Wednesday, 4 August 2021

DIO BULDANA NEWS 4.8.2021

 

शहीद जवान कैलास पवार यांच्या




वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

  • साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप
  • अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे च्या घोषणांनी आसमंत निनादला

बुलडाणा,(जिमाका) दि.4 : : अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणांनी आज चिखलीचा आसमंत निनादला. तालुका क्रीडा संकुल मैदानावर जमलेल्या हजारो नागरिकांनी शहीद जवान कैलास पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

    भारतीय सैन्यात युनिट 10 महार रेजिमेंटमध्ये द्रास सेक्टर भागात भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे शिपाई पदावर कैलास भरत पवार कार्यरत होते. मात्र 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्ट वरून लिंक सोबत परत येत असताना अचानक मध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येवून ते खाली पडले. त्यांना जबर मार लागल्यामुळे ते गतप्राण होवून शहीद झाले. त्यांचे पार्थिव शरीर आज 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथून राहते घर गजानन नगर, चिखली येथे पोहोचले. त्यानंतर शहीद कैलास पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून तालुका क्रीडा संकुल मैदानापर्यंत काढण्यात आली. तालुका क्रीडा संकुल मैदानावर शहीद जवान कैलास पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

   यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, माजी आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्ष प्रियाताई बोंद्रे, खासदार प्रतापराव जाधव यांचे प्रतिनिधी ऋषी जाधव,  जि.प महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, वस्त्रोद्योग महामंडाळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प सदस्य जयश्रीताई शेळके आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी शहीद जवान कैलास पवार यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहली.  

   याप्रसंगी पालकमंत्री डॉ. शिंगणे श्रद्धांजली वाहताना म्हणाले, आज अत्यंत शोकाकूल वातावरण आहे.  या वातावरणात आपण सर्वजण शहीद कैलास पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झालो आहोत. आपल्या जिल्ह्याचा सुपूत्र भारत मातेच्‍या रक्षणासाठी शहीद झाला आहे. शहीद जवान यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी संबंधितांना दिल्या. त्यानंतर आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या, या भावविभूर वातावरणात आपण सर्वजण शहीद कैलास पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत. त्यांना निरोप देताना अंत:करण अगदी जड झाले आहे. शहीद जवान यांच्या स्मारकासाठी चिखली नगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर शहीद जवान कैलास पवार यांच्या पार्थिवाला बंदुकीच्या तीन फैरी झाडून भारतीय लष्कर, महाराष्ट्र पोलीस दलाच्या चमूकडुन मानवंदना देण्यात आली.  यावेळी साश्रु नयनांनी उपस्थित नागरिकांनी शहीद कैलास पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.  शहीद कैलास पवार हे महार रेजिमेंट येथे 2 ऑगस्ट 2020 रोजी भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा आप्त परीवार आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 1605 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 12 पॉझिटिव्ह

• 04 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 4 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1617 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1605 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 2 व रॅपीड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 295 तर रॅपिड टेस्टमधील 1310 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1605 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 5, चिखली तालुका : हातणी 1, दिवठाणा  1,  दे.राजा तालुका : शिवणी आरमाळ 2, दिग्रस 1, बुलडाणा शहर :1, खामगाव तालुका : घाटपुरी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 12 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 04 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    

   तसेच आजपर्यंत 645649 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86575 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86575 आहे. 

  आज रोजी 1600 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 645649 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87290 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86575 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 43 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

****

 

 

No comments:

Post a Comment