Tuesday, 1 March 2022

DIO BULDANA NEWS 1.3.2022



 मेहकर येथे महावितरणचे विभागीय कार्यालय सुरू करणार

-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
बुलडाणा, (जिमाका) दि १: मेहकर, सिंदखेडराजा आणि लोणार येथील वीज ग्राहकांची समस्या लक्षात घेऊन मेहकर येथे महावितरणचे विभागीय कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच यावर अंतिम कार्यवाही होवून मेहकर येथे महावितरणचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी आज लोणार येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
लोणार येथे विश्राम गृह आवारात महावितरणच्यावतीने वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे होते. तर व्यासपीठावर आमदार संजय रायमुलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे मुख्य अभियंता भीमराव राऊत, बुलडाणा मंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभियंता संजय आकोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना ऊर्जा मंत्री डॉ राऊत म्हणाले, येथील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी समस्यांची आपल्याला जाणीव आहे. या परिसरात वीजेची समस्या लक्षात घेऊन मेहकर -सुलतानपूर ही नवीन वीज वाहिनी टाकली आहे. ती लोणार पर्यंत वाढविण्यात येणार आहे. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते  पांगरी ता. बुलडाणा येथे महावितरणच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ३३/११के.व्ही. वीज उपकेंद्राचे आभासी पद्धतीने भूमीपूजन करण्यात आले. प्रस्तावित वीज उपकेंद्राच्या उभारणीसाठी ४ कोटी ९३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पांगरी,सिंदखेडा, मातला येथील वीज ग्राहकांना आगामी काळात दिलासा मिळणार आहे.
  यावेळी वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. मेळाव्याला वीज ग्राहक, महावितरण, महापारेषण चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
***


पाणी पुरवठा योजनेचे ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याहस्ते भूमिपूजन
 बुलडाणा, (जिमाका) दि. १: चिखली तालुक्यातील उंद्री येथील जल जीवन मिशन योजने अंतर्गत २.६५ कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी जि. प अध्यक्ष मनीषा पवार, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे,  माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, सरपंच प्रदीप अंभोरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. जायभाये, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्री वारे आदी उपस्थित होते. 
******


No comments:

Post a Comment