पाण्याच्या योग्य नियोजनाची सुरूवात स्वत:पासून करावी
- जिल्हाधिकारी
• जलजागृती सप्ताहाचे थाटात उद्घाटन
• जिल्हाधिकारी यांच्याहस्ते कलश पूजन
• नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, खडकपूर्णा, मन, वान, पूर्णा नद्यांमधील पाण्याचे पूजन
• लोकसहभागातून जल समृद्धी
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : मानवी इतिहासात जलजागृती करावी लागणे ही दु:खद बाब आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर पाण्याचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचे वाढत जाणारे दुर्भिक्ष्य बघता पाण्याचे महत्व सर्वोदीत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा थेंबन थेब वाचविणे आवश्यक आहे. पाण्याचया योग्य नियोजनाची गरज असून त्याची सुरूवात प्रत्येकाने स्वत:पासून करावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज व्यक्त केली.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने 16 मार्च ते 22 मार्च 2022 दरम्यान जिल्हाभर जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानुसार जलजागृती सप्ताहाचा उद्घाटन सोहळा आज 16 मार्च 2022 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषाताई पवार, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता सुनील चौधरी, पाणी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, जलतज्ज्ञ रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते नद्यांचे जलाचे कलश पूजन करण्यात येवून जलप्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. रामामूर्ती पुढे म्हणाले, पावसाचे प्रमाण कमी व लहरी झाले आहे. त्यामुळे शेतीसाठी व एकत्रितच सर्व क्षेत्रासाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. निसर्गाने निर्माण केलेले जलचक्र अबाधित ठेवून पुढील पिढ्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पाण्याची बचत करायला पाहिजे. प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात जलसंवर्धनाची प्रभावी कार्यपद्धती अवलंबून काम करावे. तसेच चराई बंदी, वृक्षतोड बंदी व वृक्ष लागवडीसारखे उपाय करावेत. सप्ताहात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमांमधून पाण्याचे महत्व व भविष्यातील पाण्याची स्थिती याविषयी प्रबोधीत व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषाताई पवार यांनी विचार व्यक्त करताना म्हणाल्या, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यामध्ये महिलांची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे महिलांनी अगदी घरगूती कामांपासून पाण्याचा काटकसरीने वापर करायला पाहिजे. पाण्याचे महत्व ओळखून प्रत्येकाने त्याचा काटकसरीने वापर करावा.
अध्यक्षीय भाषणात अधिक्षक अभियंता सुनील चौधरी म्हणाले, जलजागृती सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमधून विभागाच्यावतीने जलजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात 10 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा या कार्यक्रमागाील उद्देश आहे. त्यांनी वॉटर इज लार्जर दॅन लाईफ असा संदेश दिला. पाणी वापर महासंघाची भूमिका व कार्य याबाबत राजेंद्र गाडेकर यांनी आपल्या मनोगतातून विषद केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी केले. संचलन जलसंपदा विभागाचे मनजीतसिंग राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन दादाराव शेगोकार यांनी केले.
कलशामध्ये जिल्ह्यात प्रमुख नळगंगा, ज्ञानगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, पूर्णा, खडकपूर्णा, मन व वान नद्यांमधील पाण्याचा समावेश होता. यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाला सभागृहामध्ये समिती सदस्य चंद्रकांत साळुंके, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, सुदर्शन राळेकर, अमोल चोपडे, एस.एस सोळंके, राहुल जाधव, कृष्णा आव्हाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे आदी उपस्थित होते. तसेच बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळातंर्गत कार्यरत उपविभागीय अभियंता /अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment