Thursday, 5 August 2021

DIO BULDANA NEWS 5.8.2021

 


संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे

-         पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
  • 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करा

बुलडाणा,(जिमाका) दि.5 : देशात किंवा राज्यात कोविड संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही लाट केव्हा, कधी व कुठे येईल याबाबत अजून तरी निश्चितता नाही. वैद्यकीय क्षेत्रातील विविध संस्था या लाटेबाबतचा अंदाज व्यक्त करीत आहे. तरी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहावे, अशा सुचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.  कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी  जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे आदी उपस्थित होते.

  तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होण्याच्या शक्यतेच्या दृष्टीने कोविडचे बाल रूग्ण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, पेडीयाट्रीक वार्ड तयार ठेवावे.  तसेच आज रोजी जिल्हयात 40 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्माण करण्याची तयारी आहे. मात्र 70 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेचे नियोजन करावे. कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता पडू नये. यंत्रणांनी तिसरी लाट येवूच नये, यासाठी प्रयत्न करावे. त्याकरीता जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी यंत्रणांनी सर्वांच्या सहकार्यातून शिबिरांचे आयोजन करावे व 100 टक्के लसीकरण करून घ्यावे. लसीकरणामुळे तिसरी लाट आली, तरी निष्प्रभ ठरेल.  त्यासाठी विहीत कालमर्यादेत एक धडक कार्यक्रम जिल्ह्यात राबवावा.  चाचण्यांसाठी लागणाऱ्या विविध किटची पर्याप्त व्यवसथाही आतापासून करून ठेवावी.

  पेडीयाट्रीक वार्ड सज्ज : स्त्री रूग्णालय बुलडाणा येथे  50 बेड, उपजिल्हा रूग्णालय, शेगाव येथे 50 बेड, सामान्य रूग्णालय खामगांव येथे 50 बेड, दे. राजा येथे 50 बेड व प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात 10 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.    

****************

1  ते 7 ऑगस्ट दरम्यान  स्तनपान सप्ताह

बुलडाणा,  (जिमाका) दि. 5:  शासनाचे आदेशान्वये 1 ते 7 ऑगस्ट  हा आठवडा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2021 हा आठवडा अंगणवाडी स्तरावर स्तनपान स्प्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.यामध्ये गरोदर माता यांना 1 हजार दिवस बाळाचे बाबत मार्गदर्शन, 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता,स्तनदा माता यांचे वजन घेणे व श्रेणीनुसार समुपदेशन करणे, गृहभेटी दरम्यान गरोदर माता, स्तनदा माता यांना स्तनपानाबाबत मार्गदर्शन व तरंग सुपोषित महाराष्ट्र प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. सीबीई अंतर्गत गरोदर माता नोंदणी करणे, सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करणे इ .कार्यक्रम अंगणवाडी केंद्र स्तरावर घेण्यात येत आहे.

******

सघन कुक्कुट विकास गट स्थापन करणेसाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, (जिमाका) दि. 5: सन 2021-22 करीता राज्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गट स्थापना करणे अंतर्गत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.  पशुपालकांनी संबंधित राज्यातील परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्या करीता सन 2021-22 करीता 50 टक्के अनुदानावर बुलडाणा व मोताळा तालुक्याची निवड झाली आहे.  

    योजनेतील उदिष्टे नुसार निवड समिती मार्फत प्रती तालुका 1 लाभार्थ्यांची निवड करावयाची असल्याने, सर्व प्रवर्गातील इच्छुकांकडून तालुक्यामधून पशूधन विकास अधिकारी (वि) पंचायत समीती स्तरावर उपलब्ध असलेले अर्ज दिनांक 10 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत दोन प्रतित अर्ज पशुसंवर्धन विभाग,  पशूधन विकास अधिकारी (वि), पंचायत समीती स्तरावर सादर करावे. सदर पशुपालकाकडे स्वताःची 2500 चौ.फुट जागा दळणवळण , पाण्याची व्यवस्था व विद्यूती करणाची सुविधा असावी.सदर योजनेमध्ये प्रकल्पाची किंमत 10 लक्ष 26 हजार असुन प्रकल्प शासनाच्या मार्गदर्शक सुचना व शासन निर्णया नुसार पुर्णता कार्यान्वीत झाल्या नंतर 50 टक्के अनुदान रूपये 5 लक्ष 13 हजार  लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण (DBT) करण्यात येणार आहे.  या बाबतची सविस्तर माहीती पशूधन विकास अधिकारी (वि) पंचायत समीती यांच्याकडे उपलब्ध आहे.या योजनेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन डॉ.पी.जी.बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment