Friday, 25 March 2022

DIO BULDANA NEWS 25.3.2022

 जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा

• आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा.लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकी वरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी राज गणपत गायकवाड व इतर 11 आरोपीविरूद्ध कलम 420, 406, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

   कंपनीकडे 5000 रूपये जमा केल्यास कंपनी एक शेळी खरेदी करणार होती. शेळी 7 महिन्यामध्ये एकवेळ 2 पिल्लांना जन्म देते. एक शेळी 14 महिन्यात 4 पिल्लांना जन्म देते, तसेच 14 महिन्यात एक पिल्लू किंवा 4 हजार रूपये ग्राहकाला परतावा म्हणून देणार व शेळीची रक्कम कंपनीकडे तशीच जमा राहणार. दरवर्षी शेळीचा घसारा 20 टक्के अर्थात 1 हजार रूपये कपात होणार, परतावामध्ये 14 महिन्यांची एक टर्म धरण्यात आली होती. तसेच 5 टर्म पूर्ण केल्यानंतर व दरवर्षी परतावा परत न घेतल्यास कंपनीकडे ग्राहकाने विश्वास दाखविला म्हणून एकदम 10 शेळीचे पिल्ले परत करणार व रोख रक्कम हवी असल्यास त्या 10 पिल्लांचा दर प्रत्येकी 5 हजार रूपये गृहीत धरण्यात येईल, असे एकूण 50 हजार रूपये ग्राहकास देण्यात येतील. अशी कंपनीची परतावा पॉलीसी होती. जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने व त्याचे मालक तसेच संचालक मंडळ यांनी मल्टी मार्केटींग पद्धतीने गुंतवणूकदारांकडून पैसे घेवून ते मुदतीत परत न करता गुंतवणूकदारांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे.  

   तरी राज गणपत गायकवाड व इतर 11 आरोपींनी अन्य जनतेची देखील अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशा प्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105, 7972571699 व 07262-245989 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            ***********

   


पोषण पंधरवडा अंतर्गत दहीद बु येथे सायकल रॅली

बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : तालुक्यातील दहीद बु येथे अंगणवाडी केंद्रातमार्फत पोषण पंधरवडा निमित्ताने गावातील मुल मुलींकारिता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोषण अभियाना अंतर्गत पोषण पंधरवडा दिनांक 21 मार्च ते 4 एप्रिल अंतर्गत राबविण्यात येत आहे. त्यानुसार दहीद बु येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत गावातील विद्यार्थी, अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी तसेच किशोरवयीन मुलींनी उस्फूर्त पणे सहभाग नोंदविला.

    सायकल चालविल्यामुळे बालकांचा व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊन सायकल चालविण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. सायकलिंग साठी कुठल्याही इंधनाची आवश्यकता नसल्याने परिणामी हवेचे प्रदूषण होत नाही. सायकलमुळे कुठलेही रस्ते खराब होत नसल्याने एकप्रकारे राष्ट्रीय संपतीची काटकसरच होते. अशाप्रकारे सर्वच वयोगटातील मुलां- मुलींसाठी सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. आजची बालके ही देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे बालक स्वस्थ तर देश सशक्त हा संदेश पोषण पंधरवडयातील आयोजित सायकल रॅलीतुन ग्रामीण भागातील जनतेला देण्यात आला आहे.

   सायकल रॅलीचे आयोजनासाठी पर्यवेक्षिका श्रीमती आशा खरे, दहीद बू येथील अंगणवाडी सेविका पदमा राऊत, मीना राऊत, जिजा जाधव, नंदा जाधव, अंगणवाडी मदतनीस वृषाली राऊत, मनीषा गायकवाड, सुमन यंगड, चंद्रप्रभा धंदर यांनी प्रयत्न केले. सदर सायकल रॅलीला बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment