Monday, 2 August 2021

DIO BULDANA NEWS 2.8.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1010 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 07 पॉझिटिव्ह

  • 06 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1017 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1010 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 600 तर रॅपिड टेस्टमधील 410 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1010 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : दहीगांव 1, चिखली शहर : 2, दे. राजा तालुका : गडलिंग 1, भिवगण 1, खामगांव शहर : 1, जळगांव जामोद तालुका : हिंगणा 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 07 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 06 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 642242 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86570 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86570 आहे.

  आज रोजी 1367 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 642242 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87274 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86570 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 32 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

****

 

 

 

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांकडून 12 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित

बुलडाणा,(जिमाका) दि. 2 : मातंग समाजातील इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी, पदवी व पदविका, अभियांत्रिक व वैद्यकीय कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची जिल्हा निहाय निवड केली जाते. या लाभासाठी मातंग समाजातंर्गत असणाऱ्या 12 पोट जातीमधील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादीग, मादिगं, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा आदी पोटजातींचा समावेश आहे.

   लोकशाहीर साठे शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज सादर करतेवेळी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड प्रत, गुणपित्रका प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी दाखल्यांसह सादर करावे. सदर अर्ज दोन प्रतीमध्ये जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावा. अधिक माहितीसाठी सदर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.  

*****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला नायब तहसिलदार संजय बंगाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करीत अभिवादन केले.

******

कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : जिल्हयात नगदी पिक म्हणून कापूस पिक हे मोठया प्रमाणात घेतले जाते. या हंगामात देखील मोठया प्रमाणात कापूस पिकांची लागवड केलेली आहे. कापूस पिकाची पेरणी ही जूनमध्ये सुरू होते. पिक सध्या वाढीच्या व पातीच्या अवस्थेत आहे. सन 2015 पासूनचा अनुभव बघता व सध्या वातावरणात असलेली आर्द्रता, सतत ढगाळ वातावरण यामुळे सध्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव  येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता वेळेतच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.  

   शेताचे सर्वेक्षण करून बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात, कपाशीच्या शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान दहा पक्षीथांबे लावावे म्हणजे पक्षी त्यावर बसून अळ्या टिपून खातील. पतंगाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याकरीता पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी 5 यप्रमाणे कामगंध सापळे लावावे. किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर म्हणजे 8 ते 10 पतंग प्रति कामगंध सापळा प्रति दिन सलग 3 दिवस किंवा प्रति 10 फुले किंवा 10 हिरवी बोंडे सापडल्यास शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा ॲझाडिरेक्टीन 10 हजार पीपीएम 1 मिली प्रति लिटर किंवा 1500 पीपीएम 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंदरी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी लेबलक्लेम किटकनाशकांची शिफारसीत मात्रेत तक्यात नमूद केल्यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवाणी करावी. प्रत्येक फवारणीच्यावेळी एकच एक किटकनाशक न वापरता आलटून पालटून वापरावे. निंबोळी अर्क 5 टक्के मात्रा प्रति 10 लीटर पाण्यात 50 मिली, क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 मिली किंवा 20 ग्रॅम, क्लोरोपायरीफॉस 20 टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यूपी 25 मिली किंवा 20 ग्रॅम, फेनवेलरेट 20 टक्के ईसी किंवा सायपरमेथ्रीन 20 टक्के ईसी 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकाचा कालावधी वाढविणारी किटकनाशके मोनोक्रोटोफॉस, ॲसिफेट, इमिडाक्लोप्रिड,  थायोमेथोक्साम आणि ॲसिटामिप्रिड आदींचा वापर सुरूवातीच्या तीन महिन्यांमध्ये टाळावा.

   ज्या ठिकाणी उपलब्धता असेल तिथे बिव्हेरीया बॅसरयाना, मेटॅरीझियम ॲनोसोपीली किंवा व्हर्टिसीलीयम लेकॅनी 1.5 टक्के विद्राव्य घटक असलेली भुकटी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वातावरणात आर्द्रता असताना फवारणी करावी. विशेषत: पहिल्या तीन महिन्यात वनस्पतीजन्य जैविक किडनाशके आणि जैविक किड नियंत्रण पद्धतीचा समावेश असलेल्या एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. पिक उगवल्यानंतर 115 दिवसांनी ट्रायकोग्रामा बैक्ट्री अथवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी किटकांची 1.5 लक्ष अंडी प्रती हेक्टरया प्रमाणात प्रसारण करावे. पांढरी माशी व बोंडअळ्यांचा उद्रेक टाळण्यासाठी किडनाशक मिश्रणाचा वापर कटाक्षाने करावा. नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटीक पायारेथ्रोइड, ॲसिफेट, फिप्रोनिल किटकनाशकांचा वापर करू नये. तरी शेंदरी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता आतापासूनच पिक सर्वेक्षण करून भौतिक, जैविक व रासायनिक किड नियंत्रण पद्धतीचा वापर करून एकात्मिक किड नियंत्रणक प्रभावीपणे करावे,असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

****

समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष’ स्थापन

  • ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार सुविधा

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,बुलडाणा अंतर्गत ज्येष्ठ नागरिक धोरण, योजना राबविण्यात येते. त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयात एकाच ठिकाणी सर्व सोयी, सुविधा उपलब्ध होवून त्यांच्या प्रश्नांचे निराकारण होण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक कक्ष समाज कल्याण कार्यालयात स्थापन करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तात्काळ नोंदीकृत करणे, समस्येबाबत तात्काळ निराकारण करून योग्य ते मार्गदर्शन देणे हा  कक्ष स्थापन करण्यामागील हेतू  आहे. ज्येष्ठ नागरिक कक्षात उपस्थित नागरिकांच्या नोंदी तथा योग्य तीमाहिती पुरविण्याकामी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालया अंतर्गत एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी या कक्षाची मदत घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केले आहे.

*******

 

 

समाज कल्याण कार्यालयात अनुसूचित जाती उपयोजना माहितीसाठी ‘एकल खिडकी’  

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कर्यालयात अनुसूचित जाती उपयोजनेची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी एकल खिडकी निर्माण करण्यात येणार आहे. सदर कार्यालयातंर्गत अनुसूचित जाती उपयोजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील 14 यंत्रणांना विविध उपयोजना राबविण्यातकरीता यंत्रणेच्या मागणीच्या प्रमाणात नोंदविण्यात आलेल्या अर्थसंकल्पीत निधी वितरित करण्यात येत असतो. तथापि संबंधित सर्व यंत्रणांकडील योजना त्यांच्या स्तरावरच राबविण्यात येत असतात. त्याकरिता जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या घटकांना प्रत्येक कार्यालयात योजनांची माहिती व मार्गदर्शन घेण्यासाठी वणवण भटकंती होवू नये, या दृष्टीने समाज कल्याण कार्यालयातंर्गत एकल खिडकी निर्माण करण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी कळविले आहे.

******

सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा किडीचे व्यवस्थापन करावे

  • कृषि विभागाचे आवाहन  

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते

यामुळे झाडाचा वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते त्यामुळे पुर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाय योजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

   या पार्श्वभुमीवर सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधुंनी उपाय योजना कराव्यात. चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. यापद्धतीचा 15 दिवसातून जर दोनदा अवलंब केला,  तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये, याकरिता सुरुवातीलाच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

पीक पेरणीच्या 30-35 दिवसानंतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन 50 टक्के, 30 मिली प्रति 10 लिटर अथवा थायक्लोप्रीड 21.7 एस. सी. 15 मिली प्रति 10 लिटर अथवा क्लोराट्रॅनिलीप्रोल 18.5 एस. सी. 3 मिली प्रति 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6 % + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 % झेड. सी 2.5 ग्रॅ. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.

*****

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 7110 प्रकरणे निकाली; न्यायालयीन शुल्क जमा

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पूर्ण जिल्हयामध्ये पॅनल ठेवण्यात आली होती. या लोक न्यायालयात प्रत्यक्ष व आभासी अशा दोन्ही प्रकारे प्रकरणे ठेवण्यात आली. त्यात प्रलंबीत एकुण 4204 प्रकरणे तडजोडीसाठी ज्यामध्ये प्रामुख्याने तडजोडी योग्य अशी फौजदारी व दिवाणी, मोटार वाहन अपघात प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, छोटे गुन्हे, भुसंपादनाची प्रकरणे तसेच कौटुंबिक दावे आदी ठेवण्यात आले. त्याबरोबरच जे दावे अद्याप दाखल झालेले नाहीत, असे दाखलपुर्व प्रकरणे एकुण 13393 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित 1132 प्रकरणे आणि वादपुर्व खटले 5978 असे एकुण 7110 एवढे प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधूपन न्यायालयीन शुल्क 20 कोटी 40 लक्ष 90 हजार 751 रूपये जमा करण्यात आले.

    बुलडाणा येथे एकुण 8 पॅनल तयार करण्यात आले होते. त्यामध्ये तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 आर.बी.रेहपाडे,  सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर  श्रीमती एस.एस. पडोळीकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए.यु.सुपेकर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए.ए.देशपांडे, तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए.बी.इंगोले, दुसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन.बी.चव्हाण, चवथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी.डब्लु. जाधव आणि  मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एस.भुरे यांचा समावेश होता. ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा प्र. अध्यक्ष श्रीमती चित्रा हंकारे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. त्यांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीत निकाली काढण्याकरीता वकील संघाला आवाहन केले होते.

 या लोक अदालतीसाठी सर्व सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव साजिद आरिफ सैय्यद, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजय सावळे, सचिव अमर इंगळे तसेच इतर सर्व विधीज्ञ आणि पक्षकार मोठया संख्येने हजर होते. या लोक अदालती करीता पंच म्हणुन वकील संघाच्या सभासदांनी काम पाहिले. ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपीक शांतीकुमार सुभाषचंद्र महाजन, गजानन प्रकाश मानमोडे, हेमंत आबाराव देशमुख, व्ही.एस.मिलके, ए.ए.लहाने, लिपीक आकाश भगवान अवचार,  पी.एल.व्ही. प्रविण खर्चे, विधीज्ञ  सुबोध तायडे यांनी प्रयत्न केले.  लोक अदालतीत कोवीड-19 च्या नियमांचे पालन करून मास्क लावुन, सामाजीक दुरी ठेवुन व इतर सर्व काळजी घेवुन जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.

***********

मुंग व उडीद पिकांवरील किडीचे व्यवस्थापन करावे; कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : मुंग व उडीद पिकावरील किडीचे व्यवस्थापनसाठी उपाययोजना कराव्यात. शेत तण विरहीत ठेवावे. चरी, कोटो चवळी या तणावर सदर विषाणू जिवंत राहतो व तेथुनच किडीद्वारे पिकावर येतो हया तणाचा नाश करावा.

पिकात जास्त नवखत देणे टाळावे, त्यामुळे पिकाची कायीक वाढ होते व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पेरणीनंतर 15 दिवसांनी पिवळ चिकट सापळे 15 x 30 सेमी आकाराचे हेक्टरी 16 पिकाच्या उंचीच्या एक फूट उंचीवर लावावे.  मावा, पांढरीमाशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसताच किंवा लिफ क्रिनकल विषाणुरोगांची सुरुवात दिसताच,  फिप्रोनिल 5 टक्के एससी 20 मिली किंवा फोनोकामाईड 50 टक्के डब्ल्युजी 3 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड 17.80 टक्के एसएल 2.5 मिली किंवा थायामेथोक्झाम 25 टक्के डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी फवारणी करावी.

  मात्र ज्या शेतक यांनी बिजप्रक्रिया केली नाही, त्यांनी पिक उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांनी वरीलपैकी कोणात्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी व गरज वाटल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करतांना किटकनाशके आलटून पालटून वापरावे. यावर्षी पावसाचा खंड जास्त पडल्यामुळे काही भागामध्ये मुंगाची उशीरा पेरणी झाली, ते पीक सध्या 10 ते 15 दिवसांचे आहे. या पिकांवर वरीलप्रमाणे प्रादुर्भाव दिसताक्षणीच किंवा पुढील 10 ते 12 दिवसांनी किटक नाशकांची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.

****

No comments:

Post a Comment