हस्ताक्षरात लिहून, अक्षरे स्पष्ट दिसतील असे फोटो काढून त्यांची पीडीएफ ceo_maharashtra@eci.gov.in या ईमेल वर आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांकाच्या तपशिलासह पाठवावे. त्याची प्रत माहितीसाठी dydeobuldhana@gmail.com या ईमेल वर पाठवावी. सुट्या इमेजचा (फोटोंचा) विचार केला जाणार नाही.
आपले अनुभव लेखन https://forms.gle/
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून निवडक लेखांचे पुस्तक प्रकाशित केले जाईल. पुस्तकात लेख प्रसिद्ध करताना त्यात आपल्या नावाचा उल्लेख करायचा की नाही, याविषयीचा निर्णय संबंधित व्यक्तीचा असेल. निवडक लेखांना ‘पुन्हा स्त्री उवाच’ या सांकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल. आलेल्या अनुभव लेखनातून पुस्तकासाठी लेख निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. एखाद्या सहभागीच्या लेखनावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर व्यक्तीची असेल. अनुभव लेखन उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
सदर अनुभव लेखन उपक्रमामध्ये सर्व मतदार, नागरीक व महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस.रामामूर्ती, उप जिल्हानिवडणूक अधिकारी श्रीमती गौरी सावंत यांनी केले आहे.
- व्यावसायिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : गेल्या दोन वर्षापासुन करोनामुळे डबघाईस आलेल्या व्यवसायांना व व्यावसायिकांना शासनाने व्यवसाय कराचे विवरण पत्रकावरील विलंब शुल्क (LATE FEE ) माफ करून मोठा दिलासा दिलेला आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त व्यावसायिकांना घेण्याचे आवाहन व्यवसाय कर अधिकारी श्रीमती शीतल पडोळ यांनी केले आहे.
व्यवसायांकर कायदा 1975 अन्वये शासनाने 25 फेब्रुवारी 2022 रोजी अधिसूचना जारी करून व्यवसाय कर कायदा अंतर्गत भरावे लागणारे मासिक आणि वार्षिक विवरणपत्रावरील विलंब शुल्क (LATE FEE) माफ केलेली आहे विवरणपत्र हे नियमित कालावधीमध्ये भरणे आवश्यक असतात. अन्यथा 30 दिवसापर्यंतच्या विलंबासाठी 200 रूपये व त्यानंतरच्या विलंबासाठी 1 हजार रूपये इतके विलंब शुल्क प्रत्येक विवरणाकरिता (RETURN) आकारले जाते. परंतू अनेक व्यावसायिक कोरोनाच्या संकटामुळे विवरणपत्र भरणा करू शकले नाही, त्यांचेसाठी ही सुवर्ण संधी आहे.
डिसेंबर 2021 पर्यंतच्या कोणत्याही कालावधीचे देय व्यवसाय कर व व्याजाचा भरणा करून विवरणपत्रके 31 मार्च 2022 पर्यंत दाखल केल्यास विलंब शुल्क माफी लागू राहील. व्यवसायकर विवरणपत्रके दाखल करण्यासाठीच्या विलंब शुल्क (LATE FEE) माफीच्या योजनेचा लाभ घेवून प्रलंबित विवरणपत्रे सर्व आस्थापना, व्यावसायिक व व्यापारी लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन व्यवसाय कर अधिकारी श्रीमती पडोळ यांनी केले आहे.
निविदा प्रक्रिया पुर्ण नसतांना कंत्राट देण्याचा प्रश्नच येतो कुठून ?
- स्वास्थ्यरथ मोबाईल मिनी वाहन खरेदीबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा खुलासा
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : आदिवासी भागातील ग्रामीण नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध करण्याचा उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेवून नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत मोबाईल मिनी हॉस्पीटल (स्वास्थ्यरथ) या युनिटद्वारे सेवा देण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. नाविण्यपूर्ण योजनेतून हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात हाती घेण्यात आला आहे. मुळात यात सदर युनिट खरेदी संदर्भात आतापर्यंत तीन वेळा ई-निविदा बोलवण्यात आल्या. मात्र त्यातील अटी व शर्तींची पुर्तता शासनास अपेक्षीत अटी व शर्ती नुसार पुर्ण होत नसल्याने चवथ्या वेळी ई निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
मोबाईल मिनी हॉस्पीटल (स्वास्थ्यरथ) युनिट खरेदीच्या संदर्भामध्ये काही वर्तमानपत्रात आलेले वृत्त साफ चुकीचे असल्याचा खुलासा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. सदर वृत्त हे खोडसाळ असून या संदर्भात निविदा प्रक्रिया पुर्ण नसताना कंत्राट देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्टीकरणही आरोग्य विभागाने आपल्या खुलाशात दिले आहे. खुलाशानुसार, सदर ई निवीदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र दुसरीकडे या युनिट खरेदीत मक्तेदाराचे हित साधल्या जात असल्याचा व या स्वास्थ्यरथ खरेदीच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनावर नाहक आरोप करून चुकीचे वृत्त काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. हा नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत पायलट प्रोजेक्ट प्रशासनाच संकल्पनेतून हाती घेण्यात आलेला आहे. मात्र अद्याप सदर ई- निविदा प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. त्यामुळे कंत्राट देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे, असा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिला आहे.
शासकीय सुट्टीमुळे दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द
बुलडाणा,(जिमाका) दि.17: जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र येणाऱ्या शुक्रवारला 18 मार्च 2022 रोजी धुलिवंदन निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे 18 मार्च रोजी जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथील अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद, कान नाक घसा संबंधित दिव्यांग तपासणी बाबतचे दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील संबंधित दिव्यांग तपासणीस येवू नये. आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment