Sunday, 20 March 2022

DIO BULDANA NEWS 20.3.2022

 जलजागृती सप्ताहानिमीत्त जल दौड; जल संवर्धनाचा दिला संदेश

बुलडाणा, (जिमाका) दि. २०:  शासन निर्देशानुसार जिल्ह्यात १६ ते २२ मार्च, २०२२ या कालावधीत "जलजागृती सप्ताह"चे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमीत्ताने जिजामाता प्रेक्षागार येथे आज २० मार्च, २०२२ रोजी सकाळी ७ वा. वॉटर रन (जलदौड) स्पर्धा पार पडली.  या स्पर्धेच्या  पारितोषीक वितरण समारंभास आमदार संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता सर्वश्री प्रशांत संत, कु. स्नेहल माने, रविंद्रसिंग परदेशी, सहा. अधीक्षक अभियंता तुषार मेतकर, उप कार्यकारी अभियंता कु.क्षितीजा गायकवाड, क्रिडा मार्गदर्शक अनिल इंगळे, चंद्रकांत साळुके, हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत संत यांनी जलप्रतिज्ञेचे वाचन केले. 
 याप्रसंगी आमदार संजय गायकवाड म्हणाले, राज्यात आगामी काळात  भिषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे  ही शक्यता  लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. प्रत्येकाने जल साक्षर होवून पाणी वाचवावे. या जल दौडमध्ये  महिला व पुरुष गटातील  मोठा व लहान गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, बक्षीसाची रक्कम व पदक वितरीत करण्यात आले. या जल दौडकरिता नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. सदर स्पर्धकरिता पंच म्हणुन विजय वानखेडे, निलेश शिंदे. रविंद्र गणेशे यांनी योगदान दिले. संचालन दादाराव शेगोकार व आभार प्रदर्शन मंजीतसिंग राजपुत यांनी केले. सदर समारंभास जिल्हयातील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता/ अधिकारी तसेच कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, क्रिडा विभाग यांचे आवश्यक ते सहकार्य लाभले. "लोकसहभागातुन जल समृध्दी" हेच या जलजागृती सप्ताहाचे ब्रीद आहे.

No comments:

Post a Comment