जल सिंचनामध्ये 10 टक्के क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवावे
- प्रशांत संत
- जलजागृती सप्ताहाचा समारोपीय समारंभ
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार 16 ते 22 मार्च 2022 या कालावधीत जलजागृती सप्ताह विविध कार्यक्रम घेवून राबविण्यात आला. या कार्यक्रमांमधून जलजागृती करण्याचा प्रयत्न विभागाच्यावतीने झाला. जल हेच जीवन आहे, हा संदेश देत प्रत्येकाने जलसंवर्धनाच्या या लोकचळवळीत सहभागी व्हायला पाहिजे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे, समजून पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. या वर्षीच्या जलजागृती सप्ताहाचे फलीत म्हणून पुढील वर्षात किमान उपलब्ध पाण्यातून सिंचन क्षेत्र 10 टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे प्रतीपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी केले.
जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार आयोजित जलजागृती सप्ताहाचा आज 22 मार्च रोजी समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालय परीसरात करण्यात आले. या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता प्रशांत संत होते, तर कार्यक्रमास कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे, सुदर्शन राळेकर, सुधीर सोळंके, अमोल चोपडे उपस्थित होते. अधीक्षक अभियंता सुनिल चौधरी यांचे मार्गदर्शनात जलजागृती सप्ताह जिल्ह्यात राबविण्यात आला.
सप्ताहा दरम्यान सिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या खडकपुर्णा प्रकल्पावरील वसुंधरा पाणीवापर संस्था दे.घुबे, पेनटाकळी प्रकल्पावरील पेनटाकळी पाणीवापर महासंघ मेहकर, नळगंगा प्रकल्पावरील जय बजरंग पाणीवापर संस्था शेलापुर ता. मोताळा, तसेच जलतज्ज्ञ रामकृष्ण पांडुरंग पाटील यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच जलजागृती सप्ताहामध्ये आपले योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अभियंता- अधिकारी तुषार मेतकर, रविंद्र विश्वकर्मा, विजय चोपडे, कल्याणी यमाजी, क्षितीजा गायकवाड, चंद्रशेखर देशमुख, संजय चांदोडकर, संदीप कंकाळ, सलीम शेख यांचा व कर्मचारी भरत राऊत, करण उमाळे, जानकीराम आव्हाळे, केशव जवादे, दादाराव शेगोकार, उत्तम जाधव, शत्रुघ्न धोरण व मंजीतसिंग राजपुत यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात वसुंधरा पाणीवापर संस्थचे अध्यक्ष शेनफडराव घुबे, रामकृष्ण पाटील, कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे, अमोल चोपडे यांनीही आपले विचार मांडले. जलसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत त्यांच्या विचारातून प्रकट झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत संत यांनी जलप्रतिज्ञेचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन मंजीतसिंग राजपुत यांनी केले. समारंभास जिल्हयातील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, अधिकारी तसेच कर्मचारी बहु संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन दादाराव शेगोकार यांनी केले.
*********
भुसावळ येथे 10 एप्रिल रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ जि. जळगांव येथे 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळ 5 वाजे पर्यंत, बुलडाणा व जळगांव जिल्हयातील माजी सैनिकांसाठी मेळावा अयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यामध्ये विविध अभिलेखा कार्यालयाचे व सी.पी.पी.चे अधिकारी व कर्मचारी येणार आहेत. ते पेन्शन संबंधित अडी अडचणी सोडविण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. जिल्हयातील सर्व माजी सैनिकांनी पेंन्शन व इतर अडचणी बाबत सर्व कागद पत्रांसह 10 एप्रिल रोजी स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे दिलेल्या वेळेवर जास्तीत जास्त माजी सैनिकांनी आपल्या अडी अडचणी सोडविण्यासाठी उपस्थित रहावे. जिल्हयातील विरपत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.
************
जलजागृती सप्ताह : रांगोळी स्पर्धा व महिला मेळावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जलसंपदा विभागामार्फत जिल्हाभर 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त 21 मार्च रोजी महिला मेळावा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन जलसंपदा विभागाच्या कार्यालय परीसरात करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई शेळके व मोताळा तहसीलदार सारिका भगत उपस्थित होत्या. महिला मेळाव्या दरम्यान जलजागृती उपदेशात्मक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना जलजागृतीविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक महिलेने जलसंवर्धनाची सुरूवात आपल्या घरापासून केल्यास तीचा आदर्श समाज घेईल. महिलांनी केलेले कोणतेही कार्य समाज मनावर चांगल्या प्रकारे बिंबवल्या जाते. यावेळी महिलांनी जलसंवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. जलजागृतीवर काढलेल्या रांगोळीची पाहणीही मान्यवर महिलांनी केली. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जलजागृती सप्ताह : विद्यार्थ्यांनी घेतली जल प्रतिज्ञा
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जलसंपदा विभागामार्फत जिल्हाभर 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त आज 22 मार्च रोजी विद्या विकास विद्यालय, कोलवड तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोलवड येथे विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा घेऊन पाण्याचे महत्व, बचत, पाण्याचा योग्य प्रकारे वापर करणे आदी विषयावर मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. जल संवर्धनासाठी जलसंस्कार लहान वयापासूनच झाले पाहीजे. पाणी हा सृष्टीचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे संरक्षण, संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेवून कार्य करावे, असे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाला उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड, प्राचार्य सुनील जवंजाळ, सहाय्यक अभियंता श्रेणी-2 योगेश तरंगे, शाखा अभियंता विजयसिंह राजपूत, श्री. कांबळे व प्रभाकर राऊत, विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment